Home यवतमाळ दारव्हा स्फोट प्रकरणावर मनसे आक्रमक; इगल कंपनीवर गुन्हा नोंदविण्याची मागणी

दारव्हा स्फोट प्रकरणावर मनसे आक्रमक; इगल कंपनीवर गुन्हा नोंदविण्याची मागणी

99

दारव्हा स्फोट प्रकरणावर मनसे आक्रमक; इगल कंपनीवर गुन्हा नोंदविण्याची मागणी

दारव्हा तालुक्यातील बागवाडी परिसरातील इगल कंपनीच्या प्लांटवर १७ जून रोजी झालेल्या स्फोटात एक मजूर ठार, तर दुसरा गंभीर जखमी झाला. या प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्याकडे इगल कंपनी विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करत निवेदन सादर करण्यात आले आहे.

या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सदर प्लांट इगल कंपनीच्या मालकीचा असून साई प्रिती कन्स्ट्रक्शन केवळ सब-कॉन्ट्रॅक्टर म्हणून कार्यरत होती. साई प्रिती कंपनीकडे उत्खननाचे कोणतेही परवाने नसल्याचे स्पष्ट झाले आहे. कामगार सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारची काळजी न घेता कामे सुरू असल्याने हा स्फोट झाला असल्याचा आरोप मनसे पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

या गंभीर निष्काळजीपणामुळे मृत्युमुखी पडलेल्या मजुराच्या मृत्यूला इगल कंपनी जबाबदार असून, कंपनीच्या जबाबदार अधिकाऱ्यांवर भादंवि कलम 304(A), 338, 287, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच, दारव्हा तालुक्यात केवळ ३-४ अधिकृत उत्खनन परवाने असताना ७-८ ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर उत्खनन सुरू आहे. मंजूर क्षेत्राच्या पलिकडे उत्खनन होत असल्याचेही निवेदनात नमूद केले आहे. मात्र तहसील प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने संबंधित खाजगी कंपन्यांना कायद्याची भीती उरलेली नाही, असा आरोप मनसेने केला आहे.

या प्रकरणात ETS (Electronic Total Station) मोजणीद्वारे सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, बेकायदेशीर उत्खनन तात्काळ थांबवण्यात यावे, मृत मजुराच्या कुटुंबीयाला शासकीय आर्थिक मदत मिळावी, अशा मागण्या मनसेच्या वतीने करण्यात आल्या.

हे निवेदन देताना मनसेचे जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार, जिल्हा नेते अनिल हमदापुरे, दारव्हा तालुकाध्यक्ष लाला पांडे, रंजीत झोंबाडे, शिवम नांदुरकर, सोनू गुप्ता, ईश्वर राठोड, तुषार चोंडके आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Copyright ©