Home Breaking News श्रीमद जगद्गुरु पलसिद्ध मठात शिव महापुराण कथा सोहळा : कार्यक्रमाची जय्यत तयारी,...

श्रीमद जगद्गुरु पलसिद्ध मठात शिव महापुराण कथा सोहळा : कार्यक्रमाची जय्यत तयारी, राष्ट्रगीताने आजपासून सुरुवात

19

श्रीमद जगद्गुरु पलसिद्ध मठात शिव महापुराण कथा सोहळा :

कार्यक्रमाचीजय्यत तयारी, राष्ट्रगीताने आजपासून सुरुवात

साखरखेर्डा : (असलम अंजुम) अधिक मास म्हणजे पुरूषोत्तम मास. परमार्थ साधकांना आत्मसाधना करण्यासाठी अत्यंत पवित्र महिना मानलेला आहे. अशा या अधिक मासात पूजा, अर्चना, साधना, पारायण, जप-ध्यान अशा विविध रूपाने आध्यात्मिक साधना करण्याची पर्वणी असते. या महिन्यात केलेला परमार्थ हा अनेक जन्माचे पुण्य करून देणारा असतो. अशा या पवित्र अधिक मासानिमित्ताने श्री क्षेत्र साखरखेर्डा येथील श्रीमज्जगतगुरू पलसिध्द महास्वामी मठामध्ये भव्य शिव महापुराण कथा, शिव हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला असून यासोबतच दररोज रात्री नामवंत किर्तनकारांचा किर्तन सोहळा अशा भव्य दिव्य धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
जेष्ठ शु.५ शके १९४८ अर्थात दि.२१ मे
२०२६ ला शिवकथाकार जगदिशानंद स्वामी (आळंदी देवाची), मठाधिपती सिध्दचैतन्य शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते झेंडा वंदन करून राष्ट्रगीताने या सोहळ्याची सुरूवात झाली. सांगता जेष्ठ शु.१२ शके १९४८ गुरुवार म्हणजेच दि.२८ मे २०२६ रोजी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत महाप्रसादाचे वितरण करण्यात येऊन सांगता होणार आहे.ष.ब्र. १०८ वेदांताचार्य शिवाचार्य रत्न सद्गुरू सिध्दलिंग शिवाचार्य महाराज यांच्या नेतृत्वाखाली व ष.ब्र.१०८ सद्गुरू सिध्द चैतन्य शिवाचार्य महाराज यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या भावभक्तीपूर्ण भव्य दिव्य सोहळ्याला केंद्रीय आयुष मंत्री ना. प्रतापराव जाधव, राज्याचे कामगार मंत्री ना. आकाश फुंडकर, माजी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, जिल्हाधिकारी प्रविण देवरे, जिल्हा पोलिस अधिक्षक निलेश तांबे, आ.अर्जुन खोतकर, रविकांत तुपकर, डॉ निलेश गावंडे सह अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. ता. २१ मे ते ता. २८ मे दरम्यान होणाऱ्या या शिव भक्ती सोहळ्यात भरगच्च विविध धार्मिक तथा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दैनंदिन कार्यक्रमात दररोज सकाळी ६ .०० ते ७.०० संत शिवदास कृत शिवपाठ, सकाळी ७.०० ते ८.०० श्री च्या समाधीस रूद्राभिषेक, सकाळी ९.०० ते सकाळी ११.०० पारायण, दुपारी २.०० ते ५.०० शिवमहापुराण कथा, दरम्यान दुपारी ४.०० वाजता संत पूजन, सायंकाळी ५.०० ते ६.०० लक्ष्मण महाराज कृत शिवपाठ व रात्री ८.३० ते ११.०० नामवंत किर्तनकार आपली प्रबोधन पर किर्तन सेवा अर्पित करणार आहेत. पारायण व्यासपीठ नेतृत्व
शि.भ.प. बबन आप्पा कौसडीकर, शि.भ.प. मन्मथ अप्पा खके व शि.भ.प.श्रीमती सरस्वतीताई स्वामी परभणी यांच्या नेतृत्वाखाली होणार असून दि 23 मे रोजी रात्री पंडित भीमसेन जोशी यांचे शिष्य प्रा पद्माकर मोरे अकोला यांचा सांगितिक कार्यक्रम संपन्न होणार आहे. शिवपाठ नेतृत्व पानकन्हेरगाव भजनी मंडळ यांच्या नेतृत्वाखाली काटा भजनी मंडळ, रिसोड भजनी मंडळ, साडेगाव भजनी मंडळ व संस्थेतील विद्यार्थी सहभागी राहणार आहेत. आळंदी देवाची येथील प्रसिध्द शिवकथाकार प्रेममूर्ती जगदिशानंद शास्त्री हे आपल्या अमृतमय वाणीतून शिवभक्तांना संगीतमय शिवकथा ऐकविणार आहेत.
दररोज रात्री होणाऱ्या किर्तन सेवेमध्ये गुरुवारी ता. २१ रोजी प.पू.१००८ महामंडलेश्वर श्री ह.भ.प. अमृतानंद महाराज जोशी बीड यांचे किर्तन होणार असून शुक्रवारी ता.२२ रोजी शि.भ.प.मन्मथ अप्पा खके चारठाणा, शनिवारी ता. २३ रोजी शि.भ.प.त्र्यंबक स्वामी नांदगावकर, रविवारी ता. २४ रोजी शि.भ.प. सौ. ज्योतीताई स्वामी चाभरेकर, सोमवारी ता. २५ रोजी ह.भ.प. डॉ. प्रशांत महाराज ठाकरे अकोला, मंगळवारी ता. २६ रोजी शि.भ.प. शिवचरण गुरूजी हिंगोली व ता.२७ रोजी प.पू.१००८ परिव्रजाकाचार्य ह.भ.प. श्रीहरि चैतन्य महाराज, गुरूदेव आश्रम पळसखेड यांचे किर्तन होणार आहे. या सोहळ्यात शिभप. अनिल स्वामी परभणी, शिभप. नागेश महाराज कुरूंदवाडीकर, शिभप. डॉ अखिल निगडकर वसमत, बबन महाराज कौसडीकर, राजेश स्वामी जाम गव्हाणकर आदी शिवाचार्य हजेरी लावणार आहेत. दरम्यान रविवारी २४ मे रोजी गुरूमंत्र सोहळा व शिवदीक्षा संस्कार केले जाणार असून बुधवारी ता. २७ मे रोजी नगरीतील मुख्य रस्त्यावरून विविध देखावे सह भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. गुरुवारी ता. २८ रोजी महाप्रसादाचे वितरण करण्यात येऊन या अधिक मास शिव सोहळ्याची अनेक गणमान्य मान्यवरांच्या उपस्थितीत सांगता होणार आहे. परिसरातील समस्त शिवभक्तांनी या भावभक्तीपूर्ण सोहळ्याला हजेरी लावून सोहळ्याचा आनंद घ्यावा असे आवाहन मठाधिपती सिध्दचैतन्य शिवाचार्य महाराज यांनी केले आहे.
◾◾
उन्हापासून बचाव करण्यासाठी भाविकांची काळजी घेत संस्थानकडून सहाशे मंडप उभारण्यात आले असून, साठ कुलर, नऊशे फॉगस, पिण्याच्या पाण्यासाठी सहाशे तोट्या, थंड पाण्याचे तीन स्टॉल, 700 महिला /स्वयंसेवक, 250 पुरूष स्वयंसेवक अशी व्यवस्था करण्यात आली असून पन्नास हजार भाविकांना शेवटच्या दिवशी महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे.

Copyright ©