नंददीपला जिजामाता विद्वत् गौरव पुरस्कार जाहीर
बेघर मनोरुग्णांच्या पुर्नवसन कार्याची दखल
यवतमाळ: छत्रपती सेवा प्रतिष्ठान नागपूरच्यावतीने दिला जाणारा मानाचा पुरस्कार यंदा नंददीप फाउंडेशनला जाहीर झाला आहे.१ जूनला समर्थवाडीस्थित नंददीप मनोरुग्ण निवारा केंद्रात प्रतिष्ठानचे सचिव संजय देशकर यांच्यासह प्रसन्न बारलिंगे यांनी भेट देत पुरस्कार जाहीर झाल्याचे पत्र संचालक संदीप शिंदे यांना सुपूर्द केले.
छत्रपती सेवा प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी इतिहास, धर्म व संस्कृती या क्षेत्रात व्रतस्थपणे कार्यरत असलेल्या महनीय व्यक्तींना जिजामाता विद्वत् गौरव पुरस्कार देऊन त्यांचे विद्वत् पूजन केले जाते. १९८२ पासून पुरस्काराची परंपरा जपली जात आहे.या वर्षीच्या ४३ व्या पुरस्कारासाठी विश्वस्त मंडळाने बेघर मनोरुग्णांचे पुनर्वसन करणाऱ्या संदीप व नंदिनी शिंदे यांच्या नंददीप फाउंडेशनची एकमताने निवड केली आहे.यापूर्वी भालजी पेंढारकर,शाहीर योगेश,अपर्णाताई रामतीर्थंकर,रामचंद्र देखणे यांच्यासह भारतरत्न लता मंगेशकर यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. ५१ हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून विजयादशमीच्या पर्वानंतर मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कारसोहळा संपन्न होणार आहे.
या कार्याची दखल
नंददीप फाऊंडेशन हे निराश्रित, मतिमंद, बेघर फिरणारे मनोरुग्ण, मुले यांना आश्रय देऊन त्यांच्यावर सेवाभावी डॉक्टरांकडून उपचार केले जातात. त्यांचे संगोपन करण्याचे काम ही संस्था निःस्वार्थपणे करते. याशिवाय रस्त्यावर होणारे अपघातग्रस्त यांना तत्काळ वैद्यकीय मदत , गरजुन्ना जेवण व पोलिसांच्या मदतीने बेवारस व्यक्तींचे अंत्यसंस्कार कार्यात संस्था पुढाकार घेऊन सामाजिक दायित्व निभावित आहे. त्यांच्या या सामाजिक कार्यात त्यांच्या पत्नी नंदिनी शिंदे यांचेही मोठे योगदान आहे. यापूर्वी शिंदे यांना कोरोना योद्धा, तरुण तेजांकित पुरस्कार, रोटरी उत्कृष्ट सेवा पुरस्कार, वीर राजे संभाजी पुरस्कार. संत गाडगेबाबा सामाजिक पुरस्कार आदींनी सन्मानित केले गेले आहे.
