महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार विजयकुमार ठेंगेकर यांना प्रधान
महाराष्ट्र शासना द्वारा दिला जाणारा आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार यवतमाळ जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या आर्णी तालुक्यातील अंबोडा ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत अधिकारी विजयकुमार ठेंगेकर यांना नुकताच मुंबई येथे यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित भव्य सोहळ्यात प्रदान करण्यात आला.
जिल्हा परिषद स्तरावर अतित्युत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना शासन स्तरावरून यशवंत पंचायतराज अभियान पुरस्कार सोहळ्यात सदर पुरस्कार प्रदान करण्यात येतो. त्यानुसार सन 2023-2024 या वर्षाकरिताचा पुरस्कार विजयकुमार ठेंगेकर व सौभाग्यवती माया विजयकुमार ठेंगेकर यांना राज्यपाल महामहिम सी.पी.राधाकृष्णन यांचे उपस्थितीत महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.
विजयकुमार ठेंगेकर यांची काम करण्याची खास शैली असून ते ग्रामस्तरावर काम करीत असतांना ग्रामस्तरावर काम करणाऱ्या शिक्षण विभाग,आरोग्य विभाग,महिला व बाल कल्याण विभाग, महसूल विभाग, कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग, वन विभाग, अशा सर्व विभागांना सोबत घेऊन काम करतात.
त्यांनी प्रभावीपणे काम करण्यासाठी एक पंचसूत्री कार्यक्रम तयार केला असून बालकांसाठी “दिवस तुझे हे फुलायचे…” या उपक्रमांतर्गत बालसंस्कार व व्यक्तिमत्व विकास, युवकांसाठी “तू नव्या जगाची आशा…” या उपक्रमांतर्गत करिअर मार्गदर्शन, सुदृढ, समृद्ध व सजग कर्तबगार नागरिक होण्याच्या दृष्टीने युवकांसाठी खास उपक्रम, महिलांसाठी “घे भरारी…” हा महिला सक्षमीकरणावरील आधारित उपक्रम, शेतकऱ्यांसाठी “हरणार नाही तर लढणार…” हा शेतकरी वर्गास आत्महत्येपासून परावृत्त करून त्यांना नवी बळकटी देणारा उपक्रम तर वृद्धांसाठी “पिंपळाच्या पारावर…” हा वृद्धांच्या जीवनामध्ये एक आनंद आणि विरंगुळा निर्माण करून त्यांना उतरत्या वयामध्ये आनंद देणारा हा उपक्रम अशीही विजयकुमार ठेंगेकर यांच्या कामाची पंचसूत्री असून ते हे सर्व उपक्रम शिवाय शासनाच्या प्रत्येक योजना व शासनाचे उपक्रम मोठ्या प्रभावीपणे राबवित असतात.
आजवर त्यांनी त्यांच्या कार्यरत गावांना संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान पुरस्कार, पर्यावरण संतुलित ग्राम पुरस्कार, स्मार्ट ग्राम पुरस्कार, राज्यस्तरीय उपक्रमशील ग्रामपंचायत पुरस्कार, लोकमत सरपंच अवार्ड असे लाखो रुपयांचे पुरस्कार प्राप्त करून दिलेले आहेत.
या सर्व कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार 2023-2024 विजयकुमार ठेंगेकर यांना प्रदान केलेला आहे.
या पुरस्कार प्राप्तीबद्दल त्यांचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत तथा सामान्य) पंकज भोयर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी पुरवठा व स्वच्छता तथा नरेगा) प्रकाश नाटकर, गट विकास अधिकारी रमेश खरोडे, महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचे राज्यसरचिटणीस गिरीश दाभाडकर, राज्यसंघटक किशोरभाऊ जिवतोडे, विस्तार अधिकारी गोविंद इंगोले, मुरलीधर भगत, राठोड साहेब यांचेसह सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात आले.
