Home यवतमाळ रस्त्यावरच्या निराधार मनोरुग्णांच्या पुनर्वसनासाठी नंददीप फाउंडेशनला “महाराष्ट्र महागौरव २०२५” राज्यस्तरीय पुरस्कार

रस्त्यावरच्या निराधार मनोरुग्णांच्या पुनर्वसनासाठी नंददीप फाउंडेशनला “महाराष्ट्र महागौरव २०२५” राज्यस्तरीय पुरस्कार

58

रस्त्यावरच्या निराधार मनोरुग्णांच्या पुनर्वसनासाठी नंददीप फाउंडेशनला “महाराष्ट्र महागौरव २०२५” राज्यस्तरीय पुरस्कार

रस्त्यावर बेघर, बेवारस, निराधार आणि मनोरुग्ण अशा ७४७ बांधवांना निवारा देऊन, त्यापैकी ६०१ जणांचे यशस्वी पुनर्वसन करण्यात आले आहे. भारतातच नव्हे तर नेपाळ, बांगलादेशसारख्या शेजारील देशांमधील रुग्णांचेही पुनर्वसन करण्यात नंददीप फाउंडेशनने यश मिळवले आहे. रस्त्यावर भटकणाऱ्या मनोरुग्णांच्या पुनर्वसनाची संख्या आणि कार्यातील सातत्य पाहता, नंददीप फाउंडेशनच्या कार्याला राज्यस्तरीय मान्यता प्राप्त झाली आहे.

“डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना, महाराष्ट्र राज्य” यांच्या वतीने दिला जाणारा “महाराष्ट्र महागौरव २०२५” हा प्रतिष्ठेचा पुरस्कार पुणे येथे आयोजित भव्य सोहळ्यात प्रदान करण्यात आला. या पुरस्कार वितरण सोहळ्याला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा. चंद्रकांतदादा पाटील, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री मा. जयकुमार गोरे, आयुष्यमान भारत महाराष्ट्र राज्य समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे, तसेच संघटनेचे अध्यक्ष राजा माने यांची प्रमुख उपस्थिती होती.

नंददीप फाउंडेशनच्या संचालक संदीप आणि नंदिनी शिंदे यांना मानपत्र, स्मृतीचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून यवतमाळ शहरात रस्त्यावर भटकणाऱ्या निराधार, मनोरुग्णांच्या पुनर्वसनाचे कार्य नंददीप फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू आहे. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांची या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

शासकीय अनुदानाशिवाय कार्यरत असलेल्या नंददीप फाउंडेशनकडून सध्या दीडशेहून अधिक मनोरुग्णांचे सांभाळ व पुनर्वसन केले जात आहे. हा पुरस्कार म्हणजे त्यांच्या कार्याला मिळालेली सामाजिक मान्यता आहे. भविष्यात या कार्याला लोकचळवळीचे रूप मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

या पुरस्कार स्वीकारण्यासाठी संदीप व नंदिनी शिंदे यांच्यासह माजी मुख्याध्यापक नरेंद्र पवार सर, ‘लोकसत्ता’चे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी आणि नंददीप फाउंडेशनचे संचालक मा. नितीनजी पखाले, पल्लवी गिराम, हर्षाली शिंदे, अजय नाटकर हे उपस्थित होते.

Copyright ©