आमचा गाव-आमचा विकास” प्रक्रियेत महिलांनी सक्रिय सहभाग घ्यावा-डॉ.विजयकुमार ठेंगेकर
गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीचा लोकसहभागातून ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करण्याच्यादृष्टीने ‘आमचा गाव-आमचा विकास’ हा महत्वाकांक्षी उपक्रम राज्य शासनाने हाती घेतला आहे.
आणि या महत्वाकांक्षी उपक्रमातून सर्वसमावेशक ग्रामपंचायत विकास आराखडे तयार झाले तरच 15 वा वित्त आयोगाच्या मिळणाऱ्या निधीतून गावांचा सर्वांगीण विकास होण्यास मोठी मदत होणार आहे. तेव्हा सर्व घटकांच्या खांद्याला खांदा लावून महिला वर्गाने देखील यात सहभागी व्हावे असे आवाहन ग्रामपंचायत अधिकारी डॉ. विजयकुमार ठेंगेकर यांनी केले. ते आर्णी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत अंबोडा येथे आयोजित महिला सभा व हळदीकुंकू च्या कार्यक्रमात बोलत होते.
ते पुढे म्हणाले की,‘आमचा गाव आमचा विकास’ हा महत्वाकांक्षी उपक्रम असल्याने ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करीत असतांना गावातील शेतकरी, अनुसूचित जाती-जमाती, महिला, युवक-युवती, महिला बचतगट, स्वयंसेवी संस्था, लोकप्रतिनिधी, विविध विभागाचे शासकीय अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ, स्वयंसेवक आदी घटकांशी विविध स्तरावर विचारविनिमय केल्यास परिपूर्ण असा सर्वांगीण व शाश्वत विकास आराखडा तयार होऊ शकतो.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सरपंचा सौ वर्षाताई बा.आडे, प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंचा सौ. चंचलाताई ज्ञा.पावडे, ग्रामपंचायत सदस्या सौ.पल्लवीताई चव्हाण, सौ. करुणा चव्हाण, अतुल राठोड ग्रामपंचायत अधिकारी विजयकुमार ठेंगेकर,अंगणवाडी सेविका आशा वर्कर आय सी आर पी रुख्मिनाताई राठोड प्रामुख्याने उपस्थित होते.
सभेचे प्रास्ताविक आणि मार्गदर्शन ग्रामपंचायत अधिकारी विजयकुमार ठेंगेकर यांनी केले. तर आभार प्रदर्शन अतुल राठोड यांनी केले.
यावेळी महिला सभेस व हळदी-कुंकू कार्यक्रमास गावातील बहुतांश महिला उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत कर्मचारी ज्ञानेश्वर जाधव, केंद्र चालक दिनेश पाटील, ग्रामरोजगार सहाय्यक कैलास राठोड यांनी परिश्रम घेतले.
उपक्रम सर्वांच्या सक्रिय सहकार्यातून निश्चित यशस्वी होईल.
ग्रामीण भागाच्या विकासाबरोबर ग्रामपंचायती अधिक सक्षम बनविणारी ‘आमचा गाव आमचा विकास’ हा उपक्रम सर्वांच्या सक्रिय सहकार्यातून निश्चित यशस्वी होईल. त्याचबरोबर शासन देत असणारा निधी, ग्रामपंचायतीचा स्व: निधी यातून गावात मुलभूत सेवा सुविधा उपलब्ध होतील, लाभार्थी समाधानी होवून गावाचे रुप पालटण्यास मोलाची मदत होईल.
