Home यवतमाळ माजी मंत्र्यांच्या एका फोनने वाचले एका गरीब मुलीचे प्राण!

माजी मंत्र्यांच्या एका फोनने वाचले एका गरीब मुलीचे प्राण!

61

माजी मंत्र्यांच्या एका फोनने वाचले एका गरीब मुलीचे प्राण!

(मृत्यूच्या दाढेतून बाहेर पडलेल्या पूजाला मिळाले जीवनदान)

सावळी सदोबा:-गरीब कुटुंबातील एका मुलीला वेळेवर उपचार मिळाले नसते, तर तिचे प्राण जाण्याची शक्यता होती. मात्र, माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांच्या तातडीच्या हस्तक्षेपामुळे तिला जीवनदान मिळाले.आर्णी तालुक्यातील माळेगाव येथील १६ वर्षीय कु.पूजा देविदास राठोड ही वसंतराव नाईक माध्यमिक विद्यालय,सावळी सदोबा येथे बारावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. तिच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे.वडील देविदास राठोड रोजंदारी मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांना चार मुली असून, पूजा ही त्यांची मोठी मुलगी आहे.२५ जानेवारी रोजी पूजा ऑटोने शाळेत जात असताना अचानक तोल जाऊन खाली पडली. या दुर्घटनेत तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि दोन्ही कानातून रक्तस्त्राव सुरू झाला. तिला तातडीने सावळी सदोबा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी परिस्थिती गंभीर असल्याचे सांगून तिला यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला.

यवतमाळमध्ये दाखल केल्यावर तिथल्या डॉक्टरांनीही परिस्थिती पाहता पुढील उपचारांसाठी तिला नागपूरच्या वैद्यकीय रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. मात्र, नागपूरमध्ये तिला वेळेवर योग्य उपचार मिळत नव्हते. त्यामुळे तिची प्रकृती अधिकच खालावत गेली. आई वंदना आणि वडील देविदास यांना त्यांच्या मुलीचा जीव वाचेल की नाही, याची चिंता सतावत होती.

माजी मंत्र्याच्या तातडीच्या मदतीमुळे वाचले मुलीचे प्राण

यावेळी राम पवार यांनी या घटनेची माहिती घेताच त्वरित माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांच्याशी संपर्क साधला. परिस्थिती समजताच, मोघे यांनी नागपूर मेडिकल कॉलेजमधील तज्ज्ञ डॉक्टर अविनाश गावंडे यांना तातडीने उपचार सुरू करण्याची विनंती केली. त्यांच्या सूचनेवरून वरिष्ठ डॉक्टरांच्या चमूने काही तासांतच पूजावर उपचार सुरू केले.डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांमुळे अवघ्या काही तासांतच तिच्या प्रकृतीत सुधारणा दिसू लागली. तब्बल अकरा दिवसांच्या उपचारानंतर पूजाला संपूर्णतः बरे करण्यात आले. आता ती सुरक्षित आहे, आणि तिच्या आई-वडिलांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलले आहे.”मोघे साहेबांच्या मदतीमुळे माझ्या लेकीला नवीन आयुष्य मिळाले!”पूजाच्या वडिलांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले, “मी रोजंदारी करणारा एक गरीब माणूस आहे. उपचारांसाठी पैसे नव्हते, आणि आमची पूजा मृत्यूच्या उंबरठ्यावर होती. पण मोघे साहेबांच्या एका फोनने आमच्या लेकीला नवीन आयुष्य मिळाले. आम्ही त्यांचे आयुष्यभर ऋणी राहू!”

ही घटना दाखवते की, गरजूंसाठी योग्य वेळी केलेली मदत त्यांचे संपूर्ण आयुष्य बदलू शकते.गावातील नागरिकांच्या माध्यमातून उचललेल्या या मुद्द्यामुळे गरीब कुटुंबाला दिलासा मिळाला.अजूनही समाजातील अनेक पूजांना अशाच मदतीची गरज आहे.

Copyright ©