सद्गुरु भगवंत माऊलींचा पुण्यस्मरण सोहळा भांब नगरीत साजरा
आमदार बाळासाहेब मांगुळकर यांनी दिली भेट
प्रतिनिधी
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी श्री सद्गुरू भगवंत अध्यात्म अनुसंधान शक्तीपीठ संस्थान भांब (राजा) येथे माऊलींचा ३६ वा पुण्यस्मरण उत्सव दि १९ रोजी रविवार ला मोठ्या थाटामाटात साजरा झाला. या पुण्यस्मरण उत्सवाची सुरुवात दिनांक १८ जानेवारीला सायंकाळी कलश स्थापना आणि दीप प्रज्वलन सिद्धचार्य भगवंत भूषण विष्णुपंत वाघ गुरुजी (लोणी) यांच्या सिद्ध हस्ते तसेच शक्तिपीठाचार्य सदगुरु साक्षी भगवंत विनोद महाराज आक्कावार (आर्णी) यांच्या प्रमुख उपस्थितीत व संस्थानचे समस्त कार्यकारी मंडळ तथा हजारो साधकांच्या साक्षीने करण्यात आले. यानंतर सामुदायिक हरिपाठ, प्रार्थना, आत्मस्वाध्याय परिपाठ, संजीवन प्रवचन शक्तीपीठाचार्य साक्षी भगवंत माऊली यांच्या अमृतमय वाणीतून संपन्न झाले.तसेच हभप संतोष महाराज शेळके कोलवाई यांचे जाहीर कीर्तन झाले. रात्री १२ ते सकाळी ६ वाजेपर्यंत अखंड जागृती, सामुदायिक भजन माला आणि साधकांचे मनोगत व सेवाधारी साधकांचा सन्मान करण्यात आला. रविवार दिनांक १९ जानेवारीला ब्रह्म मुहूर्तावर सामुदायिक ध्यानयोग, अजपाजप सोहम् धारणा, अंतर्मुखी साधना हजारो साधकांच्या लक्षणीय उपस्थितीत संपन्न झाली.
तद्नंतर “श्री” ची पालखी पादुका व समाधी पूजन शक्तीपीठाचार्य, सिद्धाचार्य व संस्थांनचे अध्यक्ष सुदाम बोंद्रे तसेच ज्येष्ठ साधक नारायणराव तिरमारे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. तद्नंतर श्रींची पालखी व पादुका शोभायात्रा गावोगावांहून पायी वारी करत आलेल्या पालखींसोबत भजनी मंडळ, हरिपाठ मंडळ ज्यामध्ये लहानांपासून जेष्ठांपर्यंत सर्वांचाच लक्षणीय सहभाग होता. श्रींच्या पालखी सोहळ्याचे स्वागत संपूर्ण भांब नगरीत ठिकठिकाणी रांगोळी घालून करण्यात आले. संपूर्ण भांब नगरी भाविक भक्तांच्या, भजनी मंडळाच्या टाळ आणि मृदुंगाच्या गजरात न्हावून निघाली. या शोभायात्रेतील हरिपाठ मंडळात लहान मुलांमुलींचा सहभाग लक्षणीय व कौतुकास्पद होता. शोभायात्रेनंतर गोपाल काल्याचे नामसंकिर्तन साक्षी भगवंतांच्या मधुर वाणीतून झाले. कार्यक्रमाला यवतमाळचे आमदार बाळासाहेब मांगुळकर हे आवर्जून उपस्थित होते. त्यांचे स्वागत आणि सत्कार संस्थांनाच्या वतीने अध्यक्ष सुदाम बोंद्रे, हरिभाऊ मानेकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्यांनी आपल्या भाषणातून संस्थांनच्या उर्वरित कामाकरिता सढळ हाताने मदत करण्याचे आश्वासन दिले. दरवर्षी दिला जाणारा यावर्षीचा सामाजिक पुरस्कार आमदार बाळासाहेब मांगुळकर यांच्या हस्ते सिध्दाचार्य विष्णुपंत वाघ गुरुजी यांना देण्यात आला. ते लोणी ता आर्णी येथे कित्येक वर्षांपासून दर गुरुवारला अतिशय दुर्धर व्याधींवर वनौषधी देऊन व्याधीग्रस्तांना रोगमुक्त करत आहेत. ही आयुर्वेद सेवा अखंड अविरत विनामूल्य आजतागायत सुरू आहे त्यांच्या यांना महान कार्याचा सन्मान म्हणून हा सामाजिक पुरस्कार यावर्षी सिध्दाचार्य विष्णुपंत वाघ गुरुजी यांना प्रदान करण्यात आला. आणि संस्थानच्या वतीने तीन तप पूर्ण झाल्याबद्दल साक्षी भगवंताच्या या महान कार्याचा सुध्दा गुणगौरव करुन त्यांना सन्मान पत्र देऊन या अध्यात्म रथाला पूढे चालवण्याकरिता सपत्नीक सन्मानित करण्यात आले.
सदगुरु भगवंत माऊली 19 जानेवारी 1989 साली येथे समाधिस्थ झाली. तत्पूर्वी माऊलींनी परम् शिष्य विनोद महाराज आक्कावार आर्णी यांना उत्तराधिकारी साक्षी भगवंत म्हणून प्रमुख शिष्यमंडळाच्या संमतीने निवडले त्यामुळे संप्रदायाच्या प्रचार कार्याची जबाबदारी त्यांचेवर आली. बालवयापासूनच साक्षी भगवंतांनी अनेक अध्यात्मिक भजने रचली सर्वांनाच म्हणता यावीत म्हणून या भजनांना प्रचलित चाली दिल्यात. त्यांच्या अनेक भजनमाला पुस्तक स्वरूपात संस्थानच्या कार्यालयात उपलब्ध आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर इतर राज्यात सुद्धा साक्षी भगवंतांचे प्रचार प्रसार कार्य आणि शिष्य मंडळी आहे. आध्यात्मिक प्रवचनाद्वारे अंधश्रद्धा निर्मूलन आणि व्यसनमुक्ती यावर ते समाज प्रबोधनाचे महान कार्य करत आहेत. आजवर हजारो साधकांना साक्षी भगवंतांनी व्यसनमुक्त कले आहे आणि ते आपले सांसारिक जीवन आनंदाने जगत आहेत. प्रपंचातून परमार्थमय त्यांचा हा प्रवास अखंडितरित्या चालू आहे. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी भांब आणि दर पौर्णिमाला लोणी येथे सत्संगाद्वारे साक्षी भगवंत आणि सिध्दाचार्यांचे ज्ञानदानाचे मोलाचे कार्य अविरत सुरू आहे. यावर्षीचा 36 वा पुण्यस्मरण उत्सव म्हणजेच तृतीय तपोत्सव सोहळा हजारो साधक आणि भाविकभक्तांच्या उपस्थितीत अतिशय उत्साहात आणि प्रसन्नमय वातावरणात पुण्यस्मरण सोहळा साजरा झाला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कांडलकर गुरुजी, संदीप ढोले , सौ. सोनल मनोज गादेवार यांनी केले. हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाटात पुण्यस्मरण सोहळा साजरा झाला .या कार्यक्रमाकरिता श्री सद्गुरु भगवंत अध्यात्म अनुसंधान शक्तीपीठ संस्थानचे समस्त कार्यकारी मंडळ गावोगावावरून आलेली साधक मंडळी आणि भांब वासियांनी अथक परिश्रम घेतले. सद्गुरु भगवंत माऊलींचा ३६ वा पुण्यस्मरण उत्सव सोहळा भक्तिमय वातावरणात नियोजनबद्धरित्या संपन्न झाला.
