लोहा शहरात संत सेवालाल महाराज जयंती उत्साहात साजरी
राष्ट्र संत सेवालाल महाराज यांचा जयंती सोहळा रविवारी लोहा शहरात आनंदी व उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. मोटारसायकल रॅली, आतिषबाजी, ढोलताशा व आकर्षक मिरवणूक आदी उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते. तर संत सेवालाल महाराज की जय घोषणांनी शहर दुमदुमले.
सकल बंजारा समाजाच्या वतीने संत सेवालाल महाराज यांच्या जयंती सोहळ्याचे आयोजन सार्वजनिक जयंती मंडळाच्या वतीने करण्यात आले होते. प्रारंभी सकाळी शहरातील शनी मंदिर ते छत्रपती शिवाजी चौका पर्यंत मोटारसायकल रॅली काढण्यात आली. तदनंतर एका रथातून सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेची शहरातील मुख्य मार्गावरून भव्य मिरवणूक काढण्यात आली. दरम्यान भाजपचे प्रवीण पाटील चिखलीकर, पुष्पावती शिक्षण प्रसारक मंडळ नांदेड चे सचिव श्री स्वप्निल जाधव साहेब अनेक मान्यवरांनी श्री.संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. जयंती मिरवणुकीचा समारोप व्यंकटेश मंगल कार्यालयात करण्यात आला. मिरवणुकीत भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत महिला पुरुषांसह अबाल वृध्द समाज बांधव बहुसंख्येने सहभागी झाले होते.
