नेहमी वाहतूक विस्कळीत होते इथे, वाहतूक पोलीस शिपाई असतात तरी कुठे
दिग्रस येथील जुन्या पेट्रोल पंपासमोरील मार्ग वर्दळीचा मार्ग असून या मार्गावर नेहमी वाहतूक विस्कळीत होऊन किरकोळ वाद होणे नेहमीच झाले आहे .या मार्गावर पंचायत समिती कार्यालय, तहसील कार्यालय, दिवाणी व फोजदारी न्यायालय, भूमी अभिलेख, विद्युत वितरण कार्यालय तसेच मध्यवर्ती बँक असे महत्वपूर्ण विभागाचे कार्यालय असल्याने तालुक्यातील नागरिकांची ये-जा या रस्त्यावर असून ३ मार्गवरून येणारे वाहन एकमेकांन समोर येऊन वाहतुक खोळंबा होऊन नागरिकांना तासोनतास अडखळून राहावे लागते .याच मार्गावर महाविद्यालय असल्याने महाविद्यालयीन विध्यार्थ्यांना या परिस्थितीचा रोजचाच त्रास सहन करावा लागतो आहे.
याच मार्गावरील उजव्या बाजूला आर्णी मार्ग वळण मार्ग असून मोहनाबाई व दिनबाई विद्यालय आहेत. या शाळेत शिकणारे शेकडो विद्यार्थी- विद्यार्थिनी याच मार्गावरून प्रवास करतात. शाळा भरण्याची वेळ आणि शाळा सुटण्याची वेळ असल्यास जुन्या पेट्रोल पंपजवळ वाहतूक खोळंबा होऊन अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. मात्र इथे वाहतूक पोलीस शिपाई तर सोडा साधे पोलीस शिपाई सुद्धा वाहतूक सुरळीत करताना दिसून येत नाही. सदर मध्यवर्ती आणि वर्दळीचे ठिकाण असल्याने या ठिकाणी पोलीस शिपाई तैनात करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
