हिंदू जनजागृती समिती तर्फे श्री हनुमान जयंतीनिमित्त यवतमाळ शहरात ७ ठिकाणी ‘गदापूजन’ संपन्न !
प्रभु श्रीरामांच्या कृपेने रामराज्य अर्थात हिंदु राष्ट्र स्थापनेला बळ मिळावे आणि हिंदूंमध्ये शौर्यजागरण व्हावे, यासाठी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने श्री हनुमान जयंतीनिमित्ताने १६ एप्रिलला शहरातील ७ प्रसिद्ध हनुमान मंदिरात ‘गदापूजन’ करण्यात आले.
हिंदूंच्या प्रत्येक देवतेचे रुप पाहिले असता, प्रत्येक देवतेचा एक हात आशीर्वाद देणारा, तर अन्य सर्व हातांमध्ये शस्त्रे आहेत. देवतेच्या प्रत्येक रुपाचे पूजन हिंदूंनी केले पाहिजे. त्या दृष्टीने देवतांच्या शस्त्रांचेही पूजन केल्यास हिंदूंमध्ये शौर्य जागृत होण्यास साहाय्य होईल. अन्याय अत्याचार यांच्या विरोधात लढण्यासाठी शौर्यच आवश्यक असते. त्यामुळे धार्मिक सणांच्या दिवशी प्रतिकात्मक का होईना, पण शस्त्रपूजन झाले पाहिजे. हिंदूंमध्ये शौर्यजागरण झाले पाहिजे. हिंदूंनी आपल्या सण, उत्सवांच्या माध्यमातून शस्त्रपूजनाच्या परंपरा जपल्या पाहिजेत, अशी या कार्यक्रमामागील भूमिका हिंदु जनजागृती समितीने या वेळी मांडली.
यावेळी हनुमान आखाडा चौक मंदिर, प्रकट हनुमान मंदिर मेनलाईन, संकट मोचन मंदिर, आर्णी नाका मंदिर, वनवासी मारुती मंदिर, दुमनापूर मंदिर, अंजनेय सोसायटी मंदिर इत्यादी मंदिरात गदा पूजन करण्यात आले. यावेळी सामूहिक प्रार्थना, ‘गदापूजन’ विधी,मारुती स्तोत्र आणि ‘श्री हनुमंतांचा जयघोष करण्यात आला. शेवटी ‘धर्मसंस्थापनेसाठी प्रतिज्ञा’ करण्यात आली. या कार्यक्रमाचा लाभ ५०० हून अधिक भक्तांनी घेतला. हिंदू जनजागृती समितीचे श्री संजय सिप्पी यांनी गदापुजन केले, तर श्री अनिकेत अर्धापुरकर यांनी मारुती स्तोत्र म्हटले. या वेळी हिंदू जनजागृती समितीचे दत्तात्रय फोकमारे, प्रशांत सोळुंके, मयंक सिप्पी, शौर्य सोळंके यांनी परिश्रम घेतले.
