सुसंस्कार विद्या मंदिर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्य अभिवादन
सर्वांना समान न्याय, समता व बंधुत्वाच्या विचारांची प्रेरणा देऊन देशाला संवैधानिक दिशा देणारे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती सुसंस्कार विद्या मंदिर येथे उत्साहात साजरी करण्यात आली.
स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री,भारतीय संविधानाचे जनक, दीन दलितांच्या जीवनाला जखडलेल्या गुलामगिरीच्या शृंखला तोडणारा महायोध्दा, उपेक्षितांच्या जीवनामध्ये अस्मितेची ज्योत पेटवणारा प्रकाशसूर्य तसेच स्वतःच्या अलौकिक विद्वत्तेचा वापर समाजहितासाठी करणारा पहिला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे होते. सर्व प्रथम शाळेचे सचिव संजय कोचे, व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.उषा कोचे ह्यांनी दिपप्रज्वलन करून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोला माल्यार्पण करीत अभिवादन केले,तसेच सर्व शिक्षक वृंदानी सुध्दा अभिवादन केले,ह्या प्रसंगी अभिवादन करतांना संजय कोचे म्हणाले आज देशभरामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. तब्बल दोन वर्षांनंतर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करतांना उत्साह सगळीकडे पाहायला मिळत आहे.भीमराव रामजी आंबेडकर तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य (दलित) लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली, तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले. ते ब्रिटिश भारताचे मजूरमंत्री, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक होते. देशाच्या विविध क्षेत्रांत दिलेल्या योगदानामुळे त्यांना ‘आधुनिक भारताचे शिल्पकार’ किंवा ‘आधुनिक भारताचे निर्माते’ असेही म्हणतात असे ते म्हणाले
ह्या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापीका सौ.उषा कोचे म्हणाल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे उच्चविद्याविभूषित शिक्षणतज्ज्ञ होते. “शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, आणि जो ते प्राशन करेल तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही.” हा संदेश त्यांनी जगाला दिला तसेच
आंबेडकरांच्या मते हजारो वर्षांपासून शिक्षण नाकारलेल्या कनिष्ठ जातींमध्ये अज्ञान व निरक्षरता होती. आंबेडकरांनी कनिष्ठ जातींना त्यांच्या या दयनीय स्थितीचे कारण शिक्षणाचा अभाव हेच आहे याची जाणिव आंबेडकरांनी करून दिली. कनिष्ठ जातींच्या लोकांनी त्यांच्या मुलांना शाळेत पाठवावे यासाठी आंबेडकरांनी त्यांना प्रोत्साहन दिले. या मुलांना शिष्यवृत्ती, गणवेश, भोजन व निवारा अशा सुविधा पुरविण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आपल्या अनुयायांना “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” असा संदेश दिला.असे त्या म्हणाल्या
या कार्यक्रमाचे सुत्र संचालन प्रिया गौतम यांनी तर आभार प्रदर्शन विनोद जाधव ह्यांनी केले ह्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.
