Home यवतमाळ यवतमाळात मनोरुग्ण निवारा केंद्राचा शुभारंभ: विधायक कार्यासाठी एकत्र येणं हे यवतमाळचे वैशिष्ट्य...

यवतमाळात मनोरुग्ण निवारा केंद्राचा शुभारंभ: विधायक कार्यासाठी एकत्र येणं हे यवतमाळचे वैशिष्ट्य ! – माधुरी मडावी

9

यवतमाळात मनोरुग्ण निवारा केंद्राचा शुभारंभ:
विधायक कार्यासाठी एकत्र येणं हे यवतमाळचे वैशिष्ट्य !
– माधुरी मडावी

यवतमाळात अनेक चांगली कामे सुरू असल्याचे दिसते. बहुतांशी कामांमध्ये एकापेक्षा अधिक व्यक्ती आणि संस्था परस्परांना सहकार्य करताना दिसतात. यवतमाळची मातीच खूप चांगली आहे असे यावरून म्हणावे वाटते. मी अशा चांगल्या कामाचा भाग होऊ शकले याचा आनंद आहे. संदीप शिंदे यांनी नंददीप फौंडेशनच्या माध्यमातून मनोरुग्णांसाठी चालविलेल्या या कामाला यवतमाळकरांसह नगरपरिषदेची एक अधिकारी म्हणून मी सर्व शक्य मदत करेन, असा विश्वास यवतमाळ नगर परिषदेच्या प्रशासक तथा मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी बोलून दाखवला.
नंदादीप फौंडेशन व सेवा समर्पण प्रतिष्ठानच्या वतीने येथील समर्थवाडीतील न. प. शाळा क्रमांक 19 मध्ये उभारलेल्या बेघर मनोरूग्ण निवारण केंद्राच्या शुभारंभप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी मंचावर नंददीप फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप शिंदे, सेवा समर्पण प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत बनगीनवार, उपाध्यक्ष सुरेश राठी प्रामुख्याने उपस्थित होते.
माधुरी मडावी म्हणाल्या, संदीप शिंदे नावाचा माणूस एवढं मोठा काम करू शकतो याची मला भेट झाल्यानंतर जाणीव झाली. त्यांच्या घरी गेल्यानंतर कुटुंबियांची तळमळ पाहिली. खरी मदत कशी असते त्याचा प्रत्यय या कामातून येतो. संत महात्म्यांनी दीनदुबळ्यांकरता केलेल्या सेवा कार्याची आठवणच यानिमित्ताने झाली आहे, असेही माधुरी मडावी म्हणाल्या.
प्रारंभी त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. प्रास्ताविकात सेवा समर्पण प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत बनगीनवार यांनी कोरोना काळात यवतमाळातील स्वयंसेवी संस्थांनी जे सेवा कार्य मोठ्या प्रमाणात राबविले, त्यातील संदीप शिंदे यांनी मनोरुग्णांना करता चालू केलेले कार्य लक्षात राहिले आणि ते काम पुढे सुरू राहावे या दृष्टीने आपण सर्व मित्रांच्या सहकार्याने मदत करीत आहोत. ॲम्बुलन्स, बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र ही सगळे त्याचीच रूप आहेत असे ते म्हणाले.
अध्यक्षीय भाषणात सुरेश राठी म्हणाले, सेवा समर्पण या पाच जणांच्या संस्थेने यवतमाळच्या पूर्व भागात पाच एकर जागा घेतली असून तिथे भविष्यात बेघर मनोरुग्ण निवारा केंद्रासह अनेक सेवा कार्य चालतील. यावेळी संदीपच्या धर्मपत्नी नंदिनी शिंदे यांच्या सेवा कार्याबद्दल त्याचप्रमाणे पोलीस विभागातून सहकार्य करणाऱ्या रजनी गेडाम, रुग्णवाहिकेचे हस्तांतरण करणारे बळवंत चिंतावार, नगरसेवक चंद्रशेखर चौधरी, नीता धावतोडे यांचेही स्वागत करण्यात आले.
डॉ. आलोक गुप्ता, दीपक सुकळकर, सागर कंचलवार, मनोज बागवाले, अनंत कौलगीकर, ॲड् दिनेश वानखडे यांनी स्वागत केले. संचालन कमल बागडे यांनी तर आभार प्रदर्शन संदीप शिंदे यांनी केले. यावेळी डॉ. सुरेंद्र पद्मावार, डॉ. विजय अग्रवाल यांच्यासह यवतमाळच्या सामाजिक क्षेत्रातील बहुसंख्य मंडळी उपस्थित होती.

Copyright ©