जिल्हा कोरोमुक्त ठेवण्यासाठी लसिकरण पुर्ण करा
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे नागरिकांना आवाहन
12 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्याच्या कोविड लसीकरणाला सुरुवात
यवतमाळ दि. 17 मार्च, : जिल्ह्यात कोरोना लसचा पहिला डोस 90 टक्के व दुसरा डोज 60 टक्के पुर्ण झाला आहे. आता 12 वर्षावरील बालकांच्या लसिकरणाला शासनाने परवानगी दिल्याने आजपासून नियमित लसिकरणासोबतच 12 ते 14 वर्ष वयोगटातील बालकांचेही लसिकरण सुरू करण्यात येत आहे. तरी पालकांनी आपल्या 12 वर्षावरील बालकांचे लसिकरण पुर्ण करावे तसेच ज्यांचा पहिला व दुसरा डोज अद्यापही बाकी आहे त्यांनी देखील आपले लसिकरण पुर्ण करून घ्यावे आणि जिल्हा कोरोमुक्त ठेवण्यासाठी सर्वांनी आपले लसिकरण पुर्ण करून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले.
लसीकरणाच्या सहाव्या टप्यात आता शासना मार्फत 12 ते 14 वयोगटातील बालकांचे कोविड लसीकरण सुरू करण्याचे निर्देश दिले आहे. त्या अनुषंगाने आरोग्य विभागाने यवतमाळ येथील शंकरलाल कोठारी विद्या मंदीर या शाळेत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे प्रमुख उपस्थितीत कु. प्राची गुल्हाणे वर्ग 7वा या विद्यार्थिनीला लस देउन या लसीकरण मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ केला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. आर.डी.राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी.एस.चव्हाण, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. संजय पांचाळ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. क्रांतीकुमार नांवदीकर, वैद्यकीय अधिकारी संजना लाल, संस्थेचे सचिव डॉ अनुप कोठारी, मुख्याध्यापिका अर्चना कोठारी तसेच शाळेतील लाभार्थी विद्यार्थी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की कोविडचा धोका अद्याप टळलेला नाही, नागरिकांनी कोविड त्रिसुत्रीचे पालन करावे व कोविडवरील परिणामकारक शस्त्र लसिकरण असून ते पुर्ण करावे. 12 वर्षावरील मुला-मुलींनी ही लस घ्यावी तसेच पालक किंवा ओळखीतील व्यक्तींनी जर लस घेतली नसल्यास त्यांना लस घेण्यासाठी प्रवृत्त करावे, असे त्यांनी बालकांनी सांगीतले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी सांगितले की 12 ते 14 वयोगटासाठी कार्बोव्हॅक्स लस ही भारतात निर्माण करण्यात आली असून ही अतिशय सुरूक्षित असल्याचे सांगितले.
जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी प्रास्ताविक भाषणातून जिल्हात 12 ते 14 वयोगटातील 92 हजार लाभार्थी असल्याचे सांगीतले तसेच जिल्हास्तरावर 30 हजार 600 कॉर्बोव्हॅक्स लस उपललब्ध झल्याचे सांगीतले
कार्यक्रमाचे संचालन विजय विसपुते यानी केले तर उपस्थितांचे आभार डॉ. अनुप कोठारी यानी व्यक्त केले. कार्यक्रमाला आरोग्य विभागाचे कर्मचारी तसेच शाळेतील सर्व विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थीत होते .
_______________________________
पीक कर्ज परतफेड 31 मार्च पुर्वी करून
6 टक्के व्याजसवलतीचा लाभ घ्या
– जिल्हा उपनिबंधक
यवतमाळ दि. 17 मार्च, : सहकार, पणन व वस्त्रोदयोग विभागाचे शासन निर्णय दिनांक ११ जुन,२०२१ अन्वये डॉ.पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. आता या योजनेमध्ये व्याज दरात सवलत सुधारणेमुळे शेतकऱ्यांनी रुपये तीन लाख कर्जमर्यादेपर्यंत अल्पमुदत पीक कर्जाची परतफेड विहीत मुदतीत केल्यास सरसकट ६ टक्के व्याज सवलतीचा लाभ देण्यात येणार आहे. यामध्ये केंद्र सरकार चे ३ टक्के व राज्य शासनाचे ३ टक्के असे अनुदान समाविष्ट आहे.
सदर लाभ ज्या शेतक-यांनी सन २०२१-२२ मध्ये पिक कर्ज घेतले आहे व त्याची परतफेड विहीत मुदतीत दिनांक ३१ मार्च,२०२२ पुर्वी केली आहे. अशा शेतकऱ्यांना मिळणार आहे. तेव्हा सर्व शेतकऱ्यांनी त्यांचेकडील अल्पमुदती पिक कर्जाचा भरणा दिनांक ३१ मार्च २०२२ पर्यंत करुन राज्य शासन व केंद्र शासनाकडील एकूण ६ टक्के व्याज दर सवलत याप्रमाणे एकुण व्याज सवलत विचारात घेऊन सदर कर्ज शेतकऱ्यांना शुन्य टक्के व्याज दराने सवलतीचा लाभ घ्यावा. तसेच पुढील सन २०२२-२३ च्या कर्जावरही व्याज सुट मिळेल.
ज्या शेतक-यांनी त्यांचेकडील पिक कर्जाची नियमित कर्ज परतफेड केली आहे. अशा नियमित कर्ज परतफेड करणा-या शेतक-यांना रु. ५० हजार पर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देण्याबाबत २०२२ चे विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये घोषणा करण्यात आली आहे. तथापि यासंबंधाने शासन निर्णय निर्गमित झाल्यानंतरच शासन निर्णयातील तरतुदीप्रमाणे अंमलबजावणी करण्यात येईल. तेव्हा शेतकऱ्यांनी त्यांचेकडील पिक कर्जाची विहीत मुदतीत दिनांक ३१ मार्च, २०२२ पुर्वी परतफेड करावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक रमेश कटके यांनी केले आहे.
____________________________
गेल्या 24 तासात नवीन पॉझिटिव्ह नाही
यवतमाळ दि. 17 मार्च, : गेल्या 24 तासात जिल्ह्यात नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले नाही. तसेच ॲक्टीव पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या निरंक आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 207 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह नसल्याने सर्व 207 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 79065 आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 77262 आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत आठ लाख 49 हजार 372 चाचण्या झाल्या असून त्यापैकी सात लाख 70 हजार 307 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 9.31 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 0.0 आहे तर मृत्यूदर 2.28 आहे.
नागरिकांनी कोरोना त्रीसुत्री नियमांचे पालन करावे, तसेच कोरोनाचे लसीकरण पुर्ण करून स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.
___________________________
21 मार्च रोजी महिला लोकशाही दिन
यवतमाळ दि. 17 मार्च, : चालू महिन्यातील जिल्हा महिला लोकशाही दिनाचे आयोजन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 21 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील बळीराजा चेतना भवन (बचत भवन) येथे करण्यात आले आहे.
तक्रारग्रस्त महिलांनी त्यांच्या तक्रारी प्रथम दर महिन्याच्या चौथ्या सोमवारी आयोजित होणाऱ्या तालुकास्तरावरील लोकशाही दिनात मांडाव्यात. सदर तक्रारीवर संबंधीत विभागाकडून विहित कालावधीत निरसन न झाल्यास सदर तक्रार जिल्हा महिला लोकशाही दिनात तालुकास्तरीय लोकशाही दिनात केलेले अर्ज व टोकन क्रमांकासह दाखल करावी.
लोकशाही दिनात न्यायप्रविष्ठ प्रकरणे, विहित नमुन्यात नसलेला व आवश्यक कागदपत्रे न जोडलेला अर्ज तसेच सेवाविषय, आस्थापनाविषयक, वैयक्तिक स्वरूपाचे निवेदन व तक्रारी स्विकारल्या जाणार नाही, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ज्योती कडू यांनी कळविले आहे.
