आशा व गटप्रवर्तक थकीत मानधन न मिळाल्याने आज पासून बेमुदत संपावर.
——————————————–
संपात विविध प्रलंबित मागण्याचे निवेदन सादर.
——————————————–
यवतमाळ- कोरोना काळासह आरोग्य क्षेत्रात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तक यांचे चार महिन्यापासूनचे मानधन थकीत असल्याने त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. याबाबत वारंवार आयटक, महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गटप्रवर्तक संघटनेच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले तरी सुध्दा मानधन व ईतर कोरोना काळातील भत्ते देण्यात आले नसल्याने आज दिनांक १४ फेब्रुवारी २०२२ पासून जिल्ह्यातील आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकानी बेमुदत संप पुकारला आहे.
चार महिन्याचे मानधन थकीत झाल्याने यापूर्वी संघटने मार्फत निवेदन देण्यात आले होते. त्यावेळी आठ दिवसात मानधन अदा करू असे आश्वासन दिल्या गेले होते मात्र त्या कालावधीला एक महिना उलटला तरी मानधन अदा करण्यात आले नाही. याशिवाय संघटनेशी कोणताही पत्र व्यवहार करण्यात आला नसल्याने नाईलाजास्तव संघटनेला बेमुदत संपाचे खंजीर उपसावे लागले. जो पर्यंत ठोस आश्वासन मिळून मानधन मिळणार नाही तोपर्यंत हा संप सुरूच राहणार असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. याशिवाय केंद्र शासनाच्या सुधारित पत्रानुसार ऑक्टोंबर २०२१ पासून कोविड प्रोत्साहन भत्ता आशा स्वंयसेविकाना १०००/-तर गटप्रवर्तक यांना ५००/-रुपये देण्याचे प्रोविजन आहे. तो भत्ता तातडीने द्यावा, नियमित मोबदला २०२१ पासून थकीत आहे तो थकबाकीसह तात्काळ द्यावा या मागणीसह एकूण सहा मागण्यांचा समावेश करण्यात आले आहे. त्यामुळे तुटपुंज्या मानधनावर काम करणाऱ्या आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या संतप्त भावना लक्षात घेऊन त्या तातडीने मार्गी लावावेत असे मागणी यावेळी निवेदनातून केली आहे. या निवेदनावर दिवाकर नागपुरे, मंगला राखुंडे, रंजना राऊत, अर्चना तोंडरे, सुरेखा बेलखेडे,सुनिता जैस्वाल, महानंदा रामटेके, अलका शिंदे, रविना मुणेश्र्वर, आरती वासनिक, प्रतिभा गजभिये, जयश्री डांगे, वैशाली कोरे, शगुप्ता शेख, ज्योती तुमसरे, करुणा उईके, जोष्णा भवरे, कविता पाटील, मेघा पाईकराव, किरण पोयाम, कांता मेंढे, सुरेखा सरप, सविता सहारे, शिल्पा निमसटकार, वर्षा कुलमथे, वर्षा पवार, बेबी धबडगे,ज्योती रोकडे इत्यादीनी सह्या केल्या आहेत.
