धामणगाव देव व पोहरादेवी येथील विकासकामांचा आमदार संजय राठोड यांच्याकडून आढावा
–विशिष्ट कालमर्यादेत कामे पूर्ण करण्याच्या सूचना
यवतमाळ – दारव्हा तालुक्यातील श्री क्षेत्र धामणगाव देव येथे सुरू असलेल्या विकासमाकांचा आमदार संजय राठोड यांनी नुकताच आढावा घेतला. धामणगाव देव येथे झालेल्या या आढावा बैठकीत अंतिम टप्याामत असलेली सर्व विकासकामे येत्या २० जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना आ. राठोड यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
श्री क्षेत्र धामणगाव देव येथे मुंगसाजी माऊलींच्या दर्शनासाठी हजारो भाविक भेट देतात. त्यामुळे येथील विकासासाठी आमदार संजय राठोड यांनी शासानाच्या बजेटमधून 50 कोटी रूपये उपलब्ध करून दिले. या निधीतून धामणगाव विकास आराखडा तयार करून कामे सुरू केली. या ठिकाणी भाविकांना राहण्यासाठी उत्तम व्यवस्था व्हावी याकरिता सर्व सुविधा असलेले भक्तनिवास संकुल बांधण्यात आले आहे. यासोबतच भोजन कक्ष, मंगल कार्यालय, सभागृह, लॉन आदी सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. आ. संजय राठोड यांनी पूर्णत्वास येत असलेल्या या कामांची प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला. येथील बहुतांश कामे पूर्णत्वास गेली आहेत. अनेक कामे अंतिम टप्याालत आहे. ही सर्व कामे येत्या २० जानेवारीपर्यंत पूर्णत्वास नेण्याचे निर्देश यावेळी आमदार संजय राठोड यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. ही कामे पूर्ण होताच भक्तांना या सुविधांचा लाभ घेता येईल, असे आ. राठोड म्हणाले. यावेळी बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता गिरीश जोशी, कार्यकारी अभियंता अडचुले आदी उपस्थित होते.
पोहरादेवी येथेही आढावा
बंजारा समाजाची काशी असलेल्या श्री क्षेत्र पोहरादेवी येथे आमदार संजय राठोड यांच्या पुढाकारातून श्री संत सेवालाल महाराज नंगारा म्युझियम साकारले जात आहे. नंगाराच्या आकाराचे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या म्युझियमचे काम व पोहरादेवी येथील अनेक विकासकामे प्रगतीपथावर आहेत. या ठिकाणी भेट देऊन आमदार संजय राठोड यांनी कामांची प्रत्यक्ष पाहणी केली व आढावा घेतला. पोहरादेवी विकास आराखडा तयार करून शासनाने १०० कोटींचा निधी मंजूर केला. या निधीतून पोहरादेवी येथे विविध विकासकामे प्रगतीपथावर आहेत. नंगारा म्युझियममध्ये १२ प्रदर्शन गॅलरी राहणार असून अद्ययावत पद्धतीने त्यांची निर्मिती करण्यात येत आहे. या कामांची तसेच नंगारा प्रतिकृतीत साकारत असलेल्या बांधकाची अंतर्बाह्य पाहणी आ. राठोड यांनी केली. नंगारा म्युझियमच्या अंतर्गत सजावटीचे काम तत्काळ सुरू करण्याचे निर्देश त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. तसेच विद्युतीकरणाचा आणि जीवन प्राधिकरणच्या वतीने सुरू असलेल्या कामांचाही त्यांनी आढावा घेतला. ही कामे विशिष्ट कालमर्यादेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. बैठकीला बांधकाम विभागासह महावितरण, जीवन प्राधिकरण आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
