ग्राहकांच्या हक्काबाबत जाणीव जागृती साठी सर्व स्तरातून प्रयत्न व्हावे
राष्ट्रीय ग्राहक दिनी_ अमोल येडगे
यवतमाळ दि. 24 डिसेंबर : ग्राहक संरक्षक कायद्यानुसार प्रत्येक ग्राहकाला सुरक्षेचा हक्क, माहिती मिळविण्याचा हक्क, निवड करण्याचा हक्क, मत मांडण्याचा हक्क, तक्रार आणि निवारण करण्याचा हक्क तसेच ग्राहक हक्काबाबत शिक्षणाचा हक्क प्राप्त झाला आहे. ग्राहकांच्या या हक्काबाबत प्रशासनातर्फे नियमितपणे जाणीव जागृतीचे कार्यक्रम राबविले जातात, मात्र यासोबतच इतर सर्वच स्तरातून देखील ग्राहकांना त्यांचे हक्काबाबत माहिती व्हावी यासाठी प्रयत्न व्हावे, असे मत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय ग्राहक दिन निमित्त आज जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन वेबिनारद्वारे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला अपर जिल्हाधिकारी प्रमोदकुमार दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, ग्राहक तक्रार निवारणचे अध्यक्ष नंदकुमार वाघमारे, ग्राहक मंचचे नारायण मेहरे प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की ग्राहकांची फसवणूक होऊ नये म्हणून शासनाने विविध कायदे केले आहेत. ग्राहकांना गुणवत्तापुर्ण सेवा देणे ही विक्रेत्याची जबाबदारी असली तरी ग्राहकांनी देखील कोणतेही व्यवहार करतांना सजग असावे असेही जिल्हाधिकारी येडगे यांनी सांगितले.
ग्राहक तक्रार निवारणचे अध्यक्ष नंदकुमार वाघमारे यांनी यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून बोलतांना सांगितले की ग्राहक कायद्यामुळे ग्राहकांचे हित जोपासल्या जाऊ लागले आहे. ऑनलाईन व्यवहारात फसवणूक झाल्यास केवळ ट्रान्सेक्शनचा पुरवा दिल्यास मोठ्यात मोठ्या कंपनीविरूद्धही तक्रार नोंदवून कारवाई करता येते. ग्राहक तक्रार कक्षात तक्रार नोंदवून कमी खर्चात आणि वकीलाशिवाय दावा लढवता येत असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार यांनी केले. सन 1986 साली 24 डिसेंबर रोजी ग्राहक हक्क कायद्याला भारताच्या राष्ट्रपतींनी मंजूरी दिली होती, तेव्हापासून 24 डिसेंबर हा राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उपविभागीय अधिकारी अनिरूद्ध बक्षी, वजन मापेचे सहाय्यक नियंत्रक गजानन ढाले, ग्राहक मंचचे नारायण मेहरे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचालन छाया गुघाणे यांनी केले तर उपस्थितांचे आभार तहसिलदार कुणाल झाल्टे यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमात विविध विभागाचे अधिकारी, ग्राहक चळवळीशी संबंधीत संस्था, दुकाणदार व नागरिक ऑनलाईन वेबीनारच्या माध्यमातून सहभागी झाले होते.
___________________________________
रोजगार मेळाव्यात 85 उमेदवारांची निवड
यवतमाळ दि. 24 डिसेंबर : औद्योगिक प्रशिक्षण संस्था, यवतमाळ येथे सुझुकी मोटर हंसलपुर, गुजरात या नामांकित कंपनीत रोजगार भरतीसाठी 21 डिसेंबर 2021 रोजी आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यात जिल्ह्यातील एकुण 85 उमेदवारांची निवड करण्यात आलेली आहे.
सुझुकी मोटर हंसलपुर, गुजरात या नामांकित कंपनीत रोजगार भरतीसाठी बी.टी.आर.आय.यवतमाळ यांच्यातर्फे जिल्हास्तरीय भरती मेळाव्याचे आयोजन दिनांक 21 डिसेंबर 2021 रोजी आयटीआय, यवतमाळ येथे करण्यात आले . कंपनी तर्फे विद्यार्थ्यांच्या लेखी परीक्षा व मुलाखत घेण्यात येऊन जिल्ह्यातील एकुण 85 उमेदवारांची निवड करण्यात आलेली आहे.
भरती मेळाव्यात सुझुकी मोटर, हंसलपुर, गुजरात येथील एच.आर. विभागाचे असिस्टंट मॅनेजर धर्मराज पाटील, असिस्टंट मॅनेजर ऋतुराज चौबे तसेच सुझुकी मोटर प्लेसमेंट एजंसी चे प्रतिनिधी प्रियंक चव्हाण व राहुल चौधरी यांनी भरती प्रक्रिया राबविली. या भरती मेळाव्याला जिल्ह्यातून एकूण 110 उमेदवारांची लेखी परीक्षा व मुलाखत घेण्यात आली.
जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण अधिकारी महेशकुमार सिडाम यांनी भरती मेळाव्याचे उद्घाटन केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य प्रमोद भंडारे तर प्रमुख अतिथी म्हणून शासकीय आयटीआय दारव्हा, आर्णी व नेर चे प्राचार्य अनुक्रमे रमेश राठोड, गणेश मसराम व दिपक गुरव हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन कनिष्ठ प्रशिक्षणार्थी सल्लागार अपर्णा आगरकर यांनी केले. भरती प्रक्रिया यशस्वीपणे राबविण्यासाठी जिल्ह्यातील प्राचार्य, गट निदेशक तथा निदेशक तसेच संस्थेतील सर्व कर्मचारी इत्यादींनी सहकार्य केले.
_____________________________________
गर्भलिंगनिदान व अवैध गर्भपात करणे कायद्याने गुन्हा
माहिती देणाऱ्यास एक लाखाचे बक्षीस
*हेल्प लाईन क्र.1800-233-4475 यावर नोंदवा तक्रार
यवतमाळ दि. 24 डिसेंबर : गर्भधारणा किंवा प्रसवपुर्व गर्भलिंग निदान तंत्र कायदा व वैद्यकीय गर्भपात कायद्याचे उल्लंघन करून किंवा गर्भलिंग चाचणी किंवा अवैधरित्या गर्भपात केले जात असतील किंवा अपात्र व्यक्ती गर्भपात करत असतील तर अशा केंद्राविषयी किंवा व्यक्ती विषयीची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यवतमाळ यांना कळविल्यास त्यांना एक लाख रुपये बक्षीस देण्यात येणार आहे.
गर्भलिंगाची अवैध चाचणी अथवा अवैध गर्भपाताची माहिती देणाऱ्या व्यक्तीस त्यांनी दिलेल्या बातमीची खातरजमा करून व त्या अनुषंगाने नंतर संबधीत सोनोग्राफी केंद्र /गर्भपात केंद्र /व्यक्तीवर खटला दाखल केल्यावर संबंधीत व्यक्तीस रुपये एक लाख बक्षीस देण्यात येईल. ती व्यक्ती सामान्य नागरिक, आरोग्य विभागातील कर्मचारी, अधिकारी तसेच इतर शासकीय व निमशासकीय कर्मचारी किंवा अधिकारी कोणीही असू शकेल. माहिती देणाऱ्या व्यक्ती बद्दल गुप्तता ठेवण्यात येईल.
गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व लिंग निदान कायद्याचा भंग होत असल्याचे निदर्शनास आल्यास हेल्प लाईन क्र.1800-233-4475 किंवा www.amchimulagi.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी, अथवा जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, यवतमाळ यांना कळवावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्स डॉ. तरंगतुषार वारे यांनी केले आहे.
____________________________________
गेल्या 24 तासात एक पॉझिटिव्ह ; तीन कोरोनामुक्त
यवतमाळ दि. 24 डिसेंबर : गेल्या 24 तासात जिल्ह्यात एक नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले तर तीन जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यात 11 झाली आहे.
जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 803 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी एक अहवाल पॉझिटिव्ह असल्याने उर्वरित 802 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. आज पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये आर्णी येथील एका पुरूषाचा समावेष आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72974 आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 71175 आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1788 मृत्यूची नोंद आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत सात लक्ष 79 हजार 268 चाचण्या झाल्या असून त्यापैकी सात लक्ष सहा हजार 212 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 9.36 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी 0.12 आहे तर मृत्यूदर 2.45 आहे.
जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1768 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 7 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 1769 आहे. यापैकी 1 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 1768 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 787 बेडपैकी 1 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 786 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 755 बेडपैकी पुर्ण 755 बेड शिल्लक आणि 7 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 227 बेडपैकी पुर्ण 227 बेड शिल्लक आहेत.
