आकोली प्रतिनिधी सचिन चावरे
मदनी, खैरी शेत शीवारात वाघाचा धुमाकूळ
वन्य प्राण्यांचाही मोठ्या प्रमाणात वावर
गेल्या पंधरा दिवसापासून मदनी आमगाव परिसरातील खैरी, मदना,मदनी शिवारात वाघाचा वावर असून बरेचदा शेतकऱ्यांना वाघाचे दर्शन होत असल्याने या परिसरतील नागरिक दहशतीखाली वावरत असल्याचे दिसून येते. परिसरातील शिवारामध्ये पंधरा दिवसापासून वाघाची डरकाळी शेतकऱ्यांना सतत ऐकू येत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून परिसरातील बऱ्याच शेतकऱ्यांनी शेतात रात्रीला शेतपिक राखणीला जाणे बंद केले असल्याचे सांगितले जाते. भीतीपोटी शेत पिक रामभरोसे असल्याचे दिसून येते. आठवड्याभरापूर्वी याच शिवारात जंगलालगत वाघाने हरिनीचा फाडशा पाडला होता. बरेचदा अधून मधून शेतकऱ्यांना वाघाचे दर्शनही होत असल्यामुळे काही शेतकरी शेतात जात नाही. वाघाच्या दहशतीमुळे मजूरही मिळत नसल्याने शेतकरी हतबल झालेले दिसून येतात.शेतात सध्या भाजीपाला, चना, गहू कपाशी, ऊस ही पिके हयात आहे . तर तूर पिक कापणीला आले असून वाघाच्या भीतीपोटी शेतात मजूर जाणे टाळतात. मात्र, वन्य प्राण्यांचे सुगीचे दिवस असल्याचे दिसून येते आहे . भरदिवसा रानडुकरांचा कळप, व वानरांचा धुमाकूळ असतो. रात्रीला बरेच शेतकरी जीव मुठीत धरून एकमेकांच्या मदतीने शेत राखणीला जात असल्याचे दिसून येते. मात्र, दरम्यान परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी वनविभागाला वाघ असल्याबाबत माहिती देण्यात आली होती. ज्या परिसरात वाघाचे दर्शन झाले, त्या ठिकानाची गावकऱ्यांनी वाघा बाबत वन विभागाला माहिती देण्यात आली होती.वनरक्षक परबत मॅडम ,शिपाई रवींद्र बैस,तसेच पोलिस पाटील योगेश खेडकर, नारायण खेडकर ,परमेश्वर सुरजुसे,यादव भोंडे,मनोहर तेलतुंबडे,तसेच गावकऱ्या सोबत वाघाचा वावर असणाऱ्या शिवारातील ठिकाणी पायदळ पाहणी करण्यात आली होती.
परबत मॅडम वनरक्षक ..नागरिकानी तसेच शेतकऱ्यांनी स्वतःची काळजी घेऊन सतर्क रहावे असे आवाहन केले.जर वाघ अढळल्यास आम्हाला कळवा. आमची चमू 24 तास तयार आहे असे वन रक्षक यांनी सांगितले.
मनोहर तेलतुंबडे शेतकरी ….आज 18 तारखेला सकाळी सहा वाजता शेतात जात असताना तीस फूट अंतरावर माझ्या शेतात वाघाची डरकाळी ऐकू आली असल्यामुळे मी घाबरून घरी आलो. मात्र, वाघाचा परिसरात धुमाकूळ असल्यामुळे मी पंधरा दिवसापासून शेतात जान्याची जोखीम घेत नाही व मजूरही शेतात येण्यास तयार होत नाही. परिसरातील बऱ्याच शेतकऱ्यांना वाघाचे दर्शन होत असल्याने हा परिसर दहशतीखाली आहे. या वाघाने परिसरातील बऱ्याच नागरिकांना दर्शन दिले. यामुळे नागरिक शेतात जाण्यासाठी घाबरत असून शेतातील कामे त्यामुळे खोळंबली आहेत.
