Home यवतमाळ उत्तर वाढोणा येथे साकारणार तिन्ही संरक्षण दलाच्या वस्तूंचे संग्रहालय उभारा – आ....

उत्तर वाढोणा येथे साकारणार तिन्ही संरक्षण दलाच्या वस्तूंचे संग्रहालय उभारा – आ. संजय राठोड

11

उत्तर वाढोणा येथे साकारणार तिन्ही संरक्षण दलाच्या वस्तूंचे संग्रहालय उभारा – आ. संजय राठोड

विद्यार्थ्यांना देशसेवेची प्रेरणा मिळावी यासाठी संरक्षण मंत्रालयाशी पत्रव्यवहार

यवतमाळ – नेर तालुक्यातील शहीद किशोर कुनगर यांच्या स्मृती निरंतर जपल्या जाव्या आणि त्यांच्यासह देशाच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या शौयातून विद्यार्थ्यांना देशसेवेची प्रेरणा मिळावी, या हेतूने उत्तर वाढोणा येथे संरक्षण मंत्रालयाच्या सहकार्याने तिन्ही दलाच्या वस्तूंचे संग्रहालय उभारण्याची ग्वाही आमदार संजय राठोड यांनी दिली. शुक्रवार, १७ डिसेंबर रोजी शहीद किशोर कुनगर यांच्या १९व्या शहीद दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी बोलताना संजय राठोड म्हणाले, सीमेवर अत्यंत कठीण परिस्थितीत भारतीय सैन्य देशाच्या संरक्षणासाठी आपले प्राण पणास लावतात. विद्यार्थ्यांना सैनिकांच्या या शौर्याची जाणीव शालेय जीवनात होणे आवश्यक आहे. या जाणीवेतून विद्यार्थ्यांमध्ये देशसेवेची प्रेरणा नक्कीच निर्माण होईल. त्यामुळेच उत्तर वाढोणा येथे संरक्षण दलाच्या सहकार्याने सैन्यदलासह तिन्ही दलातील वस्तूंचे संग्रहालय निर्माण करण्याचा मानस आहे. त्यासाठी केंद्रीय संरक्षण मंत्रालयास व राज्य सरकारला पत्र देण्यात आले असून, पाठपुरावा सुरू आहे, असे आ. राठोड यांनी सांगितले. पुलगाव, वाडी (नागपूर), भंडारा आदी ठिकाणच्या आयुध निर्माणी विभागांमधून सैन्य वापरत असलेल्या विविध वस्तू या संग्रहालयासाठी मिळाव्या यासंदर्भात पत्रव्यवहार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. उत्तर वाढोणा येथील शहीद किशोर कुनगर स्मारकात सध्या देशसेवेसाठी प्राणाची आहुती देणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यातील वीरपुत्रांच्या प्रतिमा लावण्यात आल्या आहेत. भविष्यात येथे संरक्षण दलातील वस्तूंचे संग्रहालय निर्माण झाल्यास जिल्ह्यासह विदर्भातील विद्यार्थ्यांना मोठी प्रेरणा या गावातून मिळेल, असे ते म्हणाले.

 

यावेळी वीरमाता लिलाबाई कुनगर, शिवसेना तालुका प्रमुख मनोज नाल्हे सरपंच डॉ. सुमित खांदवे, उपसरपंच महादेव चव्हाण, सचिव जी. व्ही.राऊत, पोलीस पाटील दिनेश पारधी, रवी चव्हाण, ग्रमापंचयायत सदस्य मीना खांदवे, रेखा  काटगळे, मीरा  पांडे,  अनिता राठोड, प्रज्ञा मेश्राम, निशांत क्षीरसागर, दत्ता कोमटी, रोजगार सेवक रामकृष्ण लोखंडे, सदाशिव मानकर, संतोष भगत, राहुल गुरड, अनिल खांदवे, उमेश कोळेकर, धनराज मेश्राम, भास्कर मेश्राम, अमित काटगळे, भूषण खांदवे, ओम नंदनवर, मयूर गंथळे, शुभम क्षीरसागर, शुभम राऊत, अतूल रायकुवार, शिवा शिंदे, अजय चव्हाण, रमेश राऊत, दिनेश मेश्राम, विष्णू खाडे, आकाश राऊत आदी उपस्थित होते. यावेळी सर्वांनी शहीद किशोर कुनगर यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी वीरमाता लिलाबाई कुनगर यांचा शाल व श्रीफळ देऊन आ. संजय राठोड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अभिवादन सोहळ्याला गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बॉक्स
सीमावर्ती भागात विद्यार्थ्यांसाठी स्थळभेट उपक्रम सुरू व्हावा
आपले सैन्य कुठे व कशा भीषण परिस्थितीत काम करते शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना कळणे आवश्यक आहे. यासाठी केंद्र व राज्य सरकारने सवलतीच्या दरात विद्यार्थ्यांना सीमावर्ती भागात अभ्यास दौऱ्यांवर पाठवावे. या भागातील जनजीवन किती कठीण आहे, तेथील सामान्य माणसांचे जगणे हा सर्व अुनभव विद्यार्थ्यांना मिळावा. यासाठी सरकारने स्थळभेट उपक्रम सुरू करून यात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर गुण द्यावे, अशी मागणी आपण केंद्र व राज्य सरकारकडे प्रस्तावाद्वारे सादर करणार असल्याचे आ. संजय राठोड यांनी सांगितले. या उपक्रमातून देशसेवेची प्रेरणा, राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागेल असे ते म्हणाले.
सोबत फोटो – शहीद किशोर कुनगर यांच्या पुतळ्यास पुष्पच्रक्र वाहून अभिवादन करतेवेळी आ. संजय राठोड व मान्यवर

Copyright ©