जिल्ह्यात सात लाख कोविड चाचण्या निगेटिव्ह
गेल्या 24 तासात दोन पॉझिटिव्ह ; दोन कोरोनामुक्त
जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1765 बेड उपलब्ध
यवतमाळ दि. 17 डिसेंबर : जिल्ह्यात आतापर्यंत सात लक्ष 73 हजार 412 कोविड चाचण्या करण्यात आल्या असून त्यापैकी सात लक्ष 343 चाचण्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. मागील 24 तासात जिल्ह्यात दोन नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले तर दोन जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यात 21 व बाहेर जिल्ह्यात तीन अशी एकूण 24 झाली आहे.
जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 606 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी दोन अहवाल पॉझिटिव्ह असल्याने उर्वरित 604 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. आज पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये यवतमाळ येथील एक पुरूष व एका महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72970 आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 71158 आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1788 मृत्यूची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 9.43 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी 0.33 आहे तर मृत्यूदर 2.45 आहे.
जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1765 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 7 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 1769 आहे. यापैकी 4 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 1765 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 787 बेडपैकी 4 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 783 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 755 बेडपैकी पुर्ण 755 बेड शिल्लक आणि 7 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 227 बेडपैकी पुर्ण 227 बेड शिल्लक आहेत.
__________________________________
नगर पंचायत निवडणूक :
मतदान व मतमोजणीनिमित्त 20 ते 22 डिसेंबरला मद्यविक्रीस मनाई
यवतमाळ दि. 17 डिसेंबर : जिल्ह्यातील महागाव, कळंब, बाभुळगाव, राळेगाव, मारेगाव, झरी जामणी, ढाणकी नगर पंचायती निवडणुकासाठी 21 डिसेंबर रोजी मतदान आणि 22 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. त्याअनुषंगाने निवडणूक असलेल्या नगरपंचायतीच्या निर्वाचन क्षेत्रात मतदानाच्या अगोदरच्या दिवशी दिनांक (20 डिसेंबर), मतदानाच्या दिवशी (21 डिसेंबर) व मतमोजणीच्या दिवशी (22 डिसेंबर 2021 रोजी) मद्यविक्री करण्यास मनाई करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले आहेत.
आदेशाचा भंग करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकांवर कडक कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नुमुद आहे.
_________________________________
परिक्षा केंद्र परिसरात कलम 144 लागू
* 2 जानेवारी 2022 रोजी राज्य सेवा पूर्वपरीक्षा
यवतमाळ दि. 17 डिसेंबर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य सेवा पूर्वपरीक्षा 2 जानेवारी 2022 रोजी यवतमाळ मुख्यालयाच्या ठिकाणी विविध परीक्षा केंद्रावर आयोजित करण्यात आली आहे. या केंद्राच्या ठिकाणी परीक्षा सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून परिक्षेच्या दिवशी सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून फौजदारी प्रक्रिया संहिताचे कलम 144 लागू करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी अमोल येडगे यांनी निर्गमित केले आहे.
या आदेशानुसार परीक्षा केंद्राच्या ठिकाणी परीक्षार्थी व परिक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी व कर्मचारी व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस परिक्षा केंद्राच्या परिसरात प्रवेश करता येणार नाही. तसेच परिक्षा कालावधीत परिक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात झेरॉक्स केंद्र चालु ठेवण्यास प्रतिबंध राहील, असे आदेशात नमुद आहे.
__________________________________
पुसद उपविभागात कलम 144 नुसार जमावबंदी
यवतमाळ दि. 17 डिसेंबर :
पुसद येथे विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांकडून अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची तसेच सार्वजनिक तथा शासकीय व खाजगी मालमत्तेचे नुकसान होण्याची शक्यता लक्षात घेता पुसद उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे कार्यक्षेत्रातील ग्रामीण व शहरी भागामध्ये फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी प्रतिबंधात्मक आदेश निर्गमित केले आहे.
सदर जमावबंदी आदेश दिनांक 17 डिसेंबर 2021 ते पुढील आदेशापर्यंत लागू राहतील. जमावबंदीच्या कालावधीत पाच किंवा पाचपेक्षा जास्त व्यक्तींच्या जमावास प्रतीबंध राहील. कोणत्याही प्रकारच्या रॅली, धरणे, आंदोलने, मोर्चा इ.चे आयोजन करता येणार नाही. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.
________________________________
महिला लोकशाही दिन 20 डिसेंबरला
यवतमाळ दि. 17 डिसेंबर :: चालू महिन्यातील जिल्हा महिला लोकशाही दिनाचे आयोजन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 20 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील बळीराजा चेतना भवन (बचत भवन) येथे करण्यात आले आहे.
तक्रारग्रस्त महिलांनी त्यांच्या तक्रारी प्रथम दर महिन्याच्या चौथ्या सोमवारी आयोजित होणाऱ्या तालुकास्तरावरील लोकशाही दिनात मांडाव्यात. सदर तक्रारीवर संबंधीत विभागाकडून विहित कालावधीत निरसन न झाल्यास सदर तक्रार जिल्हा महिला लोकशाही दिनात तालुकास्तरीय लोकशाही दिनात केलेले अर्ज व टोकन क्रमांकासह दाखल करावी.
लोकशाही दिनात न्यायप्रविष्ठ प्रकरणे, विहित नमुन्यात नसलेला व आवश्यक कागदपत्रे न जोडलेला अर्ज तसेच सेवाविषय, आस्थापनाविषयक, वैयक्तिक स्वरूपाचे निवेदन व तक्रारी स्विकारल्या जाणार नाही, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ज्योती कडू यांनी कळविले आहे.
________________________________
मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीचे अर्ज 31 जानेवारीपुर्वी सादर करा
समाजकल्याण विभागाचे आवाहन
यवतमाळ दि. 17 डिसेंबर :: समाज कल्याण विभागामार्फत अनुसूचित जाती, इतर मागास वर्ग, विजाभज व विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयामार्फत मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, फ्रिशिप, विद्यावेतन व छत्रपती राजर्षी शाहु महाराज गुणवत्ता शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात येतो. सदर सर्व योजनांतर्गत स्टेट डिबीटी च्या https://mahadbt.gov.in या संकेतस्थळावर लाभार्थ्यांचे आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न करून सन 2021-22 चे परिपुर्ण अर्ज जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी दिनांक 31 जानेवारी 2022 पुर्वी मुळ टि.सी. सह सादर करावे. विद्यार्थी सदर लाभापासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी महाविद्यालयांची राहील. तसेच पात्र विद्यार्थ्यांकडून शुल्क घेता येणार नाही. संबंधीत विद्यार्थ्यांनीसुद्धा अर्जाची नोंदणी करून अर्ज महाविद्यालयास सादर करावे, असे आवाहन समाज कल्याण कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त भाऊराव चव्हाण यांनी केले आहे.
