दिव्यांगांना आत्मसन्मान मिळवून देऊन स्वयंपूर्ण करण्याच्या दृष्टीने सर्व समाजाने पुढाकार घ्यावा.
ग्रामसेवक- विजयकुमार ठेंगेकर
वरुड भक्त येथे दिव्यांग मेळावा संपन्न
शारीरिक किंवा मानसिक दृष्ट्या विकलांग बनलेल्या समाजातील दिव्यांगांच्या समस्या व अडचणी समजावून घेऊन त्यांना आत्म सन्मान मिळवून देऊन स्वयंपूर्ण करण्याच्या दृष्टीने सर्व समाजाने पुढाकार घ्यावा. व दिव्यांगांचा आत्मविश्वास दृढ करावा असे आवाहन ग्रामसेवक विजयकुमार ठेंगेकर यांनी केले.
आर्णी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या वरुड भक्त येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून दिव्यांगांच्या मेळाव्याचे आयोजन ग्रामपंचायत कार्यालयात करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते.
अपंगांचे प्रश्न जाणून घेऊन त्यांच्या उद्धारासाठी हातभार लागावा तसेच समाजातील अन्य लोकांना प्रेरणा मिळावी म्हणून हा दिवस पाळला जात असल्याचे सांगून दिव्यांगांचा आत्मसन्मान वाढविण्यासाठी शाळा, कॉलेज, सरकारी-खाजगी-निमसरकारी संस्थांतर्गत आयोजित उपक्रमात सहभागी करून घेणे, विविध प्रचार मोहिमा आयोजित करून अपंगाच्या प्रश्नांना वाचा फोडणे. त्यांना सहकार्य करणे, अपंग बांधवांच्या ठायी असलेल्या छुप्या कलागुणांचा साक्षात्कार होण्यासाठी उत्सव-मेळावे भरविणे आणि त्यांची जगण्याची उभारी वाढविणे, अपंगांच्या उद्धारासाठी जागतिक स्तरांवरची नियमावली कटाक्षाने पाळली जात नसेल तर त्यासाठी काटेकोरपणे दक्षता घेऊन अंमलबजावणीच्या दृष्टीने प्रयत्न करणे महत्त्वाचे असल्याचेही ते म्हणाले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच अरविंद चव्हाण, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून ग्रामसेवक विजयकुमार ठेंगेकर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य सौ. निता काळे, सौ. मंजुषा खराबे, सौ. रंजना शिरगरे, सौ. मंदा भुरले व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी दिव्यांग बांधवांशी सविस्तर चर्चा करण्यात येऊन विविध योजनांसह स्थानिक स्वराज्य संस्थेद्वारे करावयाचे 5% निधीचे नियोजन यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजयकुमार ठेंगेकर तर आभार प्रदर्शन गणेश राठोड यांनी केले. या कार्यक्रमास ग्रामस्तरावरील सर्व दिव्यांग उपस्थित होते.
