मुस्लिम कब्रस्थानसाठी आमदार कायंदे यांच्याकडून १० लक्ष रुपये मंजूर : मुस्लिम तरुणांच्या मागणीला यश
🔸असलम अंजुम 🔸
साखरखेर्डा : (दि. १२ एप्रिल) येथील मुस्लिम तरुणांनी आमदार मनोज कायंदे यांच्याकडे मुस्लिम कब्रस्थानसाठी भरीव निधीची मागणी केली होती. त्या मागणीचे फलीत म्हणून आमदार निधीतून १० लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून काल दि. ११ एप्रिल रोजी आमदार कायंदे यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघातून आमदार मनोज कायंदे हे निवडून आल्यानंतर गतवर्षी स्थानिक मुस्लिम तरुणांनी आमदार कायंदे यांचे विश्वासू सहकारी मित्र आशिष पोंधे यांच्या माध्यमातून पिंपळगाव सोनारा रोडवरील मुस्लिम कब्रस्थानच्या संरक्षण भिंत, पेव्हर ब्लॉक आणि इतर विकासात्मक कामांसाठी निधीची मागणी केली होती. आशिष पोंधे यांनी आमदार कायंदे यांच्याकडे सतत पाठपुरावा करुन त्यांच्या विशेष निधीतून ₹ १० लक्ष रुपयांचा निधी मंजूर करुन घेतल्याने मुस्लिम समाजाच्या वतीने आमदार मनोज कायंदे आणि आशिष पोंधे यांचे सहृदय आभार व्यक्त करण्यात येत आहे. गावांतील काजी आणि रोहीले वगळता मुस्लिम समाजातील बहुसंख्य मयतींचा याच कब्रस्थानमध्ये दफनविधी केल्या जातो. इस्लाम धर्मात मयत व्यक्तीचा नमाज – ए – जनाजा हा दफनविधी क्रियेचा महत्वपूर्ण भाग असून त्यासाठी सुमारे ८ वर्षांपूर्वी स्व. शफी कादरीने स्वखर्चातून सभागृह बांधण्यास सुरुवात केली होती मात्र त्यांच्या अकाली निधनाने ते काम अपूर्णावस्थेत पडून होते. आता त्याच अपूर्णावस्थेत पडून असलेल्या कामास आमदार मनोज कायंदे यांच्या विशेष निधीमुळे (₹ १० लक्ष) गती मिळणार असल्याने मो. समीउलहक, आबीद पठाण, राजिक शेख कमर, बब्बू तांबोळी, शेख गफ्फार, जरीन ठेकेदार, असलम शाह, शोएब खान आदी तरुणांनी भूमिपूजन प्रसंगी उपस्थित राहून आमदार कायंदे आणि आशिष पोंधे यांचे समाजाच्या वतीने आभार व्यक्त केले आहे. यावेळी आशिष पोंधे, दे. राजाचे माजी नगराध्यक्ष संतोष खांडेभराड, माजी उपसभापती सुनील जगताप, शिवराम मुदमाळी, अक्षय ठाकरे,दिलीप इंगळे, सुजीत बेंडमाळी, दादाराव गवई आदी मान्यवर उपस्थित होते.