Home महाराष्ट्र महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती धूमधडाक्यात साजरी

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती धूमधडाक्यात साजरी

41

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती धूमधडाक्यात साजरी

🔸असलम अंजुम 🔸

साखरखेर्डा : (दि. १४ एप्रिल ) स्थानिक भीमजयंती उत्सव समितीच्या वतीने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मोठ्या उत्साहात नि धूमधडाक्यात साजरी करण्यात आली.
सकाळी ९ वाजता भव्य मोटारसायकल रॅली आणि १० वाजता भीमनगरात भव्य कार्यकमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ठाणेदार गजानन करेवाड हे होते.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ.श्रीराम गवई यांनी बुद्धपूजा, त्रिशरण पंचशील आणि महामानवाला वदंन करुन केली. यावेळी भीमजयंती उत्सव समितीच्या वतीने ठाणेदार करेवाड आणि उपस्थित सर्वच मान्यवरांचे शाल – पुष्पगुछ देऊन स्वागत करण्यात आले. दरम्यान कृतिका अनिल मोरे ह्या विद्यार्थिनीने विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर विस्तृत असे विचार मांडले तर शिक्षक अशोक गवई यांनी कवी किरण यांचे
” राहीन लहान्या खोलीत केला अभ्यास रस्त्यावर
नाही खुर्ची – टेबल कधी बसला पोत्यावर
नाही भीमानं ठेवली कधी सुपारी दातावर
पहा आजचे पुढारी बस्ती दारु गुत्त्यावर “
हे बाबासाहेबांवर लिहलेले गीत गाऊन सर्व उपस्थितांच्या टाळ्या घेतल्या.
या कार्यक्रमास सर्वधार्मीय नेतेमंडळी तसेच समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजू ठोके, संचालन सुभाष गवई आणि दर्शनकुमार गवई यांनी केले. तर आभार प्रदर्शन भीमजयंती उत्सव समितीचे
अध्यक्ष आकाश श्रीमंत गवई यांनी मानले.
दुपारी ३ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळून भीमजयंतीची भव्य -दिव्य अशी मिरवणूकही काढण्यात आली. सजविलेल्या रथात भगवान गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे अर्धाकृती पुतळे सजविण्यात आले होते. डीजेच्या तालावर “उद्धरली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे” अशा भीमगीतांच्या तालावर तरुणाई अक्षरशः बेभान होऊन नाचत होती. तर दुसरीकडे लहान चिमुकल्यांच्या लेझिम आणि महिला मंडळाच्या टिपरी पथकानेही मिरवणूकीत चांगलीच रंगत आणली होती. मिरवणूक गुजरी चौकात येताच डीजेत ” चला… चला… रे चला मेरे ताज का संदल… ” हे गाणे वाजताच मुस्लिम तरुणांनीही चांगलाच ठेका धरला होता. मिरवणूकीत सर्वधार्मीय लोक हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते. एकंदरीत बाबासाहेबांची जयंती धूमधडाक्यात साजरी करण्यात अली. ठाणेदार गजानन करेवाड यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

Copyright ©