संतांचा अवतार समाजाला आरसा दाखवण्यासाठी
-सिध्दचैतन्य शिवाचार्य महाराज
साखरखेर्डा lप्रतिनिधी – संत ही व्याख्या वेगळी आहे. संत नैराश्य दूर होवून माणसात चेतना निर्माण करतात म्हणूनच संतांचा अवतार हा समाजाला आरसा दाखवण्यासाठीच निर्माण झाल्याचे मत जगद्गुरू पलसिध्द महास्वामी पिठाचे मठाधिपती सिध्दचैतन्य शिवाचार्य महाराज यांनी व्यक्त केले.
ते आज दि 5 डिसेंबर रोजी साखरखेर्डा येथे संतश्रेष्ठ सावता माळी यांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशरोहन सोहळ्याप्रसंगी बोलत होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संत सावता माळी यांचे अठरावे वंशज रविकांत वसेकर अरणगांव, प्रकाश महाराज मगर, माजी आमदार डॉ शशिकांत खेडेकर, माजी प्राचार्य संतोष दसरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दिलीपराव बेंडमाळी, ग्रामपंचायत सदस्य संदीप खिल्लारे, डॉ प्रशांत भालेराव, हे होते. प्रारंभी संत सावता माळी यांचे अठरावे वंशज ह भ प रविकांत वसेकर महाराज व सिध्दचैतन्य शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते संत सावता माळी यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कलशरोहन सोहळा संपन्न झाला. यावेळी वसेकर महाराज यांनी मंदिर बांधने सोपे असून पावित्र्य राखणे महत्त्वाचे असल्याचे सांगून संत सावता माळी यांचे विचार प्रकट केले. पुढे आपल्या आशीर्वचनात सिध्दचैतन्य शिवाचार्य महाराज म्हणाले की, संत ही वृत्ती – प्रवृत्ती आहे, साधना करताना सध वृत्तीशी स्पर्श झाला त्याला संत म्हणतात संतांचा आवतार समाजाला आरसा दाखवण्यासाठी निर्माण झालेला आहे. परमेश्वराचे आपण वंशज आहोत मात्र आपण संसारात गुंतल्याने विभक्त झालो. विश्वाचे अरण्य झाले असताना संत सावता माळी यांनी आध्यात्माचा मळा फुलविल्या. आपल्या कर्मात आणि कष्ठात त्यांनी परमेश्वर पाहिला आहे. संत संसारात जरी होते तरी तनानं परमार्थात होते. संत विवेक आणि जगण्याचा, राहण्याचा विचार देतात या पृथ्वी वर संतांचे खूप उपकार आहेत. संत होण्यासाठी देहरूपी काया झिजवावी लागते केवळ पूजा अर्चा करून चालत नाही कर्मामध्येच खरी भक्ती आहे. श्रम हीच पूजा आहे. जो कष्ट करतो त्याच्या मागे परमेश्वर असतो. माणसाचं शरीर समाजासाठी आध्यात्मासाठी राष्ट्रासाठी झिजलंच पाहिजे असे ते म्हणाले. यावेळी माजी आमदार डॉ शशिकांत खेडेकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले खेडेकर यांनी यावेळी अकरा हजार रुपयांची देणगी दिली.