दुचाकी चोर डोमा लोखंडेला अटक
यवतमाळ- घरासमोर उभी असलेली दुचाकी लंपास करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई शुक्रवार, दि. ३ डिसेंबरला ग्रामीण पोलिसांनी पार पाडली असून, ती दुचाकी जप्त केली. अविनाश उर्फ डोमा लंगोटे वय २४ वर्ष आणि रविराज चुटे वय ३४ वर्ष दोघेही रा. मोठे वडगाव यवतमाळ अशी त्या दोघांची नावे आहे. यवतमाळ तालुक्यातील रातचांदना येथील शेतकरी सेवकराम ब्राम्हणकर बुधवारी शेतातून दुचाकी घेवून घरी आले होते. त्यांनी आपली दुचाकी क्रमांक एमएच-३१-बीटी-४३३३ घरासमोर उभी केली होती. अशात रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी ती लंपास केली. ही बाब सकाळी ब्राम्हणकर यांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने यवतमाळ ग्रामीण पोलिस ठाणे गाठून याबाबत तक्रार दाखल केली. या तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेता ठाणेदार किशोर जुनघरे यांनी तातडीने गुन्हे नोंदवून चोरट्यांच्या मुसक्या आवळण्याच्या सूचना दिल्या. त्यावरून चोरट्यांनी शोधमोहीम सुरू केली असता ते सराईत गुन्हेगार अविनाश लंगोटे आणि रविराज चुटे असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान पोलिसांनी त्या दोघांना अटक करून ती दुचाकी जप्त केली. या चोरट्यांकडून अनेक दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
