Home यवतमाळ पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन

पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन

37

गेल्या 24 तासात नवीन पॉझिटिव्ह नाही

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2169 बेड उपलब्ध

 

यवतमाळ दि. 26 नोव्हेंबर : गेल्या 24 तासात जिल्ह्यात नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले नाही तसेच कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या देखील निरंक आहे. सध्या ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यात पाच आहे.

जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 264 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह नसल्याने सर्व 264 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72927 आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 71135 आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1787 मृत्यूची नोंद आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत सात लक्ष 64 हजार 405 चाचण्या झाल्या असून त्यापैकी सहा लक्ष 91 हजार 446 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 9.54 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी 0.0 आहे तर मृत्यूदर 2.45 आहे.

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2169 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 16 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 2174 आहे. यापैकी 5 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 2169 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 787 बेडपैकी 5 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 782 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 755 बेडपैकी पुर्ण 755 बेड शिल्लक आणि 16 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 632 बेडपैकी पुर्ण 632 बेड शिल्लक आहेत.
अभ्यासिकेच्या माध्यमातून प्रशासकीय सेवेत यवतमाळचा टक्का वाढावा

– पालकमंत्री संदिपान भुमरे

 

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अभ्यासिका सुरू

यु.पी.एस.सी. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार

 

 

यवतमाळ दि. 26 नोव्हेंबर : यवतमाळ येथे नव्याने तयार करण्यात आलेली डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अभ्यासिका कोविड संसर्गामुळे गेल्या दोन वर्षापासून सुरू करण्यात आली नव्हती, आता मात्र ती सुरू करण्यात आली आहे. या अभ्यासिकेच्या माध्यमातून यु.पी.एस.सी. व एम.पी.एस.सी. तसेच इतर परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगली पुस्तके व मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे. विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेवून यश संपादन करावे व प्रशासकीय सेवेत यवतमाळचा टक्का वाढवून जिल्ह्याचे नाव उंचवावे, असे प्रतिपादन पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी या अभ्यासिकेच्या शुभारंभ प्रसंगी केले.

यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा कालिंदा पवार, आमदार मदन येरावार, जिल्हाधिकारी अमोल येडगे, नगराध्यक्षा कांचन चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी राजेंद्र कोरे प्रामुख्याने उपस्थित होते.

पालकमंत्री भुमरे यांनी यवतमाळ नगरपालीकेने अभ्यासिकेकरिता जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल व आ. मदन येरावार यांनी ते जिल्ह्याचे पालकमंत्री असतांना नाविण्यपुर्ण योजनेंतर्गत अद्यावत व देखणी अभ्यासिका शहराला दिल्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले. या अभ्यासिकेतून निश्चित चांगले विद्यार्थी घडल्याशिवाय राहणार नाही अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.

जिल्हा परिषद अध्यक्षा कालिंदा पवार यांनी गरिब विद्यार्थ्यांनादेखील या अभ्यासिकेचा उपयोग होईल असे सांगून अभ्यासामुळे एक विद्यार्थी पुढे गेला तर त्यांची पुढील पीढी सुधारण्यास मदत होते, असे सांगितले. तर आमदार मदन येरावार यांनी अभ्यासिकेतील अद्यावत सुविधांचा वापर करून येथील विद्यार्थी उत्तुंग शिखरावर पोहचावा तसेच त्याने अभ्यासासोबतच विवेकाची देखील जाणीव ठेवावी असे सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. जिल्हा प्रशासनाच्या सहयोगाने मुलांना अभ्यास करण्यासाठी व शहराच्या वैभवात भर घालणारी अभ्यासिकेच्या रुपात एक चांगली वास्तु येथे तयारी झाली आहे. अभ्यासिकेत संगणक कक्ष व मार्गदर्शनासाठी प्रशस्त हॉल उपलब्ध आहे. येथे दर आठवड्यात युपीएससी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे तसेच इतर वक्त्यांचे मार्गदर्शन सत्र ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येईल. स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी, एम.पी.एस.सी. व यु.पि.एस.सी. च्या मुख्य परिक्षा व मुलाखत साठी निवड होणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शनाचे व्यासपीठ अभ्यासिकेच्या माध्यमातून उपलब्ध होईल, असेही त्यांनी सांगितले.

याप्रसंगी यु.पी.एस.सी. परिक्षेत उत्तीर्ण झालेले जिल्ह्यातील विद्यार्थी स्नेहल ढोके, श्रीकांत मोडक, बंकेश पवार, डॉ. दीक्षा भवरे व दर्शन दुग्गड यांना महात्मा गांधींची मुर्ती, शाल व श्रीफळ देवून त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी जिल्हा खनिकर्म अधिकारी ओंकारसिंग भोंड, अजय शिरसाट, अभ्यासिकेतील विद्यार्थी, ग्रंथालयाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
आय.आय.टी. साठी निवड झालेले पवन पवार व सुरज डांगे

यांचा जिल्हाधिकाऱ्यांतर्फे सत्कार

 

तुमच्या यशाने गावातील इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळो

 

यवतमाळ दि. 26 नोव्हेंबर : पांगरी ता. आर्णी येथील रहिवासी व दिग्रस येथे शिक्षण घेतलेले पवन पवार तसेच जवाहर नवोदय विद्यालयातील विद्यार्थी व बोरगाव माऊली येथील रहिवासी सुरज डांगे या दोघांची आय.आय.टी. शिक्षणासाठी निवड झाली आहे. त्यामुळे नुकतेच या दोघांचा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी त्यांच्या कक्षात सत्कार करून त्यांचे कौतुक केले. तुमच्या यशाने गावातील इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल. जास्तीत जास्त ज्ञान संपादन करा व गावातील लोकांसाठी आदर्श निर्माण करा, असेही जिल्हाधिकारी अमोल येडगे यावेळी म्हणाले.

या कौतुक सोहळ्याला दोन्ही विद्यार्थ्यांचे पालक व शिक्षक उपस्थित होते.

पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन

 

यवतमाळ दि. 26 नोव्हेंबर : नगर परिषद हद्दीतील विविध विकास कामांचे उद्घाटन आज पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते करण्यात आले.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वस्ती सुधार योजनेअंतर्गत नगर परिषद यवतमाळ हद्दीतील मौजा यवतमाळ येथील प्रभाग क्र. 2 मध्ये रमाई पार्क येथील काँक्रीट नाली व रस्ता बांधकाम, यवतमाळ शहर प्रभाग क्रमांक 16 मधील शिवनेरी सोसायटी येथील काँक्रीट नालीचे बांधकाम, सिंघानिया नगर येथील काँक्रीट नाली बांधकाम. जाजू चौक, शहर प्रभाग क्रमांक 18 येथे रस्ता डांबरीकरण, तसेच यवतमाळ शहर प्रभाग क्रमांक 24 वडगाव येथील रस्ता रूंदीकरण व डांबरीकरण कामाचे उद्घाटन पालकमंत्री यांनी केले.

यावेळी नगरराध्यक्षा कांचन चौधरी, नगरपरिदेच्या मुख्याधिकारी माधुरी मडावी, अभियंता वाय. देशमुख तसेच विविध संघटनेचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

Copyright ©