अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या – आ. संजय राठोड
-खरीप पिकांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे व्हावे
यवतमाळ- सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातात आलेले खरिपाच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले. या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून, नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी आमदार संजय राठोड यांनी केली आहे.
यावर्षी मान्सून वेळेत दाखल झाला. त्यानंतरही पिकांना अवश्यक असलेला पाऊस जिल्ह्यात झाला. त्यामुळे सोयाबीन, कापूस, उडीद, मुंग ही पिके जोमदार होती. मात्र गेल्या महिनाभरापासून जिल्ह्यात सतत पाऊस कोसळत आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. या पंधरवड्यात सर्वत्र अतिवृष्टी झाली आहे. नेर, दिग्रस, दारव्हासह अनेक तालुक्यात पिके खरडून गेली. अनेक ठिकाणी कापणीस आलेले सोयाबीन सडले, शेंगांना कोंब फुटले. बोण्डावर आलेली कपाशी आडवी झाली, बोण्ड सडली. यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड नुकसान सोसावे लागत आहे. या सर्व नुकसानीचे महसूल व कृषी विभागाने तत्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी आमदार संजय राठोड यांनी केली आहे.
या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रत्यक्ष भेटून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याबाबत निर्णय घेण्याची विनंती करणार असल्याचे आ. संजय राठोड यांनी सांगितले. तसेच विभागीय आयुक्तांसह, जिल्हाधिकाऱ्यांनाही पत्राद्वारे सूचना केल्याचेही त्यांनी सांगितले.
