गेल्या 24 तासात नवीन पॉझिटिव्ह नाही
जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2166 बेड उपलब्ध
यवतमाळ दि. 27 सप्टेंबर : गेल्या 24 तासात जिल्ह्यात नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले नाही तसेच कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या देखील निरंक आहे. सध्या ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यात तीन व बाहेर जिल्ह्यात तीन अशी एकूण सहा आहे.
जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 231 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह नसल्याने सर्व 231 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72878 आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 71085 आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1787 मृत्यूची नोंद आहे.
जिल्ह्यात आतापर्यत सात लक्ष 42 हजार 128 चाचण्या झाल्या असून त्यापैकी सहा लक्ष 69 हजार 248 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 9.82 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी 0.0 आहे तर मृत्यूदर 2.45 आहे.
जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2166 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 16 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 2174 आहे. यापैकी 8 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 2166 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 787 बेडपैकी 8 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 779 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 755 बेडपैकी पुर्ण 755 बेड शिल्लक आणि 16 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 632 बेडपैकी पुर्ण 632 बेड शिल्लक आहेत.
_______________________________________
नेहरू युवा केन्द्र स्वयंसेवकांनी प्रशासनाचा दुवा म्हणून काम करावे
– जिल्हाधिकारी अमोल येडगे
यवतमाळ दि. 27 सप्टेंबर : नेहरू युवा केंद्रातर्फे जनहिताचे अनेक कार्यक्रम राबविण्यात येतात, त्याअंतर्गत आता प्रत्येक गावातून प्लॅस्टीक कचरा जमा करून स्वच्छता मोहिम राबविण्यात येणार आहे. नेहरू युवा केंद्राच्या स्वयंसेवकांनी स्वच्छता मोहिमेत सक्रीय सहभाग नोंदवावा तसेच आपला जिल्हा रोगमुक्त, सुदृढ करण्याकरीता ग्रामीण भागात जेथे कोरोना लस घेणाऱ्यांची संख्या कमी आहे अशा भागातील शेतकरी व आदवासी नागरिकांना लसिकरणाचे फायदे समजावून सांगावे व लस घेण्याबाबत जनजागृती करून ग्रामीण जनता व प्रशासन यांच्यातील दुवा म्हणून काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.
नेहरू युवा केंद्राच्या जिल्हा सल्लागार समितीची सभा तसेच स्वच्छ भारत व कॅच द रेन या उपक्रमाची आढावा बैठक जिल्हाधिकारी येडगे यांच्या अध्यक्षतेखाली महसुल भवन येथे आज घेण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, नगरपालिका प्रशासन अधिकारी सतीश गावंडे, नेहरु युवा केन्द्राचे जिल्हा युवा अधिकारी सारंग मेश्राम व अनिल ढेंगे, अमोलकचंद विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या सुप्रभा यादगिरवार, वसंतराव नाईक विद्यालयाच्या प्राचार्य प्रविणा आडे, लिड बैंकअधिकारी एल.यु. गजभिये आदि प्रामुख्याने हजर होते.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्य दिनांक 02 ऑक्टोंबर 2021 रोजी फ्रिडम रन या कार्यक्रमाचे आयोजन सकाळी 8 वाजता आझादमैदान, यवतमाळ येथून करण्यात येणार आहे. या जिल्हास्तरीय फ्रिडम रन मध्ये ज्या युवकांनी कोविडच्या दोन्ही लस घेतल्याअसतील त्यांनाच यात सहभागी करण्यात यावे व पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून कार्यक्रमाला सुरवात करण्यात यावी असे बैठकीत ठरविण्यात आले. तसेच स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमित्त 75 कि.मी. सायकल रनिगचे आयोजन करण्यासंबंधात नियोजन करावे असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
दिनांक 01 ते 31 ऑक्टोबर 2021 या दरम्यान स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील प्रत्येक गावातून किमान 30 किलो प्लॅस्टीक कचरा गोळा करावयाचे आहे अशी माहिती जिल्हा युवा अधिकारी मेश्राम यांनी बैठकीत दिली असता स्वच्छतेकरिता स्थानिक नगरपरिषद, ग्रामपंचायत, स्वयंसेवी संस्था यांचे सहकार्य घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या. तसेच युवा मंडळ, महिला मंडळ, बचत गट, स्थानिक व्यापारी संघटना, आणि इतर सर्व सामाजीक संस्थांनी देखील स्वयंप्रेरणेने सहकार्य करावे, असे सांगितले.
पावसाचे पडणारे पाण्याची जपणूक करून त्याचा वापर करण्याबाबत ‘कॅच द रेन’ या थिमवरील पोस्टरचे अनावर जिल्हाधिकारी यांचे हस्ते बैठकीत करण्यात आले.
बैठकीला प्रदिप धर्माधिकारी, डॉ. दिपक कुटे, प्रिती दास, किरण ठाकरे, डॉ. प्रषांत चव्हाण, निलीमा पाटणकर, गजानन गायकवाड, कविता पवार, अभिजीत राजहंस, भावेष श्रीराव, उद्देष ढेंगे, कु. स्वाती ठेंगणे, सुभाश गिरी, संगम वाघमारे उपस्थित होते.
_______________________________________
भाडेपट्टे व सेवा कंत्राट दस्तावरील थकीत मुद्रांक रकम शासनजमा करा
– जिल्हाधिकारी अमोल येडगे
यवतमाळ दि. 27 सप्टेंबर : भाडेपट्टे व सेवा कंत्राटाच्या दस्तांवरील थकीत मुद्रांकाची रकम अद्याप ज्यांनी सह जिल्हा निबंधक यांचे कार्यालयात जमा केलेली नाही त्यांचेकडे तपासणी पथके पाठवून देय असलेली रकम प्राप्त करावी व शासनजमा करून घेण्याची कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज दिले.
शासकीय जमीनी हस्तांतरण दस्त व करारपत्र किंवा बंधपत्र यावर देय होणाऱ्या मुद्रांक शुल्काबाबत आढावा सभा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली महसूल भवन येथे घेण्यात आली. यावेळी सहजिल्हा निबंधक आन.एन.चौधरी व मुद्रांक विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
शासनाद्वारे किंवा शासनाच्या वतीने शासकीय जमीन तथा स्थावर मालमत्ता भाडेपट्टयाने किंवा अन्य प्रकारे लाभार्थ्यांना हस्तांतरीत करतांना 100 रुपये किंवा त्यापेक्षा अधिक मुल्य असलेलेल्या स्थावर मिळकतीच्या हस्तांतरण दस्तावर मुद्रांक शुल्क देय आहे. तसेच शासकीय कार्यालये, महामंडळे, अभिकरणे इत्यादी मार्फत कामांचे आणि ती पार पाडतांना लागणाऱ्या कामगारांसाठीच्या सेवा कार्यकंत्राटाचे दस्त, प्रतिभुती बंधपत्र किंवा करार बंधपत्र यावर 10 लाखाचे किंमतीपर्यंत रुपये 500 व त्यापुढील रकमेच्या 0.1 टक्के रकम मुद्रांक शुल्क आकारणी करण्यात येते. ही मुद्रांक शुल्काची रकम संबंधीतांकडून वसूल करण्यात यावी, असे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी बैठकील सांगितले.



