यवतमाळ दि. 4 ऑगस्ट : जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज महागाव व उमरखेड तालुक्याला भेट दिली व दोन्ही ठिकाणी तालुक्यातील सर्व विभागांचे विभाग प्रमुखांची आढावा बैठक घेवून उपविभागातील कामकाजाचा आढावा घेतला तसेच प्रलंबित कामांचा निपटारा करण्याचे निर्देश दिले.
महगाव व उमरखेड तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण पुर्ण करण्याबाबत विशेषत: दुसरा डोज प्रलंबित असलेल्या नागरिकांचे समुपदेश करून त्यांना लसिकरणाचे दोन्ही डोज घेण्यासाठी तालुका आरोग्य यंत्रणेद्वारे आवाहन करण्याबाबत मार्गदर्शन व निर्देश दिले.
जिल्हाधिकारी यांनी सर्वप्रथम महागाव तालुक्यातील हिवरा येथे कोव्हिड लसिकरण शिबीराला भेट देवून पाहणी केली. केंद्रावर किती लसीकरण झाले, त्यामध्ये लसीची पहिली मात्रा व दुसरी मात्रा किती व्यक्तींनी घेतली व इतर सर्व बाबींची त्यांनी माहिती जाणून घेतली. तद्नंतर त्यांनी मौजा अंबोडा येथील प्रयागबाई दिगांबर हिंगाडे यांचे रेशीम शेती प्रकल्पाची पाहणी केली. तेथे त्यांनी रेशीम शेतीबद्दल शेतकऱ्यांशी संवाद साधून माहिती जाणून घेतली. तसेच नांदगव्हाण येथील रोप वाटीकेला भेट देवून तेथे वृक्ष लागवड केली.
उमरखेड जिल्हा आरोग्य केद्र येथेही जिल्हाधिकारी येडगे यांनी भेट देवून उपलब्ध आरोग्य सुविधांची पाहणी केली. अंबोरा येथील पर्यटन केंद्राच्या सुशोभिकरणाच्या कामाची पाहणी केली. जिल्हाधिकारी यांनी रुपाली रमेश शिंदे, सविता प्रविण काळे व अर्चना रमेश कदत या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटूंबियांना तहसिल कार्यालय येथे शासकीय मदतीच्या धनादेशाचे वाटप केले, तसेच नागेशवाडी येथील मयत शेतकरी देवराव सुरोसे यांच्या पत्नी गंगाबाई सुरोसे यांचे घरी प्रत्यक्ष भेट देवून रुपये एक लाख मदतीचा धनादेश दिला.
यावेळी तहसिलदार आनंद देवूळगावकर (उमरखेड), एन.जे. इसलकर (महागाव), तसेच महसूल, कृषी व आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
