Home Breaking News गेल्या 24 तासात दोन पॉझिटिव्ह ; दोन कोरोनामुक्त जीएमसी, डीसीएचसी व...

गेल्या 24 तासात दोन पॉझिटिव्ह ; दोन कोरोनामुक्त जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2159 बेड उपलब्ध

12

 

यवतमाळ दि. 4 ऑगस्ट : गेल्या 24 तासात जिल्ह्यात दोन नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले तर दोन जण कोरोनामुक्त झाले आहेत.

जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 485 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी दोन अहवाल पॉझिटिव्ह असल्याने उर्वरित 483 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात ॲक्टीव पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 17 व जिल्ह्याबाहेर दोन अशी आहे.

आज पॉझिटिव्ह आलेल्यामध्ये पुसद येथील एक व यवतमाळ येथील एका रुग्णाचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72811 आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 71008 झाली आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1786 मृत्युची नोंद आहे.

जिल्ह्यात आतापर्यत 7 लक्ष 1 हजार 482 चाचण्या झाल्या असून त्यापैकी 6 लक्ष 28 हजार 642 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 10.38 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी 0.41 आहे तर मृत्युदर 2.45 आहे.

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2158 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 16 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 2174 आहे. यापैकी 16 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 2158 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 787 बेडपैकी 13 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 774 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 755 बेडपैकी 2 बेड रुग्णांसाठी उपयोगात तर 753 बेड शिल्लक आणि 16 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 632 बेडपैकी 1 बेड रुग्णांसाठी उपयोगात तर 631 बेड शिल्लक आहेत.
______________________________________
पारधी समाजाच्या विकासात्मक योजनांसाठी अर्ज आमंत्रित

प्रकल्प अधिकारी पुसद यांचे पारधी समाजाला लाभ घेण्याचे आवाहन

यवतमाळ दि. 4 ऑगस्ट : जिल्हा वार्षीक आदिवासी उपयोजना सन 2020-21 अंतर्गत पारधी समाजाच्या विकासासाठी विविध योजनेंतर्गत लाभार्थींचे अर्ज कमी प्रमाणात प्राप्त झाल्यामुळे, तुषार सिंचन व ठिंबक संचाकरिता अर्थसहाय करणे, मोटार ड्रायव्हींगचे प्रशिक्षण देणे (अनिवासी), महिला/पुरष बचत गटास जलशुध्दीकरण प्रकल्प देणे या योजनांतर्गत पारधी जमातीच्या अर्जदारा कडुन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, पुसद यांचेकडे आणखी अर्ज मागविण्यात येत आहे.

तसेच जिल्हा वार्षीक आदिवासी उपयोजना सन 2019-20 अंतर्गत पारधी समाजाच्या सुशिक्षित बेरोजगार युवक/युवतींना मालवाहु ऑटोरिक्षा (बॅटरी वरील ) देणे करीता वाहन परवाना धारकांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. याशिवाय न्युक्लीअस बजेट योजना सन 2019-20 अंतर्गत आदिवासी शेतक-यांना 85 टक्के अनुदानावर रासायणीक खते, औषधी, बी-बीयाणे खरेदीसाठी अर्थसहाय करणे, आदिवासी बेरोजगार युवक-युवतींना 85 टक्के अनुदानावर मिनी झेरॉक्स मशिनचा पुरवठा करणे, आदिवासी युवक, युवतींना संगणकावर मराठी 30 श.प्र.मि.टंकलेखन व इंग्रजी 40 श.प्र.मि.टंकलेखन प्रशिक्षण देणे, चार चाकी वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देणे (अनिवासी) या योजने करीता इच्छुक प्रशिक्षण केंद्राकडुन (मोटार ड्रायव्हींग स्कुल) प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.

वरील योजनेचे लाभार्थ्यांचे अर्ज प्रकल्प अधिकारी, एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प, पुसद, जिल्हा यवतमाळ येथे दिनांक 9 ऑगस्ट 2021 ते 18 ऑगस्ट 2021 पर्यंत अर्ज वाटप करणे व अर्ज स्वीकारणे सुरु आहे. ज्यांनी आधी अर्ज केला आहे, त्यांनी परत अर्ज करु नये. तरी आवश्यक कागदपत्रांसह परिपुर्ण भरलेले अर्ज व प्रस्ताव दिनांक 18 ऑगस्ट 2021 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावेत, असे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, पुसद, चे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी कळविले आहे.
_____________________________________

गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ वेळीच अदा करा

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे विमा कंपनीला निर्देश

यवतमाळ दि. 4 ऑगस्ट : गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेची प्रकरणे तात्काळ निकालीत काढुन अपघातग्रस्त शेतकरी व त्यांचे कुटुंबास वेळीच लाभ अदा करण्यात यावा, अन्यथा उशिरा रक्कम दिल्याप्रकरणी दंड आकारण्यात येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी विमा कंपनीला दिले आहेत.

गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा आढावा जिल्हाधिकारी यांनी 2 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल सभागृहात घेतला. यावेळी अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, विमा कंपनीचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

शेतकरी अपघात विमा योजनेची प्रकरणे वेळेत निकाली निघण्याच्या दृष्टीने तहसीलदार यांचे अध्यक्षतेखालील शेतकरी आत्महत्या विषयक तालुका स्तरीय समितीने सदर विषयाचा आढावा घेउन संबंधीत विभागांकडून त्रुटींची पुर्तता करुन घेण्यात यावी, अशा सुचनाही जिल्हाधिकारी येडगे यांनी दिल्या.

शेती व्यवसाय करताना होणारे अपघात, विज पडणे, पूर, सर्पदंश, विंचू दंश, विजेचा शॉक बसणे इ.नैसर्गिक आपत्तिमूळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात, तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे होणारे अपघात, यामुळे बरेच शेतकरी यांचा मृत्यू ओढावतो किंवा काहींना अपंगत्व येते. अशा अपघातग्रस्त शेतकरी कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरिता गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरु करण्यात आलेली आहे. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील 10 ते 75 वयोगटातील महसूल नोंदी नुसार विमा पॉलिसी लागू झालेल्या तारखेस खातेदार असलेला शेतकरी व त्यांच्या कुटुंबातील वहितिधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले आई, वडिल, शेतकऱ्याची पत्नी, पती, मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणतीही एक व्यक्ती असे एकुण दोन जण पात्र आहेत. अपघाती मृत्यू झाल्या रु.2 लाख नुकसान भर्पाइची रक्कम देय आहे. तसेच अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन हात किंवा दोन पाय तसेच एक डोळा व एक हात किंवा एक पाय निकामी होणे यासाठी रु.2 लाख, अपघातामुळे 1 डोळा अथवा 1 हात किंवा एक पाय निकामी होणे यासाठी रु. 1 लाख देय आहे. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांना विमा हप्ता भरावा लागत नाही, सर्व शेतकऱ्यांच्या विमा हप्त्याची रक्कम शासनामार्फत विमा कंपनीस भरण्यात येते, अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर यांनी बैठकीत सादर केली.

सभेला जिल्हास्तरीय समिती सदस्य तसेच विमा कंपनी प्रतिनिधी उपस्थीत होते.

Copyright ©