Home यवतमाळ मानव विकास कार्यक्रमात रोजगाराच्या संधी निर्माण करणाऱ्या योजनांचा समावेश करा

मानव विकास कार्यक्रमात रोजगाराच्या संधी निर्माण करणाऱ्या योजनांचा समावेश करा

34

यवतमाळ दि. 2 ऑगस्ट : आदिवासी महिला, महिला शेतकरी तसेच कुमारी माता यांचेसाठी रोजगाराची संधी निर्माण होतील अशा प्रकारच्या नाविण्यपुर्ण योजनांचा समावेश मानव विकास कार्यक्रमांतर्गत करण्यात यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज दिल्या.

जिल्हा मानव विकास समितीची आढावा सभा आज जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल सभागृहात घेण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ललीतकुमार वऱ्हाडे, जिल्हा नियोजन अधिकारी (मानव विकास) अ.वि.सुने, सहाय्यक नियोजन अधिकारी सु.ज.केदार, अ.र.बावकर, माविम चे शैलेंद्र जिद्देवार, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल जाधव, कृषी विज्ञान केंद्राचे समन्वयक डॉ. एस.यु.नेमाडे, राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक श्रीनिवास जोशी प्रामुख्याने उपस्थित होते.

जिल्हाधिकारी येडगे पुढे बोलतांना म्हणाले की मानव विकास कार्यक्रमाअंतर्गत आरोग्य विभागाने ग्रामीण भागात आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करतांना एका पथकाद्वारे एका दिवशी वेगवेगळ्या गावात शिबीराचे आयोजन न करता प्रत्येक गावात संपुर्ण दिवस शिबीराचे आयोजन करावे, जेणेकरून सर्वांना त्याचा लाभ घेता येईल. त्यांनी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व दारिद्र्य रेषेखालील बाळांत महिलांना बुडित मजुरी वेळेवर देण्याच्या सूचना केल्या. ग्रामीण भागात मुलींना आठवी ते बारावी पर्यंत शिक्षण घेणे सोईचे व्हावे याकरिता गाव ते शाळा दरम्यान बस वाहतुकीसाठी राज्य परिवहन विभागाकडे ६३ बस उपलब्ध आहेत. ज्या भागात शाळा सुरू आहेत तेथे विद्यार्थींनींची मागणीनुसार या बसेस सुरू करण्यात याव्यात असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी विभाग नियंत्रक यांना दिले. मानव विकासच्या निधीतून जास्तीत जास्त अंगणवाडी इमारत पुर्ण करण्यात याव्या, असेही जिल्हाधिकारी यांनी सूचित केले.

जिल्हाधिकारी येडगे यांनी बैठकीत आरोग्य शिबीराचे आयोजन, गाव ते शाळा बस वाहतुक, सायकल वाटप, अंगणवाडी बांधकाम, कौशल्य विकासाच्या योजना तसेच नाविण्यपुर्ण योजनांचा आढावा घेतला.

यावेळी संबंधीत अधिकारी उपस्थित होते.

Copyright ©