Home यवतमाळ जनतेच्या तक्रारी सोडविण्यासाठी अधिकाऱ्यांनी लोकाभिमुख व्हावे

जनतेच्या तक्रारी सोडविण्यासाठी अधिकाऱ्यांनी लोकाभिमुख व्हावे

32

 

लोकशाही दिनात जिल्हाधिकारी यांचे अधिकाऱ्यांना आवाहन

यवतमाळ दि. 2 ऑगस्ट : शासकीय अधिकाऱ्यांनी जनतेच्या तक्रारी सोडवितांना मोघम उत्तर देवू नये, मुळ समस्यांच्या सोडवणूक करावी, प्रलंबित तक्रारींवर तातडीने कार्यवाही करावी तसेच जास्तीत जास्त लोकाभिमुख होवून कार्यालयात प्राप्त होणाऱ्या जनतेच्या तक्रारी प्राधाण्याने सोडवाव्या, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज लोकशाही दिनात शासकीय अधिकाऱ्यांना दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील बळीराजा चेतना भवन येथे आज लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते, याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी संगीता राठोड, भुसंपादन अधिकारी सविता चौधर, अधिष्ठाता डॉ. मिलींद कांबळे प्रामुख्याने उपस्थित होते.

लोकशाही दिनात आज एक स्विकृत व 29 अस्विकृत असे एकूण 30 तक्रार अर्ज प्राप्त झाले. प्राप्त झालेल्या तक्रारीमध्ये जिल्हा पुरवठा कार्यालय, जिल्हा परिषद, कृषी विभाग, पाटबंधारे, जिल्हा उपनिबंधक, नगरपालीका, विद्युत वितरण आणि महसूल इ. विभागासंदर्भात तक्रारी प्राप्त झाल्या. तसेच मागील लोकशाही दिनी प्रलंबित तक्रारीपैकी एक तक्रार निकाली काढण्यात आली.

ज्या विभागाकडे लोकशाही दिनातील तक्रारी प्रदीर्घ कालावधीपासून प्रलंबित आहे, त्या तातडीने निकाली काढण्यात याव्या, अशा सुचना जिल्हाधिकारी येडगे यांनी सर्व विभागांना दिल्या. लोकशाही दिनाच्या तसेच व आपले सरकार पोर्टलवरील प्रलंबित प्रकरणांचाही त्यांनी आढावा घेतला व सात दिवसात प्रकरणे निकाली काढण्याच्या सूचना केल्या.

जिल्हाधिकारी यांनी प्रत्येक कार्यालयात महिला तक्रार निवारण समिती गठीत झाले आहे का व त्या कार्यरत आहेत का याबाबत माहिती घेतली. तक्रारीचे निवारण करतांना शासनाच्या वेगवेगळ्या विभागात समन्वय राहावा व अडचणी सोडविण्यासाठी समन्वय समितीची मदत घेण्याचेही त्यांनी सांगितले

यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी पी.एस.चव्हाण, नगरपालीका प्रशासन अधिकारी सतिश गावंडे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अमर गजभीये, विविध विभागाचे विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचारी तसेच नागरिक उपस्थित होते.

____________________________________

लोकन्यायालयात 19 कोटी 87 लक्ष तडजोड मुल्याची 2330 प्रकरणे निकाली

यवतमाळ दि. 2 ऑगस्ट : यवतमाळ जिल्ह्यातील विविध न्यायालयात आयोजित राष्ट्रीय लोक अदालतमध्ये 1442 प्रलंबित व 888 वादपुर्व असे एकूण 2330 प्रकरणे आपसी तडजोडीने निकालात निघाली असून त्याचे तडजोड मुल्य रुपये 19 कोटी 87 लक्ष 89 हजार 22 आहे.

आपसी तडजोडीने वाद मिटविण्यासाठी यवतमाळ जिल्हा न्यायालय व सर्व तालुका न्यायालयांमध्ये दि. 1 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यात न्यायालयात येण्याअगोदरीची प्रकरणे, विविध बँका, विमा कंपनी, विद्युत वितरण कंपनी, बीएसएनएल कंपनी, तसेच विविध पक्षकारांनी आपले वाद आपसी समझोत्याने निकाली काढण्यासाठी उत्स्फुर्तपणे भाग घेतला होता. लोक अदालतमध्ये तडजोड करण्यात आलेल्या 2330 प्रकरणात 13 प्रकरणे ऑनलाईन तर दोन प्रकरणे व्हिडिओ निकाली काढण्यात आले. तसेच दिनांक 29, 30 व 31 जुलै रोजी राबविण्यात आलेल्या स्पेशल ड्रा

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष वि.प्र.पाटकर यांच्या हस्ते लोकअदालतचे उद्घाटन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव न्या. एम.आर.ए. शेख, कौटुंबिक न्यायालयाचे न्या. टि.एस.अकाली, सह दिवाणी न्या. एस.एच.गहेरवाल, अतिरिक्त सह जिल्हा न्यायाधिश एस.डब्ल्यु चव्हाण, ॲड. आर.के. मनक्षे, ॲड. आर.बी.बदनोर तसेच जिल्हा न्यायालयातील न्यायीक अधिकारी, वकील, न्यायालयीन कर्मचारी, पक्षकार, जिल्हा व तालुका विधी सेवा पा्रधिकरणचे सदस्य उपस्थित होते.

Copyright ©