यवतमाळ दि. 25: जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लससाठा उपलब्ध होत असून तालुका स्तरावर लसीकरणाचे नियोजन करतांना एका वेळी एका गावात 100 टक्के लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज दिल्या.
जिल्हाधिकारी यांनी आज व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे तालुकानिहाय लसीकरणाचा आढावा घेतला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ललीतकुमार वऱ्हाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी.एस. चव्हाण, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. सुहास कोरे प्रामुख्याने उपस्थित होते.
तालुकास्तरावर आज 16 हजार 700 कोविशील्ड व 3300 कोव्हॅक्सीन लसचे डोज वितरीत करण्यात आले. त्याअनुषंगाने उद्या दिनांक 26 जून रोजी संपुर्ण जिल्ह्यात 20 हजार डोस देण्याचे उद्दिष्ट पुर्ण करण्यात यावे, ज्या तालुक्यात लसीकरण कमी आहे तेथे लसीकरणाची गती वाढविण्यात यावी, असे जिल्हाधिकारी येडगे यांनी सांगितले.
कोव्हॅक्सीन लसचा दुसरा डोज 28 दिवसांनंतर घ्यायचा असल्याने याबाबत उशीर होऊ नये म्हणून पहिला डोज घेणाऱ्यांना एस.एम.एस.द्वारे सूचना द्याव्या तसेच लस मोठ्या प्रमाणात उपलब्ध असून लस घेण्याबाबत नागरिकांमधील संभ्रम व गैरसमज दूर करण्याचेही त्यांनी सांगितले. लसीकरणापासून आदिवासी भाग किंवा जिल्ह्यातील कोणताही भाग मागे राहणार नाही यासाठी लसीकरणाचे योग्य नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या. वापरानुसार लस साठा उपलब्ध होणार असल्याने जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करून घेण्याचे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात आतापर्यंत 5 लाख 44 हजार 952 लसचे डोज देण्यात आले असून त्यात पहिला डोज घेणाऱ्यांची संख्या 4 लाख 41 हजार 895 तर दोन्ही डोज घेणाऱ्यांची संख्या 1 लाख 3 हजार 57 आहे. 60 वर्षावरील नागरिकांना 1 लाख 79 हजार 634 डोज देण्यात आले असून 45 ते 60 वयोगटात 2 लाख 36 हजार 414 डोज तर 18 ते 44 वयोगटात 1 लाख 28 हजार 904 डोज देण्यात आले असल्याची माहिती जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. सुहास कोरे यांनी यावेळी दिली.
बैठकीला सर्व तहसिलदार व आरोग्य यंत्रणेचे अधिकारी दुरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
