यवतमाळ, दि. 2 : केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियानांतर्गत यवतमाळ वाढीव पाणी पुरवठा योजनेचा राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीला जि.प. अध्यक्षा कालिंदा पवार, खासदार सर्वश्री बाळू धानोरकर, भावना गवळी, यवतमाळच्या नगराध्यक्षा कांचन चौधरी, जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पालिका प्रशासन अधिकारी हर्षल गायकवाड, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता राहूल जाधव आदी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना पालकमंत्री श्री. भुमरे म्हणाले, यवतमाळ शहराची पाण्याची वाढीव गरज लक्षात घेता ही योजना सुरू करण्यात आली आहे. गत चार वर्षांपासून या योजनेचे काम सुरू असून 15 ते 20 टक्के काम अद्यापही बाकी आहे. त्यामुळे जीवन प्राधिकरण आणि संबंधित कंत्राटदाराने उर्वरीत काम त्वरीत पुर्ण करून नागरिकांना दिलासा द्यावा. या योजनेंतर्गत नागरिकांना पाणी मिळण्यासाठी आता दर 15 दिवसांनी जिल्हा प्रशासनाकडून आढावा घेण्यात येईल. कंत्राटदारानेसुध्दा पुढील दोन महिन्यात म्हणजे 1 जुलैपर्यंत अमृत योजनेचे काम प्राधान्याने पूर्ण करावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
2016 मध्ये यवतमाळ शहरातील नळ ग्राहकांची संख्या 33042 ऐवढी होती. अमृत योजनेंतर्गत सन 2033 पर्यंत शहरातील नळ ग्राहकांची संख्या अंदाजे 45120 राहण्याची शक्यता आहे. सदर योजनेचे कंत्राट नाशिक येथील पी.एल. आडके यांना देण्यात आले आहे. या योजनेंतर्गत पाण्याच्या मुख्य तीन टाक्यांची कामे पूर्ण झाली आहे. यात कार्यालय परिसरात असलेल्या टाकीची उंची 27 मीटर असून क्षमता 14.75 लक्ष लीटर, दर्डा नगर परिसरातील टाकीची उंची 25 मीटर, क्षमता 16.75 लक्ष लीटर आणि वाघापूर टेकडी परिसरात असलेल्या पाण्याच्या टाकीची उंची 18 मीटर असून क्षमता 20 लक्ष लीटर आहे, अशी माहिती सादरीकरणात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता राहूल जाधव यांनी दिली.
यवतमाळ भुयारी गटार योजनेचाही आढावा : यवतमाळ शहराची सद्यस्थिती लक्षात घेता अमृत योजनेंतर्गत यवतमाळ भुयारी गटार योजनेची आखणी करण्यात आली आहे. या योजनेचा आढावा घेतांना पालकमंत्री म्हणाले, योजनेसाठी खोदलेला रस्ता पुन्हा पुर्ववत करण्याचे काम कंत्राटदाराचे आहे. यात कोणतीही चालढकल करता कामा नये. तसेच गुणवत्तापूर्वक काम झाले पाहिजे. भुयारी गटार योजनेचा कालावधी फेब्रुवारी 2022 पर्यंत आहे. कामासंदर्भात नागरिकांच्या तक्रारी येऊ देऊ नका, असे निर्देश त्यांनी दिले.
सदर योजना यवतमाळ नगर परिषदेमार्फत राबविण्यात येणार आहे. डीपीआर नुसार योजनेची मंजूर किंमत 196.76 कोटी असून केंद्र शासनामार्फत प्रकल्प किमतीच्या 50 टक्के अनुदान म्हणजे 98.38 कोटी, राज्य शासनामार्फत 25 टक्के म्हणजे 49.19 कोटी आणि नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचा सहभाग 25 टक्के म्हणजे 49. 19 कोटी रुपये आहे.
_____________
जिल्ह्यात रोजगार हमी योजनेची कामे वाढवा – पालकमंत्री भुमरे
मजूरांच्या मागणीनुसार कामे उपलब्ध करून देण्याचे निर्देश
यवतमाळ, दि. 2 : कोरोना संसर्गाची मानवी साखळी तोडणे, याला शासनाने सर्वोच्च प्राधान्याने दिले असून प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून संचारबंदी लागू केली आहे. परिणामी मोठ्या संख्येने मजूर वर्ग आपापल्या गावाकडे परत आले आहे. या वर्गाला कामे उपलब्ध करून देणे शासन – प्रशासनाची मुख्य जबाबदारी आहे. त्यामुळे जिल्ह्यात रोजगार हमी योजनेची कामे वाढवून मजुरांच्या मागणीनुसार कामे उपलब्ध करून देण्याचे निर्देश राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात रोजगार हमी योजनेच्या कामाचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी खासदार बाळू धानोरकर, जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, उपजिल्हाधिकारी (रोहयो) संगिता राठोड, विभागीय वन अधिकारी एम.वाय. तोरो, यवतमाळचे उपवनसंरक्षक डॉ. राम गुजर आदी उपस्थित होते.
जिल्ह्यात मग्रारोहयोची कामे वाढविली तर जास्तीत जास्त मजुरांना रोजगार उपलब्ध होईल, असे सांगून पालकमंत्री श्री. भुमरे म्हणाले, जिल्ह्यात फळबाग लागवड वाढविणे अत्यंत गरजेचे आहे. केवळ कृषी विभागामार्फत नाही तर ग्रामपंचायतीमार्फतसुध्दा फळबाग लागवड कार्यक्रम राबवा. दिव्यांग व्यक्तिंनी रोजगार हमी योजनेंतर्गत कामाची मागणी केली असता त्यांना त्यांच्या क्षमतेनुसार कामे उपलब्ध करून द्यावीत. लेबर बजेट कृती आराखड्याअंतर्गत अडचणी निर्माण होऊ देऊ नका. बांधावरील वृक्षलागवड वाढविण्यासाठी प्रयत्न करा, अशा सुचना त्यांनी दिल्या.
रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात निर्गमित जॉबकार्डची संख्या 4 लक्ष 18 हजार 418 असून सक्रीय जॉबकार्डची संख्या 1 लक्ष 26 हजार 687 आहे. जिल्ह्यात मजुरांची एकूण संख्या 10 लक्ष 35 हजार 331 आहे. यापैकी सक्रीय मजूर 2 लक्ष 58 हजार 629 आहे. सन 2021 – 22 मध्ये रोजगाराची मागणी केलेल्या कुटुंबाची संख्या 20451 असून मजुरांची संख्या 33374 आहे. सद्यस्थितीत ग्रामपंचायत यंत्रणेमार्फत 1425 कामे सुरू असून यावर 10453 मजूरांची उपस्थिती, कृषी विभागाच्या 8 कामांवर 70 मजूर, वन विभागाच्या 32 कामांवर 651 मजूर, सामाजिक वनीकरण विभागाच्या 25 कामांवर 213 मजूर, जि.प. बांधकाम विभागाच्या 97 कामांवर 2018 मजूर, जि.प. सिंचन विभागाच्या 25 कामांवर 665 आणि सा.बा. विभागाच्या दोन कामांवर 33 मजूर अशा एकूण 1614 कामांवर 14013 मजूरांची उपस्थिती असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी संगिता राठोड यांनी दिली.
___________________
अठरा वर्षांवरील नागरिकांच्या कोविड लसीकरणाला सुरुवात
जिल्ह्यात पाच केंद्रावर लसीकरण
यवतमाळ, दि. 2 : महाराष्ट्र दिनापासून 18 ते 44 वयोगटातील नागरीकांचे लसीकरण करण्याबाबत शासनाच्या सुचना प्राप्त झाल्यानंतर जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने नियोजन केले. त्यानुसार जिल्ह्याला 7500 कोव्हीशिल्ड लसींचे डोजेस उपलब्ध झाल्याने जिल्ह्यात 18 वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरण मोहिमेला 1 मे पासून सुरुवात करण्यात आली.
सध्या 18 वर्षांवरील वयोगटाकरीता जिल्ह्यात पाच केंद्रावर लसीकरण सुरू करण्यात आले आहे. यात यवतमाळ शहरातील लोहारा व पाटीपुरा केंद्र तर पुसद, दारव्हा आणि पांढरकवडा येथील उपजिल्हा रुग्णालयाचा समावेश आहे. जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी लोहारा येथील लसीकरण केंद्रावर भेट दिली. त्यांच्या उपस्थितीत नोंदणी केलेल्या सिध्देश दिवाकर पांडे (वय 33) या लाभार्थ्याला प्रथम लस देण्यात आली. तसेच जि.प.अध्यक्षा कालिंदा पवार यांनी लोहारा लसीकरण केंद्रावर भेट देऊन पाहणी केली. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनीसुध्दा दारव्हा येथील लसीकरण केंद्राला भेट देऊन 18 ते 44 वयोगटातील लसीकरण मोहिमेचा आढावा घेतला.
45 वर्षे वयोगटावरील नागरिकांसाठी उपलब्ध लसीनुसार नियमित मोहीम विविध केंद्रावर सुरू राहणार आहे. 18 वर्षांवरील नागरिकांनी लसीकरणाकरीता ‘कोव्हीन ॲपवर’ ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. त्याशिवाय त्यांना लस मिळणार नाही. नोंदणी केल्यानंतर संबंधित व्यक्तिने कोणत्या केंद्रावर किती वाजता जावे, याबाबत संदेश प्राप्त होईल. दिलेल्या ठराविक वेळेत केंद्रावर जावून लाभार्थ्यांनी लसीकरण करणे आवश्यक आहे. जेणेकरून लसीकरणासाठी एकाच वेळी गर्दी होणार नाही, याची सर्वांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
लस घेतल्यावरसुध्दा दैनंदिन मास्कचा वापर, गर्दी टाळणे, वारंवार हात स्वच्छ धुणे, विनाकारण बाहेर न फिरणे आदी नियमांचे काटेकोरपणे पालन करून कोरोनाची मानवी साखळी तोडण्यासाठी शासन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पाचांळ यांनी केले आहे.
यावेळी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ पी.एस.चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी डॉ सुषमा खोडवे, वैद्यकीय अधिकारी डॉ. जया चव्हाण, डॉ. अंकीता चंदन, आरोग्य सेविका सी.आर.मस्के, शिला भगत, एस.दोडेवार, एस.आर पठाण, लस टोचक के.एस कोळकर, माला मसराम, आशा खडसे, जयश्री राउत, श्रीमती अलोणे, डी.आर.लांडे, गणेश मोरे उपस्थित होते
