समाजातील प्रत्येक घटकांनी दिव्यांगाप्रती सहानुभूती न दाखविता त्यांना संधी देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवावा- नेत्रशिखा दत्ता, प्रकल्प अधिकारी कॅरीटस इंडिया
ग्रामपंचायत तेंडोळी येथे दिव्यांगांशी संवाद
प्रत्येक दिव्यांग व्यक्ती स्वतंत्रपणे व सन्मानाने जीवन जगू शकेल, त्यांचे सर्व हक्क त्यांना मिळेल व ते पूर्णतः सक्षम होईल यासाठी सर्व समाजाने प्रयत्न करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन आसाम येथील कॅरिटस इंडियाच्या प्रकल्प अधिकारी नेत्रशिखा दत्ता यांनी केले त्या आर्णी पंचायत समिती अंतर्गत आयोजित दिव्यांग पुनर्वसन कार्यक्रमाकरिता आल्या असता त्यांनी ग्रामपंचायत तेंडोळी येथे भेट दिली त्यावेळी त्या बोलत होत्या.पुढे त्या म्हणाल्या की, दिव्यांग व्यक्तींबाबत सर्वसामान्य जनतेत, समाजामध्ये जनजागृती निर्माण व्हावी, दिव्यांग बांधवांचा सन्मान व्हावा, त्यांचे शिक्षण, प्रशिक्षण व पुनर्वसन करण्यासाठी समाजामध्ये जनजागृती व्हावी. तसेच समाजातील प्रत्येक घटकांनी दिव्यांगांच्या प्रति सहानुभूती न दाखवता त्यांना संधी देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी प्रेरित करणे आवश्यक आहे. सर्व दिव्यांग बांधवाना शासनापर्यंत पोहचता येत नाही आपले म्हणणे आणि मागण्या तसेच तक्रारी मांडता येत नाहीत म्हणून शासनच दिव्यांगांच्या दारी गेले तर अनेक दिव्यांग बांधवाना त्याचा फायदा मिळेल. म्हणून “दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी” ही योजना शासनाने राबवण्याचे ठरविले असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.त्यानंतर दिव्यांगांकरिता ग्रामपंचायत द्वारा राबविण्यात आलेल्या उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी ग्रामसेवक विजयकुमार ठेंगेकर यांनी ग्रामपंचायत अंतर्गत दिव्यांगांच्या नियमित सभा घेऊन त्यांच्या अडचणी समजून घेतल्या जाऊन त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ कसा देता येईल यावर प्रयत्न असल्याचे सांगत आजवर त्यांना घरकुल योजना, निराधार योजना, शौचालय, 5% निधी अंतर्गत अर्थ सहाय्य, उपकरणे व बॅलन्केट वाटप , ई-रिक्षा, मतिमंद मुलांच्या सुश्रुसेकरिता रुपये 10000 चे अनुदान इत्यादी लाभ दिल्याची माहिती दिली.यावेळी ग्रामपंचायतीच्या सरपंचा सौ सपनाताई रविशंकर राठोड, यवतमाळ जिल्हा समन्व्यक मायाताई येरणे, आर्णी तालुका समन्वयक आकाश दुपारते, यवतमाळ तालुका समन्वयक शुभम हूड, बाभूळगाव तालुका समन्वयक सोनिया भगत, उपसरपंच भगवान निकुरे, ग्रामपंचायत सदस्य तथा कृषी उत्पन्न बाजार समिती आर्णीचे उपसभापती परशराम राठोड, ग्रामसेवक विजयकुमार ठेंगेकर, शालीक पवार, पूजा निंबाळकर, ज्योती बोरघरे, महादेव शेलोटे, शिवाजी कोलते, ज्योत्स्ना गंडाईत, शीला शेंडे, रेखा कांबळे, राजेश राठोड, सिद्धार्थ गवळी, बाबूसिंग चव्हाण, शिवानी कोलते, संगीता मूजमुले यांच्यासह दिव्यांगजन उपस्थित होते.शेवटी नेत्रशिखा दत्ता, प्रकल्प अधिकारी कॅरीटस इंडिया यांच्याहस्ते ग्रामपंचायत तेंडोळीच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी भेटीचे प्रास्ताविक आर्णी तालुका समन्वयक आकाश दुपारते यांनी केले. तर आभार प्रदर्शन ग्रामसेवक विजयकुमार ठेंगेकर यांनी केले.
