वर्धा प्रतिनिधी पंकज तडस
नैसर्गिक संसाधनांचा वापर जपून करणे आवश्यक – राहूल कर्डिले
▪️ चला जाणूया नदीला अभियान कार्यशाळा
▪️ नदी काठावरील युवा स्वयंसेवकांना मार्गदर्शन
वर्धा :- पर्यावरणाचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत चालले आहे. नैसर्गिक संसाधनांचा अती वापर यासाठी काहीअंशी कारणीभूत आहे. त्यामुळे नद्या, जंगल, पाणी, वीज अशा संसाधनांचा वापर जपून करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.
चला जाणूया नदीला अभियानांतर्गत धाम नदी काठावरील युवा स्वयंसेवकांसाठी जिल्हा समन्वय समिती व नेहरू युवा केंद्राच्यावतीने आँक्सिजन पार्क येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड, जिल्हा युवा अधिकारी शिवधन शर्मा, उपअभियंता महेश मोकलकर, सहाय्यक भूवैज्ञानिक शिल्पा जनक, अभियानाचे समन्वयक भरत महोदय, सुनील रहाणे, मुरलीधर बेलखोडे आदी उपस्थित होते.
पुर्वी नद्या उन्हाळ्यात देखील वाहत होत्या, असे आपले पुर्वज सांगतात. अलिकडे काहीच महिने नद्या वाहतांना दिसतात. पर्यावरणात देखील फार बदल होतांना दिसत आहे. काही वर्षात उष्णतेची लहर पाहावयास मिळते. २०१६ मध्ये आठ राज्यांमध्ये उष्णतेची लहर होती. आता २३ राज्यात लहर आहे. पुढे हे प्रमाण वाढत जाणार आहे. हे थांबविण्यासाठी पर्यावरणाचे रक्षण आवश्यक असल्याचे युवकांशी संवाद साधतांना जिल्हाधिकारी म्हणाले.
जल व वृक्ष पुजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर भरत महोदय यांनी युवकांना चला जाणूया नदीला अभियानाची ओळख करुन दिली. सुनील रहाने यांनी नदी व नदी संस्कृती याविषयावर मार्गदर्शन केले. बहार नेचर फाऊंडेशनचे किशोर वानखडे यांनी जैव विविधता, सहाय्यक भूवैज्ञानिक शिल्पा जनक यांनी भुजल पुनर्भरण प्रक्रिया व उपाययोजना, ग्रामसेवा मंडळाचे अतुल शर्मा यांनी मृदा संवर्धन, मुरलीधर बेलखोडे यांनी वृक्ष लागवड व संवर्धन या विषयांवर तसेच राजू राठी यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने चला जाणूया नदीला अभियानाच्या जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या घडिपुस्तिका व माहिती पत्रकाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवधन शर्मा यांनी केले. संचलन सतिश इंगोले व विजय अढाव यांनी केले. कार्यशाळेला धाम नदी काठावरील ४५ गावातील युवा स्वयंसेवक व सामाजिक संस्थांचे स्वयंसेवक उपस्थित होते. कार्यक्रमासाठी अनिल देवतळे, नंदकुमार वानखेडे, अमोल चवरे यांनी सहकार्य केले.

