Home यवतमाळ श्रीकानिफनाथांची पोथी सातासमुद्रापार – नाथभक्तांमधून अभिनंदनाचा वर्षाव

श्रीकानिफनाथांची पोथी सातासमुद्रापार – नाथभक्तांमधून अभिनंदनाचा वर्षाव

13

श्रीकानिफनाथांची पोथी सातासमुद्रापार – नाथभक्तांमधून अभिनंदनाचा वर्षाव

नगर – नाथ साहित्याचे अभ्यासक मिलिंद चवंडके यांच्या सिध्दहस्तलेखनीमधून साकारलेली ||श्रीकानिफनाथमाहात्म्य || ही पोथी रंगपंचमीस (मंगळवार दि.२२ मार्च २०२२) नाथचरणी अर्पण करून प्रकाशित करण्यात आली. नाथभक्तांकडून या पोथीचे स्वागत होत असताना अमेरिकेतील भाविकांपर्यंत पोथी पोहोचण्याची घटना घडल्याने नाथभक्तांनी पोथी लेखक मिलिंद चवंडके यांच्यासह त्यांच्या कुटूंबावर अभिनंदनाचा वर्षावच सुरू केला आहे.

नवनाथांमधील प.पू.श्रीकानिफनाथ यांची संजीवन समाधी श्रीक्षेत्र मढी (ता. पाथर्डी, जि.अहमदनगर) येथे आहे. या देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तपदाचा कार्यभार सांभाळताना मिलिंद चवंडके यांच्या संकल्पनेमधून गर्भगिरीतील पहिल्या नाथ संमेलनाचे आयोजन दि.९ व १० सप्टेंबर २०१६ दरम्यान करण्यात आले होते. संमेलनानिमित्त महाराष्ट्रामधील नाथपंथी आखाडे, साधू, संन्यासी, साधक यांच्या प्रत्यक्ष भेटी घेताना मिलिंद चवंडके यांना नाथपंथी पीठावरून पोथी लिहिण्याचा आदेश झाला. दुर्मिळ ग्रंथ, पोथ्या, हस्तलिखित बाड यांचा अभ्यास करताना गोरखपूर (उत्तर प्रदेश) येथील आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये ‘महाराष्ट्रातील नाथ स्थल’ या विषयावर ‘निमंत्रित वक्ता’ म्हणून शोधनिबंध सादर करण्याची त्यांना संधी मिळाली. नाथ साहित्याच्या संशोधनासाठी प्रा.अशोक नेवासकर, प्राचार्य डाॅ. अनिल सहस्त्रबुध्दे, प्रा.एस.के.जोगी (जळगाव), टी.एन.परदेशी यांच्याकडून त्यांना सतत प्रोत्साहन मिळत राहिले. धर्मपत्नी सौ.सोनाली चवंडके, चि.ओंकार चवंडके, चि.चंद्रशेखर चवंडके या कुटूंबियांसह सौ.अंजलीताई गाडगीळ (गोवा), प्रा.लीला गोविलकर यांनी त्यांचा उत्साह सतत वाढविला. पोथी लेखन करावे असे सद् गुरू साहेबराव आवारे यांनीही म्हटले होते. लिखाण झालेली पोथी आवारे सरांना दाखवली असता त्यांनीही आपलेपणाने मार्गदर्शन केले.

करवीर पीठाचे शंकराचार्य श्री प.प.विद्यानृसिंह भारती स्वामी आणि श्रीक्षेत्र देवगड येथील हभप श्रीभास्करगिरी महाराज यांनी पोथीसाठी आशीर्वचन देताना मराठी भाषेतील प्रासादिक लेखनशैलीचे कौतुक केले. गोव्यातील रामनाथी आश्रमातील महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर या अत्याधुनिक उपकरणाव्दारे पोथीची वैज्ञानिक चाचणी केली असता उर्जेची प्रभावळ २२.८० मीटरपर्यत पोहोचल्याचे निदर्शनास आले.

श्रीकानिफनाथांच्या अवतार कार्यारंभापासून संजीवन समाधीपर्यंतच्या तसेच समाधीनंतरही सुरू असलेल्या कार्याची माहिती साध्या सोप्या रसाळ मराठी भाषेत या पोथीत आहे. ओवीबध्द असलेली ही पोथी नाथभक्तांसाठी नाथप्रसादच ठरू लागली आहे. महाराष्ट्राच्या विविध भागातील भाविक पोथीची मागणी करत असताना नगर शहरातील श्री दत्त देवस्थानमध्ये अमेरिका सत्संग मंडळातील श्री.सतीश जोशी व सौ.पद्मा जोशी (दलास-टेक्सास-अमेरिका) यांचे दर्शनासाठी आगमन झाले. ट्रस्टचे विश्वस्त सचिव संजय क्षीरसागर, मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यव्रत जोशी व व्यवस्थापक त्र्यंबक वैकर यांनी जोशी दाम्पत्याशी मिलिंद चवंडके यांची भेट घडवली. यावेळी उदय अभ्यंकर, सौ.आरती अभ्यंकर (औरंगाबाद), मेघना मराठे(पुणे), देवस्थानचे कर्मचारी राजेंद्र पांढरपोटे, मंदार क्षीरसागर आणि पोथीचे डिझायनर सोन्याबापू मुदळ उपस्थित होते.

मिलिंद चवंडके यांनी श्रीकानिफनाथमाहात्म्य ही पोथी जोशी दाम्पत्याच्या हाती देताच दत्त देवस्थानमध्ये नाथांची ही भेट प.पू.श्रीगुरूदेवांनीच घडवली. या पोथीरूपाने नाथ आमच्या सोबत आता अमेरिकेत रहातील असे म्हणत पोथीला वंदन करत त्यांनी पोथीचा स्वीकार केला. उदय अभ्यंकर यांनी श्री दत्त देवस्थानच्या त्रैमासिक श्रीगुरूसेवामध्ये मिलिंद चवंडके यांची ‘नवनाथांच्या रहस्यमयी कथा’ ही लेखमाला १ ऑगस्ट २०२० पासून सुरू असून ती अमेरिकेत सातत्याने पोहोचते आहे, असे सांगितले. नवनाथांची लेखमाला त्रैमासिक श्रीगुरूसेवाच्या माध्यमामधून संपूर्ण भारतासह अमेरिकेत जात असताना आता प.पू.श्रीकानिफनाथांची शुध्द मराठी भाषेतील पोथी अमेरिकेत पोहोचण्याची घटना गुढीपाडव्याच्या (शनिवार, दि.२ एप्रिल २०२२) पूर्वसंध्येला घडली. मराठी भाषा आणि नाथसंप्रदायाचे कार्य अमेरिकेपर्यंत पोहोचवण्यात योगदान दिल्याबद्दल पोथीचे लेखक मिलिंद चवंडके यांचे कुटूंबियांसह अभिनंदन होत आहे.

Copyright ©