Home यवतमाळ स्वाधार योजनेचे अर्ज सादर करण्यास 28 फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ

स्वाधार योजनेचे अर्ज सादर करण्यास 28 फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ

9

स्वाधार योजनेचे अर्ज सादर करण्यास 28 फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ

यवतमाळ दि. 04 जानेवारी : समाज कल्याण कार्यालयामार्फत अनुसूचित जाती करीता देण्यात येणाऱ्या स्वाधार योजना चे सन 2020-21 व सन 2021-22 चे अर्ज सादर करण्यास 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. सहाय्यक आयुक्त,.

सदर योजनेसाठीचे अर्ज समाज कल्याण कार्यालयातुन व शासकीय वसतीगृहातुन प्राप्त करुन घेऊन 75 टक्के ऑनलाईन उपस्थिती प्रमाणपत्र व सर्व कागदपदासह समाज कल्याण कार्यालय, यवतमाळ येथे महाविद्यालयामार्फत सादर करावेत, असे समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त, भाऊराव चव्हाण यांनी कळविले आहे.

__________________________________
सावित्रीबाई फुले जयंती दिनानिमित्त आदर्श शाळांना साहित्य वाटप

 

यवतमाळ दि. 04 जानेवारी : ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनानिमित्त ज्ञानोत्सव-2022 अंतर्गत आदर्श शाळांना साहित्य वाटप कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या वसंतराव नाईक सभागृहात काल आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा कालिंदा पवार तसेच प्रमुख अतिथी म्हणून अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, शिक्षणाधिकारी प्रमोद सूर्यवंशी, जिल्हा नियोजन अधिकारी (मानव विकास) अविनाश सुने उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते जिल्ह्यातील तीन आदर्श शाळा पुसद तालुक्यातील धनसळ, यवतमाळ तालुक्यातील सावरगड तसेच कळंब तालुक्यातील देवनाळा शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक वृंद यांना साहित्याचे वाटप करण्यात आले.

महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान अंतर्गत आदर्श शाळा निर्मिती व महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाविषयी माहिती अर्चना कुर्हे यांनी प्रास्ताविकेतून दिली.

कार्यक्रमाचे संचलन वैष्णवी बाबूळकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार शिवानंद मोरे यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाला सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी अक्षय बावकर, अधिव्याख्याता प्रमोद गावंडे, उपशिक्षणाधिकारी श्री. शर्मा, राजू मडावी, मोरेश्वर कोडापे, पूजा राठोड, प्रशांत अकुलवार तसेच जिल्ह्यातील शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

__________________________________

सावित्री उत्सवनिमित्त समूह गीत गायन स्पर्धेचे आयोजन

 

यवतमाळ दि. 04 जानेवारी : भारतातील पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमीत्य जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, सखी वन स्टॉप सेंटर, महात्मा ज्योतीबा फुले कॉलेज ऑफ सोशल वर्क यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्री उत्सव कार्यक्रमांतर्गत स्त्री मुक्तीचे – समूह गीत गायन स्पर्धेचे आयोजन काल करण्यात आले होते. त्यामध्ये महात्मा ज्योतीबा फुले कॉलेज ऑफ सोशल वर्क आणि सावित्री जोतिराव समाजकार्य महाविद्यालय येथील चमुंनी उत्स्फुर्त सहभाग नोंदविला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महात्मा ज्योतीबा फुले कॉलेज ऑफ सोशल वर्क यवतमाळ चे प्राचार्य डॉ.सुनिल वाशिमकर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) सविता चौधर तसेच विशेष अतिथी म्हणून उपजिल्हाधिकारी (निवडणूक) डॉ. स्नेहल कनीचे, तहसिलदार रुपाली बेहरे, जिल्हा संरक्षण अधिकारी रुपाली पांडे आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ज्योती कडू इत्यादी मान्यवरांनी कार्यक्रमास उपस्थिती राहून मार्गदर्शन केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सखी वन स्टॉप सेंटरच्या सोनाली पाटील तसेच प्रा. देविदास शंभरकर आणि प्रा. डॉ. सिध्दार्थ गंगाळे, प्रा.डॉ. कमल राठोड, दिगंबर खंडारे, पवन डोंगरे, एम.एस.डब्ल्यू भाग दोन च्या विद्यार्थ्यांचे तसेच महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष प्रयत्न केले.

__________________________________

समाज कल्याण कार्यालयात सावित्रीबाई फुले जयंती साजरी

यवतमाळ दि. 04 जानेवारी ( : सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणापासून वंचित घटकाला मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले असल्याचे मत समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त भाऊराव चव्हाण यांनी व्यक्त केले.

समाज कल्याण कार्यालयात काल सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी शासकीय निवासी शाळा पुसद व महागाव येथील मुख्याध्यापिका श्रीमती ठाकरे व भोयर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. समाज कल्याण निरीक्षी एम.एस.मोटघरे यांच्या हस्ते सावित्री फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यावेळी कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Copyright ©