Home यवतमाळ शेतमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहचवीणेकरीता 14 गाळे उपलब्ध

शेतमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहचवीणेकरीता 14 गाळे उपलब्ध

10

शेतमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहचवीणेकरीता 14 गाळे उपलब्ध

 

यवतमाळ दि. 09 डिसेंबर :

जिल्हा नियोजन निधी नावीन्यपुर्ण योजने अंतर्गत स्थापन करण्यात आलेले कै. वसंतरावजी नाईक शेतकरी स्वालंबन केंद्र अंतर्गत शेतकऱ्यांना त्यांचे शेतातील माल थेट ग्राहकांपर्यंत पोहचवीणेकरीता हक्काची जागा, बाजार उपलब्ध करुन देण्यासाठी बसस्थानक चौक यवतमाळ येथे दुकान गाळे उपलब्ध करुन देण्याचे दृष्टीने व्यवस्थापन समिती कै. वसंतरावजी नाईक शेतकरी स्वावलंबन केंद्राचे 14 गाळे उपलब्ध करण्यात आले आहे.

सदर दुकान गाळे, आत्मा अंतर्गत नोंदणी असलेले शेतकरी गट, फार्मर प्रोडुसर कंपनी, यांना प्रायोगीक तत्वावर दिनांक 01 ते 31 जानेवारी 2022 या पाच महीन्याकरीता भाड्याने देण्याचे नियोजन आहे. त्याकरीता इच्छुक शेतकरी गट, फार्मर प्रोडुसर कंपनी यांनी जि.प. कृषी विभाग, शासकीय रुग्णालयाजवळ, यवतमाळ, यांचेकडे दिनांक 20 डिसेंबर पावेतो कार्यालयीन वेळेत सुटीचे दिवस वगळता अर्ज सादर करावेत. अर्जाचा नमुना कार्यालयात उपलब्ध असल्याचे जिल्हा कृषी अधिकारी राजेंद्र माळोदे यांनी कळविले आहे.

______________________

 

जिल्हा युवा मंडळ पुरस्काराकरिता प्रस्ताव आमंत्रित

 

यवतमाळ दि. 09 डिसेंबर :
युवा कार्यक्रम व क्रिडा मंत्रालय, भारत सरकार तर्फे ग्रामीण युवा मंडळांना स्वयंप्रेरणेने ग्रामीण भागात समाजकार्य व विकासाचे कार्य करण्यास प्रोत्साहन देण्याकरीता दरवर्षी ‘जिल्हा युवा मंडळ पुरस्कार’ नेहरु युवा केन्द्रामार्फत देण्यात येतो. सन 2020-2021 च्या पुरस्काराकरिता दिनांक 18 डिसेंबर पर्यंत प्रस्ताव आमंत्रित करण्यात आले आहे.

पुरस्कृत मंडळाला रु. 25 हजार व प्रशस्ती पत्र देण्यात येते. जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गठीत निवड समिती तर्फे एकाच मंडळाची निवड या पुरस्कारा करीता केल्या जाते. नेहरु युवा केन्द्र, यवतमाळ या कार्यालयासोबत संलग्नीत तसेच धर्मदाय आयुक्त कार्यालयाव्दारा नोंदणीकृत झालेल्या 18 ते 29 वयोगटातील युवा मंडळांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

तरी यवतमाळ जिल्ह्यातील नोंदणीकृत व नेहरु युवा केन्द्र यवतमाळ सोबत संलग्नीत असलेल्या युवक व महिला मंडळ जे सन 2020-2021 मध्ये प्रामुख्याने आरोग्य व कुटुंब कल्याण, पर्यावरण संवर्धन, व्यवसाय प्रशिक्षण, साक्षरता, महिला सशक्तीकरण, लोककला व क्रीडा, रोजगार निर्मिती, श्रमदान, सामाजीक समस्या बद्दल मोहिम, समाज कल्याण, स्वच्छता अभियान इ. क्षेत्रात सक्रीय कार्यरत होते. अशा मंडळांनी जिल्हा युवा समन्वयक, नेहरु युवा केन्द्र, चंदन नगर, प्रजापती नगर जवळ, वडगांव रोड, यवतमाल येथे दिनांक 18 डिसेंबर 2021 च्या आत विहित नमुन्यात अर्ज करावे. अर्जाचा विहित नमुना व अधिक माहिती सदर कार्यालयात उपलब्ध आहे, असे नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी सारंग मेश्राम यांनी कळविले आहे
_______________________

जिल्‍हाधिकारी कार्यालयात सुरक्षारक्षक नेमण्यासाठी

कंत्राटदारांकडून दरपत्रक आमंत्रित

 

यवतमाळ दि. 09 डिसेंबर :
जिल्‍हाधिकारी कार्यालय, यवतमाळ येथील शासकीय ईमारतीच्‍या परीसरातील सुरक्षेच्‍या दृष्‍टीने तसेच कार्यालयात येणारी वाहने शिस्‍तबध्‍द पध्‍दतीने लावणे, तसेच ईमारतीतील वस्‍तु सुरक्षीत राहण्‍याच्‍या दृष्‍टीने व मालमत्‍तेची सुरक्षा आग, चोरी यापासून बचाव करण्‍याचे अनुषंगाने सुरक्षा रक्षक, नाईट गार्ड यांची आवश्‍यकता आहे. यासाठी स्‍थानिक सुरक्षा रक्षक/नाईट गार्ड पुरविणारे कंत्राटदार यांचेकडून दरपत्रक मागविण्यात आले आहे. याबाबतीत दरपत्रक सूचना, अटी व शर्ती www.yavatmal.nic.in या संकेतस्‍थळावर प्रसिध्‍द करण्‍यात आले असून दरपत्रक फॉर्म सेतु शाखा जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ येथे उपलब्ध असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांनी कळविले आहे.

_____________________

आंतर महाविद्यालयीन मैदानी स्पर्धेत यवतमाळच्या विद्यार्थ्यांचा नवीन विक्रम

यवतमाळ दि. 09 डिसेंबर : अमरावती आंतरविद्यापीठ मैदानी स्पर्धा हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अमरावती येथे दि. 3 ते 5 डिसेंबर 2021 दरम्यान नुकताच आयोजीत करण्यात आल्या होत्या. सदर स्पर्धेत यवतमाळ जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्राची खेळाडू कोमल रामेश्वर वंजारी हिने गोळाफेक महिला या क्रीडा प्रकारात 12.80 मिटर एवढा गोळा फेकुन नविन विक्रम प्रस्थावित करुन प्रथम क्रमांक पटकाविला. गोळाफेक पुरुष या गटात निशांत चव्हाण याने 12.75 मीटर ऐवढा गोळा फेकुन प्रथम क्रमांक पटकावला, कुणाल राजेश चौधरी यांने 100 मिटर तथा 200 मिटर धावणे ह्या क्रीडा प्रकारात अनुक्रमे 11.03 व 23.10 एवढा वेळ नोंदवून व्दितीय क्रमांक पटकाविला. प्रज्वल कोरडे यांने 10 हजार मिटर धावणेच्या क्रीडा प्रकारामध्ये 34.50 मिटर एवढी वेळ नोंदवित तृतीय क्रमांक पटकावला व अजिंक्य गायकवाड यांने 800 मी. धावणे मध्ये 2.07 मिनिट एवढी वेळ नोंदवित तृतीय क्रमांक पटकाविला तसेच 4×400 मिटर रिले रेस मध्ये रुषी चापके, कुणाल कापडे, अजिंक्य गायकवाड, प्रज्वल कोरडे या विद्यार्थ्याने 4.44 मिनीट एवढी वेळ नोंदवित व्दितीय क्रमांक मिळविला.

सर्व खेळाडू जिल्हा क्रीडा मैदानी प्रशिक्षण केंद्र यवतमाळ, नेहरु स्टेडीयम यवतमाळ येथे नियमित प्रशिक्षण घेतात. त्यांचे यशाबद्दल निवासी उपजिल्हाधिकारी ललीतकुमार वऱ्हाडे, जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रकात उप्पलवार यवतमाळ यांनी या विजयाचे कौतुक केले व पुढील आंतरविद्यापीठ स्पर्धेकरीता शुभेच्छा दिल्या तसेच जिल्हा मैदानी संघटना, यवतमाळ चे अध्यक्ष, राजु जॉन, सागर रेकवार यांनी अभिनंदन केले. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय त्यांचे क्रीडा मार्गदर्शक अरुणा गंधे राज्य क्रीडा मार्गदर्शक मैदानी तसेच कोमल सिंग बघेल यांना दिले असल्याचे जिल्हा क्रिडा अधिकारी चंद्रकांत उप्पलवार यांनी कळविले आहे.

Copyright ©