हिवरी प्राथमिक आरोग्य केंद्रामधील निवास स्थानातील साहित्य लंपास
——————————————–
या गंभीर प्रकारची चौकशीची मागणी
——————————————-
यवतमाळ- तालुक्यातील हिवरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य कर्मचारी मुख्यालयी हजर राहत नसणे यासोबतच चक्क येथिल निवास स्थानातील साहित्य लंपास झाल्याचा प्रकार पुढे आला आहे.
आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी राहून रुग्णांना अविरत सेवा द्यावे त्याकरिता शासन स्तरावरून लाखो रुपये खर्च करून निवासस्थान बांधून दिल्या जाते. त्याच सोबत या निवास स्थानात काही मौल्यवान फर्निचर सह काही साहित्य सुध्दा पुरविल्या जातात. मात्र हिवरी प्राथमिक आरोग्य केंद्रात भलतेच घडले. एका निवासस्थानात चार ते पाच वर्षे वास्तव्य करणाऱ्या कंत्राटी आरोग्य सहाय्यक यांची बदली तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात झाल्यानंतर त्यांनी हे निवासस्थान चक्क रात्री दरम्यान सोडले यात त्यांचे साहित्य ट्रक द्वारे नेण्यात आले. मात्र नंतर बघितले तर शासन स्तरावरून दिलेले साहित्य गायब असल्याचे निदर्शनास आल्याने प्रत्यक्षदर्शी नागरिक सांगत आहे. यात शासन स्तरावरून कोणकोणती साहित्य पुरविण्यात आले होते आणि आज या ठिकाणी कोणते साहित्य आहे याची खातरजमा करण्याची वेळ आहे. मात्र तसे होताना दिसत नाही. यावरून संबधित विभागाचे अधिकारी किती दक्ष आहे हे लक्षात येते. जणू काही “आंधळं दळते आणि कुत्र पिठ खाते” या म्हणी प्रमाणे अवस्था हिवरी प्राथमिक आरोग्य केंद्राची झाली आहे. हे निवास स्थान वानखेडे नामक आरोग्य सहाय्यक यांना देण्यात येवून तश्या आशयाचे पत्र सुध्दा वैद्यकीय अधिकारी यांनी काढून देठे यांना साहित्य ठेवण्याचे आदेश दिले होते. मात्र वास्त्यव्यात ते साहित्य त्या ठिकाणी साबुत आहे काय हे पाहणे गरजेचे असताना सुध्दा कोणीच या बाबीकडे गांभीर्याने घेतांना दिसत नाही. हा संशोधनाचा विषय असून यात अधिकाऱ्यांचा तर हात नसावा अश्या शंकेला पेव फुटले आहे. आरोग्य सेवेसह या ठिकाणी अनेक समस्या असून हे आरोग्य केंद्र रामभरोसे सुरू आहे. येथिल निवास स्थानातील साहित्य गायब हा विषय सध्या चांगलाच चर्चेचा विषय बनला असून या शासन मालमत्तेची विल्हेवाट लावणे ही एक मोठी चोरी असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीची दखल घेऊन सविस्तर बाबनिहाय चौकशी लावून दोषींवर फौजदारी कारवाई सह निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी गावकऱ्यांतून होत आहे.
