प्रेरणास्थळी राज्यपाल कोश्यारींचे स्वातंत्र्य सैनिक स्व.जवाहरलाल दर्डा यांना आदरांजली
यवतमाळ दि.25 (जिमाका) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज 25 नोव्हेंबर रोजी प्रेरणास्थळ येथे स्वातंत्र्य संग्राम सैनिक स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या 24 व्या स्मृती दिनानिमित्त पुष्पचक्र वाहून आदरांजली अर्पण केली. यावेळी माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पालकमंत्री संदीपान भुमरे,माजी राज्यसभा सदस्य विजय दर्डा, माजी मंत्री राजेंद्र दर्डा, माजी आमदार किर्ती गांधी व यवतमाळ नगर परिषदेच्या नगराध्यक्षा कांचन चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी प्रसिद्ध पंजाबी गायिका हरगुण कौर, गायक प्रशमेश लघाटे, स्थानिक कलावंत व वाय.पी.एस.स्कुलच्या विद्यार्थ्यांनी स्व.जवाहरलाल दर्डा यांना भजन व भक्तीगीतातून आदरांजली अर्पण केली.कार्यक्रमानंतर राज्यपाल श्री.कोश्यारी यांनी प्रेरणास्थळ परिसरात वृक्षारोपण केले व नोंदवहीत अभिप्राय नोंदविला. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर,विद्यार्थी तसेच नागरिकांची उपस्थिती होती.
वृत्त क्रमांक : 1065 दि. 25 नोव्हेंबर 2021
निसर्ग संवर्धानात ‘प्रयासवन’ ही कठीण साधनाच – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
प्रयासवन येथे वृक्षारोपण
यवतमाळ दि.25 (जिमाका) : कोणत्याही ध्येय प्राप्तीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा आवश्यक आहे. निसर्ग संवर्धानासाठी प्रयासवनची करण्यात आलेली उभारणी म्हणजे ही अनेक वर्षाची कठीण साधनाच आहे. असे मत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले.
आज 25 नोव्हेंबर रोजी यवतमाळजवळील गोधणी रोड येथील वन विभागाच्या जागेत प्रयास या सेवाभावी संस्थेच्या पुढाकारातून अनेक वृक्षांची लागवड करून जोपासना करण्यात येत आहे. याठिकाणी राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी वृक्षारोपण केले. यावेळी ते बोलत होते. आमदार मदन येरावार, जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, मुख्य वनसंरक्षक प्रकाश लोणकर, प्रयासवनचे अध्यक्ष डॉ. विजय कावलकर, उपवनसंरक्षक किशोर वाबळे यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.
राज्यपाल पुढे म्हणाले, प्रयासवन उभारणीत लोकप्रतिनिधी तसेच अधिकारी मदत करीत आहे. त्यांचे अधिकाधिक सहकार्य घेवून या ठिकाणी पुढील पाच ते सहा वर्षात चांगले वन तयार झाल्याचे दिसेल व प्रत्येक व्यक्तीला प्रयासवन येथे येण्याची आवड स्वत:हून निर्माण होईल, असे त्यांनी सांगितले.
शासनाच्या त्रिपक्षीय करारानुसार वन विभागाच्या 25 एकर जागेवर प्रयास या संस्थेमार्फत आतापर्यंत आठ हजार चारशे वृक्ष लागवड करण्यात आली असून येथे वृक्ष संवर्धनातून प्रयासवन साकारण्यात आले आहे. याठिकाणी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 75 वृक्षांची लागवड करण्यात येत आहे. त्याचा शुभारंभ आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते बेल या वृक्षाची लागवड करून करण्यात आला. तसेच पंचवटी भागाचे लोकार्पण व जैवीक खत निर्मिती प्रकल्पाचा शुभारंभ देखील राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या हस्ते फलकाचे अनावनरण करून यावेळी करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन मंगेश खुणे यांनी केले तर उपस्थितांचे आभार अश्विन सव्वालाखे यांनी व्यक्त केले.
यावेळी प्रयास संस्थेचे सर्व सभासद उपस्थित होते
मातृभाषा आणि मातृभूमीबद्दल अभिमानाची जाणीव शिक्षणातून संवर्धित व्हावी
– राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
यवतमाळ, दि. 25 : माता, मातृभाषा आणि मातृभूमी या तिन्हीबद्दल प्रत्येक नागरिकाने अभिमान बाळगला पाहिजे. त्यासाठी आवश्यक जाणिवा संवर्धित करण्यासाठी शिक्षणाच्या माध्यमातून प्रयत्न होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.
यवतमाळ येथील हिंदी प्रसारक मंडळ बेरारतर्फे 24 व्या जवाहरलाल दर्डा स्मृती समारंभानिमित्त जवाहरलाल दर्डा इंग्रजी माध्यम शाळेच्या इमारतीचे लोकार्पण व अस्थिरोग आरोग्य शिबिराचा प्रारंभ राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, रोजगार हमी योजना मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे, प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. गोवर्धन लाल पाराशर, संस्थेचे अध्यक्ष व माजी खासदार विजय दर्डा, संस्थेचे सदस्य व माजी मंत्री राजेंद्र दर्डा, सचिव किर्ती गांधी, शाळेच्या प्राचार्य मिनी थॉमस आदी यावेळी उपस्थित होते.
नवीन शैक्षणिक धोरणात प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतून देण्याचा आग्रह धरण्यात आल्याचे स्पष्ट करून राज्यपाल श्री. कोश्यारी पुढे म्हणाले की, आपल्या मातृभाषेविषयी आस्था आणि अभिमान जोपासताना तिच्याबाबतच्या जाणिवा वृद्धिंगत होण्यासाठी कृतीशील प्रयत्न करण्याची गरज आहे. आपल्या मूळ सांस्कृतिक परंपरांविषयी आपण आग्रही असले पाहिजे. या परंपरांशी असलेली बांधिलकी प्रत्येकाने कायम ठेवावी. आपल्या संस्कृतीत अनेक उदात्त परंपरा आहेत. या परंपरांचे पालन करताना पूर्वजांचे कृतज्ञ स्मरण ठेवले तरच समाज व देशाचे सांस्कृतिक उत्थान होऊ शकेल, असे त्यांनी यावेळी आग्रहाने सांगितले.
भारत ही जागतिक महासत्ता होण्यासाठी सर्वांनी संकल्प करायला हवा, असे आवाहन करून श्री. कोश्यारी म्हणाले की, भारत हा जगद्गुरु झाला पाहिजे. त्यासाठी आपण सर्व क्षेत्रांत आत्मनिर्भर होण्याची गरज आहे. नव्या भारताच्या निर्मितीसाठी सर्वांनी कटिबद्ध होऊन प्रयत्न करताना, देशात विषमता समाप्त होऊन समता स्थापित करण्यासाठीही आपण झटले पाहिजे. हीच स्वातंत्र्यसैनिक आणि शहिदांना खरी श्रद्धांजली ठरेल. जवाहरलाल दर्डा यांच्या जीवनकार्याचा गौरव करताना त्यांच्या पक्षापलिकडील व्यक्तिमत्वामुळे त्यांना समाजाच्या सर्व स्तरांतून आदर प्राप्त झाल्याचे उद्गार त्यांनी यावेळी काढले. आपल्या भाषणात राज्यपालांनी राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचेही स्मृतीदिनानिमित्ताने कृतज्ञतापूर्वक स्मरण केले.
जवाहरलाल दर्डा हे समतेच्या विचारांवर दृढ श्रद्धा असणारे व्यक्तिमत्व होते. समाजात सामाजिक व आर्थिक समता प्रस्थापित होण्यासाठी त्यांनी आपल्या कार्याद्वारे योगदान दिले. दर्डा परिवाराने त्यांचा वारसा निष्ठेने जोपासला आहे, असे माजी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.
सामान्य रूग्णालय व नाट्यगृहाचे काम गतीने पूर्ण होईल : पालकमंत्री श्री. भुमरे
यवतमाळ शहरातील नाट्यगृह व सामान्य रूग्णालयाचे काम पूर्ण होण्याची मागणी माजी खासदार श्री. दर्डा यांनी आपल्या मनोगतात केली. त्याबाबत पालकमंत्री श्री. भुमरे म्हणाले की, सामान्य रूग्णालयासाठी सव्वाशे कोटी रूपये मंजूर झाले असून, जागेअभावी काम रेंगाळले होते. तथापि, कालच जागा निश्चित करण्यात आली आहे. याबाबत वनविभागाची परवानगी घेण्यासह इतर प्रक्रिया वेळेत पूर्ण केली जाईल.
नाट्यगृहाचे काम पुढे जाण्यासाठी जिल्हा नियोजन निधीतून 5 कोटी रूपये देण्याची घोषणा पालकमंत्री श्री. भुमरे यांनी यावेळी केली. हे काम दोन वर्षांत पूर्ण होईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. याच निधीतून कोरोनाकाळातही 50 रूग्णवाहिका उपलब्ध करुन देण्यात आल्याचीही माहिती त्यांनी यावेळी दिली. जवाहरलाल दर्डा यांची रचनात्मक कार्यावर श्रद्धा होती. त्यांचे व्यक्तित्व व कार्य आम्हा सर्वांसाठी चिरंतन प्रेरणादायी असल्याचे सांगून मातृभाषेच्या संवर्धनासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन श्री. विजय दर्डा यांनी केले. डॉ. पाराशर यांनी यावेळी ओस्टिओपॅथी उपचारपद्धतीबाबत माहिती दिली. ही उपचार पद्धती पुनरूज्जिवित करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. सचिव श्री. गांधी यांनी प्रास्ताविक केले. आरोग्य शिबिरात सहभाग देणा-या डॉक्टरांच्या पथकाचाही यावेळी गौरव करण्यात आला.
