Home यवतमाळ गेल्या 24 तासात नवीन पॉझिटिव्ह नाही ; एक कोरोनामुक्त

गेल्या 24 तासात नवीन पॉझिटिव्ह नाही ; एक कोरोनामुक्त

12

 

डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करा

किशोर तिवारी

यवतमाळ दि. 20 सप्टेंबर : जिल्ह्यात डेंग्यूचा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढत असून त्यावर आळा घालण्यासाठी शौचालाय टाकीच्या पाईपर जाळ्या लावणे, साचलेल्या पाण्यात गप्पी मासे सोडणे, नागरी वस्तीत घाण साठू न देता डम्पींग ग्राउंडवर कचऱ्याची विल्हेवाट लावणे, कोरडा दिवस पाळणे आदि आवश्यक उपाययोजना जिल्ह्यातील सर्व नगरपालिका, नगरपंचायती व ग्रामपंचायतींद्वारे तातडीने राबविण्यात याव्या. डेंग्युचा प्रसार कमी करण्यासाठी प्रशासनाने इंटेग्रेटेड प्लॅन तयार करावा तसेच नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात यावी, अशा सूचना कै. वसंतराव नाईक, शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी दिल्या.

डेंग्यू आजारावरील उपाययोजनेबाबत किशोर तिवारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील महसुल सभागृह येथे आज आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, नगराध्यक्षा कांचन चौधरी, अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलींद कांबळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी.एस.चव्हाण, नगरपालिकेच्या मुख्याधिकारी माधुरी मडावी, तसेच दूरदृष्यप्रणालीद्वारे जिल्ह्यातील सर्व नगरपालीकेचे मुख्याधिकारी बैठकीला उपस्थित होते.

किशोर तिवारी यांनी नगरपरिषदेतील मुख्याधिकारी यांच्या रिक्त जागा तातडीने भरण्याबाबत, डेंग्यू तपासणीची किट मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून तपासणी वाढविण्याचे तसेच ग्रामीण भागातील घरकुलाचे कामे लवकर पुर्ण करण्याबाबत सूचना केल्या.

बैठकीला संबंधीत अधिकारी उपस्थित होते.

शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी

तृतीयपंथीयांना युनिक ओळखपत्र द्यावे

– जिल्हाधिकारी

यवतमाळ दि. 20 सप्टेंबर : जिल्ह्यातील तृतीयपंथीयांच्या समस्या जाणून त्यावर कार्यवाही करण्यासाठी जिल्हास्तरावर तक्रार निवारण समिती स्थापण करतांना त्यांच्या समस्या मांडू शकतील अशा दोन तृतीयपंथींयाचा समावेश समितीमध्ये करावा, तसेच विशेष कॅम्पद्वारे तृतीयपंथींची आरोग्य तपासणी करून त्यांना वैद्यकीय प्रमाणपत्राचे वितरण करावे व शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी युनिक ओळखपत्र देण्यात यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या.

तृतीयपथीयांच्या हक्काचे संरक्षण व कल्याण मंडळ योजनेंअंतर्गत समितीचा आढावा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज घेतला. यावेळी समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त भाऊराव चव्हाण, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी ज्योती कडू, जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार, कौशल्य विकासच्या सहाय्यक आयुक्त विद्या शितोळे प्रामुख्याने उपस्थित होते.

जिल्हाधिकारी येडगे पुढे म्हणाले की तृतीयपंथीयांची नोंदणी पोर्टलवर पुर्ण करून त्यांना शासनाच्या सामाजिक योजनांतर्गत विविध बाबींचा लाभ देण्याबाबत, जे निराधार असतील त्यांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ तसेच विविध शासकीय योजनांमधून शिक्षण, कौशल्य विकास व स्कॉलरशीप देण्याबाबत आवश्यक नियोजन करण्याचेही त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात आतापर्यंत 99 तृतीयपंथींच्या नोंदी करण्यात आल्या असल्याची माहिती समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त भाऊराव चव्हाण यांनी दिली.

बैठकीला संबंधीत विभागचे अधिकारी उपस्थित होते.

______________________________________

गेल्या 24 तासात नवीन पॉझिटिव्ह नाही ; एक कोरोनामुक्त

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2162 बेड उपलब्ध

 

यवतमाळ दि. 20 सप्टेंबर : गेल्या 24 तासात जिल्ह्यात नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले नाही तर एक जण कोरोनामुक्त झाले आहे. सध्या ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यात एक व बाहेर जिल्ह्यात चार अशी एकूण पाच आहे.

जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 63 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह नसल्याने सर्व 63 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72872 आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 71080 आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1787 मृत्यूची नोंद आहे.

जिल्ह्यात आतापर्यत सात लक्ष 37 हजार 292 चाचण्या झाल्या असून त्यापैकी सहा लक्ष 64 हजार 417 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 9.88 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी 0.0 आहे तर मृत्यूदर 2.45 आहे.

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2162 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 16 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 2174 आहे. यापैकी 12 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 2162 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 787 बेडपैकी 12 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 775 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 755 बेडपैकी पुर्ण 755 बेड शिल्लक आणि 16 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 632 बेडपैकी पुर्ण 632 बेड शिल्लक आहेत.

Copyright ©