जिल्हा प्रतिनिधी
उमरखेडच्या विकासाकरीता 50 कोटिचा निधी देणार
– सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण
यवतमाळ दि. 17 सप्टेंबर : उमरखेड तालुक्यांमध्ये विविध विकास कामाकरिता प्रस्ताव सादर केल्यास त्यानुसार किमान 50 कोटी रुपयांचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाला उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिले.
जिल्हा परिषद विडुळ मतदारसंघांमध्ये विविध 12.45 कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन व लोकनेते स्व.अनंतराव देवसरकर स्मृतिप्रित्यर्थ रुग्णवाहिकेचे लोकार्पण अशोक चव्हाण यांच्या हस्ते शिवकमल मंगल कार्यालय, उमरखेड येथे करण्यात आले. याप्रसंगी आ. डॉ. वजाहात मिर्झा, आ. अमर राजुरकर, सुभाषराव वानखेडे, विजयराव खडसे, तातु देशमुख, वनमालाताई राठोड, जितेंन्द्र मोघे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाळासाहेब चंद्रे, आनंदराव कदम, दत्तराव शिंदे, शिवाजीराव सवनेकर, नंदकिशोर अग्रवाल, गोपाल अग्रवाल, रमेश चव्हाण यावेळी उपस्थित होते.
बांधकाम मंत्री चव्हाण पुढे म्हणाले की युपीपी अंतर्गत अपूर्ण राहिलेली कालव्याची कामे पूर्ण करण्याकरिता पाठपुरावा करण्यात येईल तसेच अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून काढण्याकरिता पिक विमा कंपन्याकडे पाठपुरावा करून शासनाकडून जास्तीत जास्त निधी मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात येईल.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा परिषदचे अर्थ व बांधकाम सभापती राम देवसरकर यांनी केले. यावेळी त्यांनी रस्ते विकासाकरिता निधी देण्याची मागणी केली. यावेळी आ.वजाहत मिर्झा तातु देशमुख , विजय खडसे, सुभाषराव वानखेडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. माजी खासदार सुभाषराव वानखेडे यांनी पैनगंगा नदीवर पूल कम बंधारा जागोजागी बांधण्यात यावे अशी मागणी केली.
कार्यक्रमाचे संचालन व आभार श्री. देवराये यांनी केले.
कार्यक्रमाला विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी, विविध स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी,पदाधिकारी, विडुळ जिल्हा परिषद मतदारसंघातील व तालुक्यातील नागरिक उपस्थित होते.
गेल्या 24 तासात तीन पॉझिटिव्ह ; एक कोरोनामुक्त
जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2161 बेड उपलब्ध
यवतमाळ दि. 17 सप्टेंबर : गेल्या 24 तासात जिल्ह्यात तीन नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले तर एक जण कोरोनामुक्त झाले आहे. सध्या ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यात दोन व बाहेर जिल्ह्यात चार अशी एकूण सहा आहे.
जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 1052 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी तीन अहवाल पॉझिटिव्ह असल्याने उर्वरित 1049 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72871 आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 71078 आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1787 मृत्यूची नोंद आहे.
जिल्ह्यात आतापर्यत सात लक्ष 35 हजार 749 चाचण्या झाल्या असून त्यापैकी सहा लक्ष 62 हजार 877 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 9.90 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी 0.29 आहे तर मृत्यूदर 2.45 आहे.
जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2161 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 16 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 2174 आहे. यापैकी 13 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 2161 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 787 बेडपैकी 13 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 774 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 755 बेडपैकी पुर्ण 755 बेड शिल्लक आणि 16 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 632 बेडपैकी पुर्ण 632 बेड शिल्लक आहेत.
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा दौरा
यवतमाळ दि. 17 सप्टेंबर : भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण विभागाचे राज्यमंत्री रामदास आठवले हे यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार दि. 17 सप्टेंबर 2021 रोजी सायं. 7.15 वा. उमरसरा नगर, आकाशवाणी केंद्राजवळ यवतमाळ येथे नागपूरहून आगमन व तेथील अभ्यासिकेचे उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. रात्री शासकीय विश्रामगृह येथे मुक्काम .
शनिवार दि.18 सप्टेंबर रोजी सकाळी 8.30 वा. यवतमाळ येथून उमरखेडकडे प्रयाण. स. 10.30 वा. उमरखेड येथे आगमन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. दु. 12.45 वा. कळगाव ता. दिग्रस येथील स्थानिक कार्यक्रमास उपस्थिती. दु. 2.30 वा. यवतमाळ शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेस उपस्थिती. सायं. 4 वा. यवतमाळ येथून नागपूरकडे प्रयाण.
कौशल्य विकास विभागातर्फे 27 ते 30 मे दरम्यान
ऑनलाईन रोजगार मेळावा
यवतमाळ दि. 17 सप्टेंबर : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, यवतमाळ यांचे वतीने ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन दिनांक 17 ते 22 सप्टेंबर 2021 दरम्यान करण्यात आले आहे. इयत्ता दहावी, बारावी, आयटीआय, पदवीधर, अभियांत्रीकी पदवीका इत्यादी शैक्षणिक पात्रता धारण करणाऱ्या व नोकरी करण्यास इच्छुक उमेदवारांनी कौशल्य विकास विभागाच्या www.mahaswayam.gov.in या पोर्टलवर एम्प्लॉयमेंट या टॅबवर जावून जॉब सीकर येथे नोंदणी करून ऑनलाईन रोजगार मेळाव्यामध्ये सहभाग नोंदवावा.
उमेदवारांनी आपआपल्या युझर आयडी व पासवर्डच्या आधारे महास्वयंम या संकेतस्थळावर लॉगिन करून आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार उचित असलेल्या रिक्त पदांसाठी आपला पसंतीक्रम व उत्सुकता ऑनलाईन पध्दतीने नोंदवावी. आवश्यक पात्रता धारण करीत असल्याची खात्री करून पदाची निवड करावी. मुलाखतीबाबत तसेच पदभरतीबाबत संबंधीत कंपनीद्वारे निवडप्रक्रिया केली जाणार आहे.
याबाबत काही अडचणी असल्यास कार्यालयीन वेळेत 07232-244395 तसेच 8830807312 या भ्रमणध्वनीवर संपर्क करावा, असे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त विद्या शितोळे यांनी कळविले आहे.
20 सप्टेंबर रोजी महिला लोकशाही दिन
यवतमाळ दि. 17 सप्टेंबर : जिल्हा महिला लोकशाही दिनाचे आयोजन दिनांक 20 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील बळीराजा चेतना भवन (बचत भवन) येथे करण्यात आले आहे.
तक्रारग्रस्त महिलांनी त्यांच्या तक्रारी प्रथम दर महिन्याच्या चौथ्या सोमवारी आयोजित तालुकास्तरावरील लोकशाही दिनात मांडाव्यात. सदर तक्रारीवर संबंधीत विभागाकडून विहित कालावधीत निरसन न झाल्यास सदर तक्रार जिल्हा महिला लोकशाही दिनात तालुकास्तरीय लोकशाही दिनात केलेले अर्ज व टोकन क्रमांकासह दाखल करावी.
लोकशाही दिनात न्यायप्रविष्ठ प्रकरणे, विहित नमुन्यात नसलेला व आवश्यक कागदपत्रे न जोडलेला अर्ज तसेच सेवाविषय, आस्थापनाविषयक, वैयक्तिक स्वरूपाचे निवेदन व तक्रारी स्विकारल्या जाणार नाही, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ज्योती कडू यांनी कळविले आहे.
ज्वारी मका बाजरी खरेदीकरिता 30 सप्टेंबरपुर्वी नोंदणी करा
यवतमाळ दि. 17 सप्टेंबर : आधारभुत किंमत खरेदी योजनेअंतर्गत हंगाम 2021-22 मध्ये राज्य शासनामार्फत ज्वारी, मका व बाजरी खरेदीकरिता शेतकऱ्यांची नोंदणी करण्याकरिता महाराष्ट्र स्टेट को. ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लि. मार्फत महागाव, पांढरकवडा, पाटन ता. झरी, पुसद, व आर्णी ही पाच खरेदी केंद्रे उघडण्यात आले आहे.
महागाव व पांढरकवडा येथे तालुका खरेदी विक्री समिती, पाटन येथे बळीराजा फळे फुले भाजीपाला कृषी उत्पादन पणन व प्रक्रिया सहकारी संस्था, पुसद येथे किसान मार्केट यार्ड शेुल (बु) व आर्णी येथे शेतकरी कृषी खाजगी बाजार दत्तरामपुर या संस्थामार्फत खरेदी करण्यात येणार आहे.
तरी ज्वारी, मका व बाजरी खरेदीकरिता ऑनलाईन नोंदणी दिनांक 3 सप्टेंबर पासून नोंदणी सुरू झाली असून 30 सप्टेंबर पर्यंत नोदणी करता येणार आहे. नोंदणी करण्याकरिता शेतकऱ्यांनी आधारकार्ड, 7/12 उतारा, पिकपेरा, व बँकेचे पासबुकची झेरॉक्स प्रत सोबत द्यावी, असे जिल्हा मार्केटिंग अधिकारी अर्चना माळवे यांनी कळविले आहे.
एकलव्य मॉडेल निवासी शाळेत प्रवेशासाठी 25 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
यवतमाळ दि. 17 सप्टेंबर : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पांढरकवडा अंतर्गत एकलव्य मॉडेल निवासी शाळेत इयत्ता सहावीचे नियमित प्रवेश तसेच इयत्ता सातवी ते नववी वर्गात रिक्त जागेवर प्रवेश मिळण्यासाठी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी 25 सप्टेंबर 2021 पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.
प्रवेशासाठी इच्छुकांनी ऑनलाईन आवेदनपत्र https://admission.emrsmaharashtra.com या संकेतस्थळावर 25 सप्टेंबर पुर्वी भरावे. फॉर्म भरण्याबाबत व प्रवेश संदर्भात अधिक माहितीसाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, पांढरकवडा येथे तसेच दूरध्वनी क्रमांक 8788442237 यावर संपर्क साधावा, असे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी विवेक जॉनसन यांनी कळविले आहे.
जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेशप्रक्रिया सुरू
यवतमाळ दि. 17 सप्टेंबर : जवाहर नवोदय विद्यालय बेलोरा, ता.घाटंजी येथे सी.बी.एस.ई. अभ्यासक्रम असलेल्या इयत्ता नववी मधील रिक्त जागांकरिता वर्ष 2022-23 साठी प्रवेश घेण्यास इच्छुक विद्यार्थ्यांची प्रवेश परीक्षा दिनांक 09 एप्रिल 2022 रोजी घेण्यात येणार असून या परीक्षेकरीता ऑनलाईन आवेदन पत्र मागविण्यात येत आहे. ऑनलाईन प्रवेश अर्ज दि. 13 सप्टेंबर 2021 पासून www.nvsadmissiononclassnine.in किंवा www.navodaya.gov.in www. Jnvyavatmal.com या वेबसाईटवर उपलब्ध आहे. ऑनलाईन प्रवेश अर्ज स्विकारण्याची अंतिम तिथी दि. 31 ऑक्टोबर 2021 असून प्रवेश अर्ज ऑनलाईनच मागविण्यात येत आहे.
प्रवेशासाठी लागणारी पात्रता पुढीलप्रमाणे आहे. विद्यार्थी यवतमाळ जिल्ह्यातील शासकीय किंवा मान्यताप्राप्त शाळेत इयत्ता आठवीत सन 2021-22 मध्ये शिकत असावा. विद्यार्थ्याचा जन्म दिनांक 1 मे 2006 ते 30 एप्रिल 2010 चे दरम्यान असावा.
परिक्षेकरिताची अधिक माहिती वरील संकेतस्थळावर उपलब्ध आहे, तरी संबंधित विद्यार्थी, पालक, शिक्षक यांनी नोंद घेऊन त्वरीत आवेदन पत्र भरावे, असे आवाहन विद्यालयाचे प्राचार्य के.डी.धोपटे यांनी केले आहे.
मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमाचा नागरीकांनी लाभ घ्यावा
– अनिरूद्ध बक्षी
यवतमाळ दि. 17 सप्टेंबर : राज्याचे मुख्य निवडणुक अधिकारी यांनी दिनांक 01 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. यानुसार 78-यवतमाळ मतदार संघामध्ये दि. 9 ऑगस्ट 2021 ते 31 ऑक्टोंबर 2021 पर्यंत मतदान केंद्राचे सुसुत्रिकरण, प्रमाणिकरण, समान, दुबार नोंदी यासंदर्भातील त्रुटी दुर करण्यात येणार आहे. तसेच दिनांक 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2021 पर्यत दावे व हरकती स्विकारून दि. 20 डिसेंबर 2021 पर्यंत दावे व हरकती निकालात काढण्यात येणार आहे आणि दि. 5 जानेवारी 2022 ला अंतिम मतदार यादी प्रसिध्दी केली जाणार आहे.
तरी नागरीकांनी मतदान केंद्र स्तरीय अधिकारी यांचे मार्फत किंवा व्होटर हेल्पलाईन ॲप तसेच www.nvsp या संकेत स्थळावर जाऊन आपले नाव, पत्ता, जन्म तारीख, छायाचित्र, दुरुस्तीसाठी (नमुना-8), नवीन नावाची नोंदणीकरिता (नमुना-6), स्थलांतर, दुबार, मय्यत झाले असल्यास (नमुना- 7) व मतदार संघात
यादी भाग बदल करावयाचा असल्यास (नमुना 8-अ) भरावा व मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन 78- यवतमाळ विधानसभा मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अनिरूद्ध बक्षी यांनी केले आहे.
