यवतमाळ: सुसंस्कार विद्या मंदिर येथील विद्यार्थ्यांनी गणरायाच्या आगमनाचे औचित्य साधून गणेशाच्या मूर्ती स्वहस्ते बनविल्या. भाद्रपद महिन्यात येणारे गणराय आनंद, उत्साह, उल्हासाचे प्रतीक व ज्ञानाची देवता होय. मात्र कोरोना ह्या दुर्धर रोगाशी संपूर्ण जग सामना करीत आहे. सर्वत्र नैराश्य पसरले असताना सुसंस्कार विद्या मंदिर येथील प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांसाठी नैराश्यपूर्ण वातावरणात आशेचा किरण पसरविणारा एक स्तुत्य उपक्रम शाळेने राबविला. गणेशाच्या मूर्ती तयार करणे व गणरायाची चित्रे रेखाटणे या उपक्रमात प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
चिमुकल्यांनी आपल्या लहानग्या हातानी गणेशाच्या मूर्ती साकारल्या व गणेशाची चित्रे रेखाटली. या मूर्ती व चित्रांच्या माध्यमाने त्यांनी गणरायाबद्दल त्यांच्या मनात असणारे प्रेमचं जणू व्यक्त केले आहे. मूर्ती साकारतानां त्यांच्या मनात निर्माण झालेला उत्साह, मूर्ती पूर्णत्वास आल्यावर प्रसन्न दिसणारा त्यांचा चेहरा हे पाहून पालकही सुखावले आहे. विद्यार्थ्यांना ध्वनीचित्रफितीद्वारे आपल्या गणेश मूर्ती व गणरायाची रेखाटलेली चित्रे शाळेकडे पाठवली. कोरोना या असाध्य रोगाने संपूर्ण जगात थांबविले आहे. विद्यार्थ्यांना घरात बंदिस्त रहावे लागत आहे अशा वेळी शाळेद्वारा राबविला गेलेला हा स्तुत्य उपक्रम विद्यार्थ्यांना अतिशय आनंद प्रदान करणारा ठरला. कल्पकतेचा वापर करून, विविध साधनांच्या साह्याने चिमुकल्यांनी तयार केलेल्या मूर्ती बघताना पालकवर्ग आणि शिक्षकवर्गही सुखावला.
शाळेद्वारे अतिशय स्तुत्य उपक्रम राबविल्याबद्दल शाळेचे सचिव श्री. के. संजय व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. उषा कोचे यांनी शाळेतील प्राथमिक विभागातील सर्व शिक्षकांचे व उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत आपल्या कल्पनाविश्वात रममाण होऊन अत्यंत अप्रतिम मूर्ती व चित्रे रेखाटल्या बद्दल सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
