कलम 144 प्रमाणे प्रतिबंधक आदेश निर्गमित
यवतमाळ दि. 09 सप्टेंबर : कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीमुळे यावर्षीचा सार्वजनिक गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले असून यासाठी कलम 144 नुसार प्रतिबंधक आदेश निर्गमित करून अतिरिक्त मार्गदर्शक सूचना लागू केल्या आहेत.
सुधारित मार्गदर्शक सुचनानुसार सार्वजनिक गणेशोत्सव मंडपासाठी संबंधित महानगरपालिका, नगर पंचायत, ग्रामपंचायत तसेच संबंधित स्थानिक प्रशासनाने मंडपाबाबतचे धोरण निश्चित करताना मर्यादीत स्वरुपाचे मंडप या बाबतची परिभाषा (मंडपाचा आकार, उंची, कमानी, कनात इ.) निश्चित करण्यात यावे. महानगरपालिका, नगर पंचायत, ग्रामपंचायत तसेच स्थानिक प्रशासनाने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना कोणत्याही रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी मंडप टाकण्याची परवानगी न देता मोठे हॉल, मंगल कार्यालय, समाजमंदीर, घराचा मोठा व्हारंडा अशा ठिकाणी इमारतीमध्ये चार भिंतीच्या आत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना परवानगी द्यावी. यावर्षी चे गणेशोत्सवसाठी गणेश मुर्तीचे आगमन किंवा विसर्जन यासाठी परवानगी नाही. परंतु आगमनासाठी व विसर्जनासाठी येताना / जाताना धार्मीकदृष्टया/ जातीयदृष्टया संवेदनशिल क्षेत्रातुन प्रतिबंध करण्यात यावा. या संदर्भात पोलीस प्रशासनाने निश्चित करुन दिलेले मार्ग, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना गणेश मुर्ती आगमन व विसर्जनासाठी येताना/जाताना बंधनकारक राहतील.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या ठिकाणी करण्यात येणारी आरती, भजन व इतर धार्मिक कार्यक्रम येथे गर्दी टाळण्यासाठी, भाविकांच्या संख्येवर मर्यादा आणणे आवश्यक आहे. सर्व प्रकारच्या नियमीत कार्यक्रमासाठी गणेशोत्सव मंडळाच्या ठिकाणी योग्य सामाजिक अंतर राखून एकावेळी कमीत कमी व्यक्ती राहतील याबाबत मंडळ व्यवस्थापनाने दक्षता घ्यावी.
गणेश मुर्तीचे विसर्जन करण्यासाठी स्थानिक प्रशासन नगर पंचायत, ग्रामपंचायत यांनी गणेश मुर्ती विसर्जीत करण्यासाठी स्वतंत्र वाहने व कर्मचारी नेमावेत. अशा प्रकारे गोळा करण्यात आलेल्या गणेश मुर्ती, विसर्जनाच्या ठिकाणी घेवुन जाताना पोलीस प्रशासनाने निश्चित केलेले मार्ग संबंधितांना बंधनकारक राहतील.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या तसेच घरगुती गणेश मुर्तीचे विसर्जन सहज, सुलभ व सुखद पध्दतीने करण्यासाठी स्थानिक प्रशासन, महानगरपालिका, नगर पंचायत व ग्रामपंचायत यांनी जास्तीत जास्त कृत्रीम तलावांची निर्मीती करावी. सदर विसर्जनाचे ठिकाणी निर्माल्य कलश उभारुन गणेश भक्तांनी आणलेल्या गणेश
मुर्ती व्यतिरीक्त इतर पुजेचे साहित्य निर्माल्य कलशामध्ये गोळा/संकलीत करण्यात यावे.
गणपती विसर्जनाच्या ठिकाणी स्थानिक प्रशासन, नगर परिषदानगर पंचायत, ग्रामपंचायत यांनी प्रकाश व्यवस्था व बॅरीकेटींग करणे आवश्यक आहे. सध्या गुसळधार पावसामुळे नद्या, नाले व ओढे या ठिकाणी पुर परिस्थिती असल्याने गणपती विसर्जनासाठी आलेल्या गणेश भक्तांच्या जिवाची सुरक्षा करण्यासाठी स्थानिक प्रशासन, महानगरपालिका, नगर पंचायत, ग्रामपंचायत यांनी मजबुत बॅरीकेटींग व संपुर्ण परिसर प्रकाशमान होइल अशा प्रकारची प्रकाश व्यवस्था करणे आवश्यक आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या ठिकाणी सर्वांनी मास्क लावणे, सामाजिक अंतर, सॉनिटायझर किंवा हॅन्डवॉशने नियमित हाताची स्वच्छता इत्यादी कोवीड त्रीसुत्रीचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहील. ह्यांचे पालन होत आहे किंवा नाही याबाबत नियंत्रण स्थानिक प्रशासनाने व पोलीस विभागाने ठेवावे.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या ठिकाणी कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा पुर्ण झालेले व्यक्ती किंवा आर.टी.पी.सी.आर. निगेटीव्ह प्रमाणपत्र सोबत असलेल्या व्यक्तीनाच मंडळात उपस्थित राहता येईल ही बाब बंधनकारक राहील. सार्वजनिक गणेशोतसव-२०२१ करीता यापुर्वी काढण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना जश्यास तश्या लागू राहतील.
वरिल आदेशांचे उल्लंघन केल्यास त्यांचेवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, साथ रोग नियंत्रण अधिनियम, भारतीय दंड संहिता व इतर संबधित कायदे व नियम अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नुमुद करण्यात आले आहे.



