जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2168 बेड उपलब्ध
यवतमाळ दि. 09 सप्टेंबर : गेल्या 24 तासात जिल्ह्यात नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले नाही तसेच कोणीही कोरोनामुक्त झाले नाही. सध्या ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यात आठ तर बाहेर जिल्ह्यात एक अशी एकूण नऊ आहे.
जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 801 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह नसल्याने सर्व 801 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72864 आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 71068 आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1787 मृत्यूची नोंद आहे.
जिल्ह्यात आतापर्यत सात लक्ष 29 हजार 411 चाचण्या झाल्या असून त्यापैकी सहा लक्ष 56 हजार 524 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 9.99 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी 0.00 आहे तर मृत्यूदर 2.45 आहे.
जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2168 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 16 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 2174 आहे. यापैकी 6 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 2168 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 787 बेडपैकी 3 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 784 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 755 बेडपैकी 3 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 752 बेड शिल्लक आणि 16 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 632 बेडपैकी पुर्ण 632 बेड शिल्लक आहेत.
______________________________________
ग्रामीण रस्तेमार्ग पी.सी.आय. इंडेक्स यादीवर नागरिकांचे आक्षेप आमंत्रित
यवतमाळ दि. 09 सप्टेंबर : जिल्ह्यात रस्ते विकास आराखड्यानुसार इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्गाचे तालुकानिहाय काढण्यात आलेल्या पी.सी.आय. (पेव्हमेंट कंडीशन इंडेक्स) इंडेक्सच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या प्राधन्यक्रम याद्या जिल्हा परिषद, यवतमाळ व जिल्हाधिकारी कार्यालय,यवतमाळ यांचे वेबसाईटवर प्रकाशीत करण्यात आल्या आहेत. सदर यादीबाबत नागरिकांना आक्षेप असल्यास त्यांनी संबंधीत उपविभागाचे उपअभियंता यांचे कार्यालयात कार्यालयीन कामकाजाचे दिवशी दि.18 सप्टेंबर 2021 पर्यंत लेखी आक्षेप नोंदविण्यात यावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे.
जिल्हा परिषदेमधील जिल्हा परिषद बांधकाम विभाग क्र.1 अंतर्गत यवतमाळ, कळंब, पांढरकवडा, वणी व झरी-जामणी असे 5 उपविभाग कार्यरत असून यवतमाळ उपविभागामध्ये यवतमाळ व बाभुळगांव, कळंब उपविभागामध्ये कळंब व राळेगांव, पांढरकवडा उपविभागामध्ये पांढरकवडा व घाटंजी तसेच वणी उपविभागामध्ये वणी तसेच उपविभाग झरी मध्ये झरी व मारेगांव असे 9 तालुकयांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेमधील बांधकाम विभाग क्र.1 अंतर्गत येणाऱ्या 9 तालुक्यातील अस्तित्वात असलेल्या इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग या रस्त्याचे शासन नियमानुसार सविस्तर सर्वेक्षण करण्यात आलेले असून प्रत्येक रस्त्याचा त्याचे आजचे स्थितीनुसार पी.सी.आय. इंडेक्स काढण्यात आलेला आहे.
अस्तीत्वात असलेल्या रस्त्यावरुन जीप/कार या दर्जाचे वाहन कोणत्या वेगाने चालते यावरुन त्या रस्त्याचा पी.सी.आय. ठरविण्यात आलेला आहे. त्याबाबतच्या निकष व गुणांकनानुसार जीप/कार याचा वेग ताशी 40किमी पेक्षा जास्त असल्यास पी.सी.आय. 5 राहील व रस्त्याची स्थिती (सरफेस कंडीशन) अतिशय चांगली असेल. त्याचप्रमाणे गाडीचा वेग ताशी 30 ते 40 किमी असल्यास पीसीआय 4 व रस्त्याची स्थिती चांगली, वेग 20 ते 30किमी साठी पीसीआय 3 व रस्त्याची स्थिती साधारण, वेग 10 ते 20 किमी साठी पीसीआय 2 नुसार रस्त्याची स्थिती वाईट/ खराब आणि गाडीचा वेग 10 किमीचे आंत असल्यास पीसीआय 1 रस्त्याची स्थिती अतीशय वाईट व खराब.
सन 2001 ते 2021 च्या रस्ते विकास आराखड्यानुसार महाराष्ट्र राज्यात इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग यांच्या एकूण प्रस्तावित लांबीपैकी प्रत्यक्षात अस्तित्वात असलेल्या रस्त्यांची दुरुस्ती करण्याकरिता रस्ते या क्षेत्रासाठी जिल्हा नियोजन समिती, आदिवासी विकास विभाग यांच्याकडून उपलब्ध होणाऱ्या निधीचा सुयोग्य वापर व्हावा, कामामध्ये सुसुत्रता राहावी, त्याचप्रमाणे कामात वारंवारीता होवू नये या दृष्टीने सर्वसमावेशक सुचना ग्रामविकास विभागाच्या 3 सप्टेंबर 2016 च्या शासन निर्णय अन्वये देण्यात आल्या आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा परिषदेकडे देखभाल दुरुस्तीकरिता असलेल्या इतर जिल्हा मार्ग व ग्रामिण मार्ग यांच्याकरिता तालुका स्तरावर पी.सी.आय. (पेव्हमेंट कंडीशन इंडेक्स) व इतर निकषानुसार प्राधान्यक्रम याद्या तयार करुन त्यास मान्यता घ्यावी व चालु आर्थिक वर्षात पुर्वीप्रमाणे नियम/कार्यपद्धतीनुसार जिल्हास्तरीय योजना राबविण्यात याव्या, असे निर्देश देण्यात आलेले आहेत. त्यानुसार वरीलप्रमाणे पी.सी.आय. इंडेक्स जाहीर करण्यात आले आहे.
______________________________________
आदीवासी महिलांमध्ये उद्योजकता निर्माण करण्यासाठी
फॅशन डिझायनिंग आणि शिवणकला कौशल्य उपयुक्त ठरणार
– प्रकल्प अधिकारी विवेक जॉनसन
यवतमाळ दि. 09 सप्टेंबर : आदीवासी मुली आणि महिलांमध्ये शिवणकला आणि आधुनिक फॅशन डिझायनिंगच्या प्रशिक्षणातुन निर्माण झालेल्या कौशल्या मुळे आदीवासी भागात उद्योजकता निर्माण करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे, असे प्रतिपादन सहाय्यक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, पांढरकवडाचे प्रकल्प अधिकारी विवेक जॉनसन यांनी केले.
एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प, पांढरकवडा आणि सुनिता फॅशन डिझायनिंग प्रशिक्षण केन्द्र यवतमाळ यांच्या सयुंक्त विद्यमानाने आयोजीत शिलाई मशीन वितरण वितरण आणि आदीवासी मुलींनी निर्मीती केलेल्या फॅशन डिझायनिंग कपड्यांच्या प्रदर्शनी साहेळ्याच्या उद्घाटन श्री. जॉनसन यांचे हस्ते दीपलक्ष्मी मंगल कार्यालय, धामणगाव रोड, यवतमाळ येथे नुकतेच करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाला आदीवासी विकास विभाग अमरावतीचे अपर आयुक्त सुरेश वानखेडे, सुरेश रामटेके, कौशल्य विकासच्या सहायक आयुक्त विद्या शितोळे प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी सर्व प्रशिक्षीत मुली आणि महीलांना एम्ब्रायडरीच्या 40 शिलाई मशीनचे वितरण करण्यात आले. तसेच प्रशिक्षीत मुलींनी निर्मीत केलेल्या कपड्यांचे फॅशन-शो आणि सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक दिपलक्ष्मी मंगल कार्यालयामध्ये आयोजीत करण्यात आले होते.
कार्यक्रमाला जनार्धन पाटील, जनार्धन जंगले, विक्रमसिंह पुंडीर (कोश्यारी), प्रियंका पाटील, पंजाबराव मुधाने, सैयद जाकीर, शिल्पा सांवत, जिल्हा खादी ग्रामोद्योग अधिकारी जी.एन इंगळे, यवतमाळ अर्बन बॅकचे अध्यक्ष अजय मुधंडा, अनिल जिरापुरे, नंदकुमार उबाळे, भगवान भितकर इ. उपस्थित होते,
कार्यक्रमाचे संचलन चंद्रबोधी घायवटे यांनी केले तर उपस्थितांचे आभार मनोज पवार यांनी व्यक्त केले.
_______________________________________
मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीचे अर्ज सादर करण्यास 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
यवतमाळ दि. 09 सप्टेंबर : समाज कल्याण विभागामार्फत अनुसूचित जाती, इतर मागास वर्ग, विजाभज व विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयामार्फत मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती व फ्रिशिप संबंधीत लाभ देण्यात येतो. सदर सर्व योजनांतर्गत स्टेट डिबीटी च्या https://mahadbt.gov.in या संकेतस्थळावर लाभार्थ्यांचे आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न करून सन 2020-21 चे परिपुर्ण अर्ज जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी दिनांक 30 सप्टेंबर 2021 पुर्वी मुळ टि.सी. सह सादर करावे. विद्यार्थी सदर लाभापासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी महाविद्यालयांची राहील. तसेच पात्र विद्यार्थ्यांकडून शुल्क घेता येणार नाही. संबंधीत विद्यार्थ्यांनीसुद्धा अर्जाची नोंदणी करून अर्ज महाविद्यालयास सादर करावे, असे आवाहन समाज कल्याण कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त भाऊराव चव्हाण यांनी केले आहे.
_______________________________________
गणेश स्थापनेला मद्य अनुज्ञप्त्या बंद
यवतमाळ दि. 09 सप्टेंबर : जिल्ह्यात दिनांक 10 सप्टेंबर रोजी गणेश स्थापना प्रसंगी कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहावी म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या दृष्टीकोनातून जिल्ह्यातील सर्व किरकोळ व ठोक मद्य विक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी निर्गमित केले आहे.
या आदेशानुसार 10 सप्टेंबर रोजी संपुर्ण दिवस एफएल-1, एफएल-2,सीएल/एफएल/टिओडी-3, एफएल/बिआर-2, एफएल-3,सीएल-2, सीएल-3 इ. सर्व अनुज्ञप्त्या मद्य विक्रीसाठी बंद राहतील. आदेशाचे पालन न केल्यास संबंधीत अनुज्ञप्तीधारकाविरद्ध कडक कारवाई करण्यात येईल असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.



