Home यवतमाळ इंदिरा महाविद्यालयाच्या वार्षिकांकाचे प्रकाशन संपन्न

इंदिरा महाविद्यालयाच्या वार्षिकांकाचे प्रकाशन संपन्न

12

 

इंदिरा महाविद्यालयाच्या ‘कदंबिनी’ ह्या वार्षिकांकाचे प्रकाशन ख्यातनाम साहित्यिका माजी प्राचार्या डॉ. सिंधू मांडवकर यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी ग्रंथपाल डॉ. जी.पी. उरकुंदे आणि प्रा. दिलीप पाटील उपस्थित होते.

रीतसर प्रकाशनानंतर डॉ. सिंधू मांडवकर यांनी वार्षिकांकाच्या निराळेपणाची प्रशंसा करतानाच देशभक्ती व युद्धप्रसंगांवर आधारित मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत, उर्दू या पाचही भाषांमधून व्यापक प्रकाशझोत टाकण्यात आल्याने हा अंक प्रत्येकाने संग्रही ठेवण्याच्या योग्यतेचा झाला असल्याचे मत मांडले.

“दर्जेदार लेख, कविता, कथा, व्यंगचित्रे, चुटकुले यांनी १५४ पृष्ठांमध्ये सजलेला आणि वर्षभरातील विविध कार्यक्रमांच्या निवडक छायाचित्रांसह अंतर्गत सजवटीने परिपूर्ण असा हा वार्षिकांक ‘कदंबिनी’ सर्वांच्या मनाचा ठाव घेईल”, असे उद्‌गार डॉ. जी.पी. उरकुंदे यांनी काढले.

“हा वार्षिकांक ‘देशभक्ती विशेषांक’ म्हणून प्रकाशित झाल्याचे त्याचे वाङ्‌मयीन मूल्य तर वाढले आहेच, पण सुबक छपाई, आकर्षक मुखपृष्ठ, वैचारिक आणि ललित साहित्याबरोबरच रेखाचित्रांच्या माध्यमातून अभिरुचीसंपन्न लेखनाची निवड झाल्याचे स्पष्ट जाणवते, असे मनोगत प्रा. दिलीप पाटील यांनी व्यक्त केले.

अध्यक्षीय भाषणातून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पवन मांडवकर यांनी त्यांच्या सैनिकी जीवनातील अनुभवाचा विद्यार्थ्यांना साहित्यनिर्मिती करताना कसा उपयोग झाला, यावर प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांनी स्वतः रेखाटनातून तयार केलेले बहुरंगी मुखपृष्ठ, अंतर्गत सजावट, नावीन्य आणि वाचनीयता, आधुनिक तंत्रज्ञानातून सुबक छपाई आणि बांधणी अशा विविधांगी वैशिष्ट्यांमुळे हा अंक अत्यंत दर्जेदार झाला आहे, अशी प्रशंसा केली आणि संपादक विद्यार्थी आणि मार्गदर्शक प्राध्यापकांचे अभिनंदन केले.

कार्यक्रमाचे संचलन डॉ. सौ. वीरा मांडवकर व आभार प्रदर्शन प्रा. नीलकंठ नरूले यांनी केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियम पाळून निवडक साहित्यिक, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.

Copyright ©