———————————————–
घाटंजी- भारतात विमुक्त जाती जमाती मध्ये मोडणाऱ्या जातीची संख्या अठरा कोटीच्या वर आहे. यात इंग्रजांनी १८७१ साली कायदा करून यांना गुन्हेगार जात म्हणून घोषित केले. यामध्ये प्रामुख्याने बंजारी, पारधी, भिल्ल, कातकरी, कैकाडी, नंदीबैल वाले, वैदू, मरीआई वाले, बेलदार, भोई, गारुडी, बहुरूपी, लोहार, गोंधळी, पांचाळ, वंजारी, भामटा राजपूत, गवळी यांचा समावेश आहे. परंतु देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष लोटली असतांनाही आजही हया वि. जा. भ. जमातीच्या लोकांचे सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक किंवा राजकीय क्षेत्रात लोकसंख्येच्या मानाने जो विकास अपेक्षित होता तो न झाल्याने मा. बाळकृष्ण रेणके आयोगाच्या शिफारशी केंद्र सरकारने मान्य करून त्या लागू करण्यासाठी घाटंजी येथे वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष संघापल कांबळे यांच्या नेतृत्वात विमुक्त भटक्यांचा जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.
तमाम विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या न्याय हक्कांसाठी, त्यांना नविन दिशा देवून त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आतापर्यंत अनेक आयोग नेमण्यात आले त्यापैकी रेणके आयोगाच्या शिफारशी केंद्र सरकारने मान्य करणे गरजेचे आहे. शासनाने सन २००६ साली जो बाळकृष्ण रेणके आयोग नेमला होता त्या आयोगाने अतिशय अभ्यासपूर्ण आणि प्रभावी असणाऱ्या शिफारशी तयार करून सन २००८ साली केंद्र शासनाकडे माण्यतेकरी सुपृद केले होते. मात्र केंद्र सरकारने याकडे दुर्लक्ष केले आहे. यात लोकसंख्येच्या तुलनेत नौकरी व शिक्षण क्षेत्रात १० टक्के आरक्षण, स्वतंत्र अर्थसंकल्पाची तरतूद, वेगळे मंत्रालय, वेगळे बोर्डिंग आणि शाळा, प्रत्येकाना जमीन व राहण्यासाठी घरे, मानवाधिकार आयोग व महिला आयोगात या समाजाला प्रतिनिधित्व, अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रमाणे भटक्या विमुक्त ना सवलती मिळाल्या पाहिजेत. यासह शिफारशींचा समवेश आहे. या बाबीचा विचार करून हा जन आक्रोश मोर्चा शिवाजी चौकातून निघून तहसिल कार्यालयात येऊन तहसिलदार यांचे मार्फत मा. राष्ट्रपती यांना निवेदन पाठविण्यात आले. यादरम्यान मुख्य निमंत्रक वंचित बहुजन आघाडीचे महासचिव नितिन राठोड यांनी शासनाने रेनके आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात यावर विस्तृत प्रतिक्रिया दिली. भर पावसात निघालेल्या मोर्चाचे नेतृत्व संघपाल कांबळे यांनी केले असून या मोर्चात सचिन राठोड, सिताराम वाघ, उमेश कुडमथे, प्रेमानंद उमरे, प्रल्हाद मारबदे, गजानन जाधव, तुकाराम कोरवते, लक्ष्मणराव गिंनगुले, नारायण बावणे, बाबाराव ढोके, विनायक नगराळे, सुनिल कनाके, विलास गायकवाड, आकाश सोयाम, गजानन देवतळे, नंदकुमार घोडेस्वर, मुकुंदा जाधव, दीक्षांत वासनिक, साहिल रामटेके, वैभव घोडाम, अनिल राठोड, विनोद पवार, जग्गू राठोड, मंगेश पवार यासह शेकडो करकर्ते सहभागी झाले होते.
