Home यवतमाळ गेल्या 24 तासात नवीन पॉझिटिव्ह नाही ; एक कोरोनामुक्त जीएमसी, डीसीएचसी...

गेल्या 24 तासात नवीन पॉझिटिव्ह नाही ; एक कोरोनामुक्त जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2159 बेड उपलब्ध

11

आता 8 वाजे पर्यंत राहणार दुकाने खुली,जाणुन घ्या नियमावली !

सर्व व्यवसाय व दुकाने तसेच मॉल्स सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजेपर्यंत

चित्रपटगृहे, नाट्यगृहे, मल्टीप्लेक्स तसेच सर्व धार्मिक स्थळे बंद

सर्व रेस्टॉरंट/हॉटेल 50 टक्के आसन क्षमतेसह सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरू

व्यायामशाळा, सलून व पार्लर 50 टक्के क्षमतेने सुरू, अे.सी वापरण्यास मनाई

रात्री 9 ते सकाळी 5 वाजेपर्यंत पुर्वीप्रमाणे बंधने कायम

राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक समारंभावर निर्बंध कायम

यवतमाळ दि. 3 ऑगस्ट : जिल्ह्यात ‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत सुधारित मार्गदर्शक सूचना लागू करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी राज्य शासनाच्या सूचनेनुसार निर्गमित केले आहेत.

सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यात सर्व प्रकारचे अत्यावश्यक सेवेची दुकाने व त्याव्यतिरिक्त इतर सर्व व्यवसाय व दुकाने तसेच मॉल्स सोमवार ते शुक्रवार रात्री ८ वाजेपर्यंत आणि शनिवारी दुपारी 3 पर्यंत सुरु राहतील. रविवारी अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने आणि मॉल्स बंद राहतील.

सर्व उद्याने, व्यायाम शाळा, खेळाची मैदाने ही व्यायाम, चालणे, धावणे, सायकलिंग आदीं नियमानुसार अनुज्ञेय बाबींसाठी खुली असतील.

सर्व शासकीय व खासगी कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरु ठेवणार. वर्क फ्रॉम होम पद्धतीने काम करणाऱ्यांना घरूनच काम करण्यास मुभा राहील. शेतीविषयक सर्व कामे, बांधकाम, वस्तूंची वाहतूक, उद्योग हे पूर्ण क्षमतेने सुरु राहतील.

जिम, व्यायामशाळा, योगा केंद्र, ब्युटी पार्लर, केश कर्तनालय व मसाज पार्लर यांनी वातानुकुलित यंत्र न वापरता ५० टक्के क्षमतेने सोमवार ते शुक्रवार रात्री ८ वाजेपर्यंत व शनिवारी दुपारी ३ पर्यंत आस्थापना सुरु ठेवता येतील आणि रविवारी पूर्ण बंद राहतील.

चित्रपटगृहे, नाट्यगृहे, तसेच मॉल्समधील मल्टीप्लेक्स तसेच सर्व धार्मिक स्थळे पुढील आदेशापर्यंत बंद राहतील.

शाळा, महाविद्यालये, तंत्र महाविद्यालये याकरिता शालेय शिक्षण व उच्च तंत्रशिक्षण या विभागाने काढलेले आदेश लागू राहतील.

सर्व रेस्टॉरंट/हॉटेल ५० टक्के आसन क्षमतेसह सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरु राहतील. शनिवार व रविवारी बंद राहतील. तसेच यापुर्वीच्या आदेशाप्रमाणे पार्सल व होम डिलेव्हरी सुविधा शनिवार व रविवार सह रोज सुरु ठेवता येईल.

जिल्ह्यात रात्री ९ ते सकाळी ५ वाजेपर्यंत पुर्वीप्रमाणे बंधने कायम राहतील.

गर्दीमुळे संसर्ग वाढू नये म्हणून वाढदिवस समारंभ, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक समारंभ, निवडणुक प्रचार, मिरवणुका, रॅली, मोर्चे, आंदोलने यांच्यावरील निर्बंध पुर्वीप्रमाणेच कायम ठेवण्यात आले आहेत.

मास्क वापरणे, सुरक्षित अंतर यासारखे कोरोना प्रतिबंधक नियम सर्व नागरिक व आस्थापनांनी पाळणे गरजेचे आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५, साथरोग कायदा, आणि भारतीय दंड संहितेमधील तरतुदीनुसार कारवाई केली जाईल, असेही जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या उपरोक्त आदेशात नमूद करण्यात आले आहे.
______________________________________

यवतमाळ दि. 3 ऑगस्ट : गेल्या 24 तासात जिल्ह्यात नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले नाही तर एक जण कोरोनामुक्त झाले आहेत.

जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 85 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह नसल्याने सर्व 85 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात ॲक्टीव पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 17 व जिल्ह्याबाहेर दोन अशी आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72809 आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 71006 झाली आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1786 मृत्युची नोंद आहे.

जिल्ह्यात आतापर्यत 7 लक्ष 1 हजार 37 चाचण्या झाल्या असून त्यापैकी 6 लक्ष 28 हजार 152 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 10.39 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी 0 आहे तर मृत्युदर 2.45 आहे.

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2159 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 16 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 2174 आहे. यापैकी 15 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 2159 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 787 बेडपैकी 13 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 774 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 755 बेडपैकी 2 बेड रुग्णांसाठी उपयोगात तर 753 बेड शिल्लक आणि 16 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 632 बेडपैकी पुर्ण 632 बेड शिल्लक आहेत.

______________________________________
मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी प्रवेश सुरू

तालुकास्तरावर प्रशिक्षण केंद्र वाढविण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश

 

यवतमाळ दि. 3 ऑगस्ट : मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत 18 ते 45 वयोगटातील आठवी ते पदवी पर्यंत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थी व नागरिकांना आरोग्य क्षेत्रातील अल्प मुदतीचे अभ्यासक्रम शासनामार्फत मोफत शिकविण्यात येत आहेत. हे अभ्यासक्रम जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालय असणाऱ्या सर्व तालुक्यात सुरू करण्यात यावे, जेणेकरून पुढील तीन महिण्यानंतर सर्व तालुक्यात प्रशिक्षीत आरोग्य कर्मचारी सहज उपलब्ध राहतील व त्यांचा फायदा प्रशिक्षणार्थ्याला रोजगार मिळण्यास व आरोग्य यंत्रणेला प्रशिक्षीत कर्मचारी वर्ग उपलब्ध होण्यास होईल, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज केल्या.

मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत सुरू प्रशिक्षणबाबतचा आढावा जिल्हाधिकारी यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल सभागृहात घेतला. यावेळी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त विद्या शितोळे, शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचे डॉ. शरद मानकर, आयुर्वेदीक कॉलेजचे डॉ. मनोज येरावार, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाचे डॉ. मनोज सत्यपाल प्रामुख्याने उपस्थित होते.

सहाय्यक आयुक्त विद्या शितोळे यांनी वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे 65 प्रशिक्षणार्थी, जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या अख्त्यारीत उपजिल्हा रुग्णालयात 110 प्रशिक्षणार्थी तर आयुर्वेद विद्यालयाअंतर्गत 100 प्रशिक्षणार्थीचे प्रवेश झाले असल्याची माहिती दिली. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यवतमाळ येथे व्हीजन असीस्टंट, होम हेल्थ एड, इमर्जन्सी मेडीकल टेक्नीशियन, फ्लेबोटोमीस्ट, ड्रेसर या अभ्यासक्रमाच्या प्रत्येकी 15 याप्रमाणे एकूण 75 जागा तर उपजिल्हा रूग्णालय पांढरकवडा येथे फ्लेबोटोमीस्ट, गेरियाट्रीक केअर एड, डायेटीक एड, मेडिकल रेकॉर्ड ॲण्ड हेल्थ इनफॉर्मेशन या अभ्यासक्रमाच्या प्रत्येकी 10 याप्रमाणे एकूण 40 जागांवर प्रवेश प्रक्रीया सुरू असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी मोफत रजिस्ट्रेशनसाठी www.mhaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे व अधिक मार्गदर्शनासाठी उद्योग भवन, यवतमाळ येथे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता कार्यालयात प्रत्यक्ष भेट देण्याचे किंवा 07232-244395 या दूरध्वनीवर संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले असल्याचे सांगितले.

बैठकीला संबंधीत अधिकारी उपस्थित होते.

______________________________________
एकलव्य मॉडेल निवासी शाळेत प्रवेशासाठी

31 ऑगस्टपुर्वी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

 

यवतमाळ दि. 3 ऑगस्ट : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पांढरकवडा अंतर्गत एकलव्य मॉडेल निवासी शाळेत इयत्ता सहावीच्या वर्गात नियमित प्रवेश व सातवी ते नववीच्या रिक्त जागेवर प्रवेश मिळण्यासाठी अनुसूचित/आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांनी 31 ऑगस्ट 2021 पर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन प्रकल्प अधिकारी विवेक जॉनसन यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

या निवासी शाळेत प्रवेश घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थी, त्यांचे पालक, शिक्षक अथवा मुख्याध्यापक यांनी https://admission.emrsmaharashtra.com या संकेतस्थळावर ऑनलाईन आवेदनपत्र 31 ऑगस्ट 2021 पर्यंत विद्यार्थ्याच्या मागील शैक्षणिक वर्षाच्या गुणपत्रक व विद्यार्थ्याच्या सरल आय.डी. सह अपलोड करावे. अर्ज भरतांना विद्यार्थ्यांचे प्राप्त गुण भरण्यात यावे, श्रेणी भरू नये याबाबत दक्षता घ्यावी.

शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळा, जिल्हा परिषद, नगरपालिका व महानगरपालिकेच्या तसेच इतर शासनमान्य अथवा खाजगी, अनुदानित शाळेत शिकत असणारा कोणताही अनुसूचित जमातीचा विद्यार्थी हे आवेदनपत्र भरू शकेल. तसेच इयत्ता 6 वी मध्ये प्रवेशासाठी अनुसूचित जमातीच्या दिव्यांग प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी 3 टक्के आणि आदिमकरिता प्रत्येक शाळेत 5 जागा आरक्षित असणार आहेत. ऑनलाईन प्राप्त आवेदनपत्रातून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेनुसार आणि पालकांच्या मूळ राहिवासचा पत्ता विचारात घेऊन नजिकच्या एकलव्य मॉडेल निवासी शाळेत उपलब्ध जागेनुसार प्रवेश देण्यात येईल.

फॉर्म भरण्याबाबत व प्रवेश संदर्भातील सविस्तर सूचना यवतमाळ जिल्ह्याचे प्रत्येक तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी, पंचायत समिती येथे देण्यात आल्या आहेत. याबाबत अधिक माहितीसाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, पांढरकवडा येथे संपर्क साधावा, असे प्रकल्प अधिकारी विवेक जॉनसन यांनी कळविले आहे.
________________________________
जिल्हाधिकारी कार्यालयात क्रांतिसिंह नाना पाटील यांना अभिवादन

यवतमाळ दि. 3 ऑगस्ट : क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती आज जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी ललित कुमार वऱ्हाडे व उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांनीदेखील त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

Copyright ©