Home यवतमाळ केळापूर उपविभागात जिल्हाधिकारी यांची भेट

केळापूर उपविभागात जिल्हाधिकारी यांची भेट

11

 

घोंडसी कोलाम पोडावर जात प्रमाणपत्राचे वितरण

कोविडमुळे निराधार महिलांना संजय गांधी निराधार प्रमाणपत्राचे वाटप

भुगर्भातील लाव्हा रसाने तयार शिळा व जिवाश्मांची पाहणी केली

यवतमाळ, दि. 29 जुलै : जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज केळापूर उपविभागात घोंडसी कोलाम पोडावर भेट देवून तेथील नागरिकांना जात प्रमाणपत्राचे वाटप केले.

जात प्रमाणपत्राच्या अभावाने या भागातील आदिवासी नागरिक शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहू नये यासाठी त्यांना जात प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पचे प्रकल्प अधिकारी तथा केळापूरचे उपविभागीय अधिकारी विवेक जॉनसन यांच्या मार्गदर्शनात महसूल विभागाद्वारे केळापूर उपविभागात विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत ४२ कोलाम पोडावर शासकीय कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देवून जात प्रमाणपत्र नसलेल्या ७७२ नागरिकांची यादी तयार केली आहे. त्यांचेकडू तलाठ्यामार्फत कागदपत्र प्राप्त करण्यात येत असून त्याआधारे शासनामार्फतच त्यांचे जात प्रमाणपत्र तयार करण्यात येत आहे. आतापर्यंत १४२ नागरिकांना जात प्रमाणपत्राचे वाटप त्यांचे पोडावरच करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी येडगे यांनी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली तसेच कोविडमुळे कुटूंबप्रमुखाचा मृत्यू झाल्याने निराधार झालेल्या महिलांना संजय गांधी निराधार प्रमाणपत्राचे वाटप केले.

तद्नंतर जिल्हाधिकारी येडगे यांनी झरी जामणी येथील शिबला आश्रमशाळेतदेखील भेट दिली. तसेच पांढरकवडा शिबला रोडवरील पारडी गावच्या शिवारात आढळून आलेल्या भुगर्भातील लाव्हा रसाने तयार झालेल्या शिळा व जिवाश्मांची पाहणी केली. भुशास्त्र संशोधनाच्या दृष्टीने त्याचे जतन व संरक्षण करण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

यावेळी जिल्हाधिकारी यांचे समवेत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पचे प्रकल्प अधिकारी तथा केळापूरचे उपविभागीय अधिकारी विवेक जॉनसन, जिल्हा खनिकर्म अधिकारी ओंकारसिंग भोंड, भूजल सर्व्हेक्षणचे वैज्ञानिक सौरभ मोटघरे व तक्षशिला गजभीये, केळापूरचे तहसिलदार सुरेश कव्हाळे, झरी जामणीचे तहसिलदार गिरीश जोशी तसेच आदिवासी विभाग व महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Copyright ©